सुश्री दीप्ती कुलकर्णी
विविधा
☆ शब्द… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆
…शब्द. अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे
“शब्द.” मूल बोलू-चालू लागण्यापूर्वी च ऐकण्याच्या माध्यमातून ‘अडगुलं-मडगुलं’ सारखी बडबडगीतं ऐकतं नि मोठं होतं.चिऊकाऊच्या गोष्टी ऐकत, चांदोबाकडे पाहत, आजुबाजुचा परिसर न्याहाळत ते भोवताल समजून घेतं.लहानपणी आकलनक्षमता जास्त असते त्यामुळे मूल पटकन शिकतं.अक्षर ओळख झाल्यानंतर कांही काळ गेला कि तेच मूल मोठ्या टाइपमधील गोष्टींच पुस्तक वाचू लागतं ,यातून पुढे वाचनाची आवड निर्माण होते नि वाचनाची सवय जडते.
शब्द एकदा जवळचे झाले कि मग ते सर्वस्वच बनतात.संत तुकाराम महाराज तरी म्हणतात
आम्हां घरी थन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्नें करू ||१||
शब्दची आमुच्या जीवाचे जीवन
शब्दे वाटू धन जन लोका ||२||
तुका म्हणे पहा,शब्दची हा देव
शब्देचि गौरव , पूजा करू ||३||
केवढा अर्थ भरला आहे या अभंगात.आपण थन कशाला म्हणतो तर सोने,चांदी,रत्ने,माणके,रुपये इ.ना.पण तुकाराम महाराज शब्दांनाच धन मानतात.कारण त्यांच्याकडं शब्दांच असं ऐश्व्य आहे कि जे हिरावून घेताच येणार नाही.शब्दांनाच ते शस्त्र मानतात .हे सुद्धा पटतं कारण महात्मा गांधींच्या “चले जाव “किंवा “छोडो भारत ” या शब्दात शस्त्रासारखं सामर्थ्य होतंं ज्यामुळं ब्रिटीश साम्राज्य हादरलं.अजूनही शिकण्यापूर्वी किंवा शिटताना प्रारंभी श्री सरस्वतीची,शब्द ब्रह्माची पूजा करतात.
संत रामदास स्वामी सुद्धा म्हणतात _
नाना शब्द,नाना स्पर्श |
नाना रुप नाना रस |
नानागंध ते विशेष |
नरदेह जाणे ||
एवढच म्हणून ते थांबत नाहीत तर ते देवाजवळ मागण मागतात
कोमल वाचा दे रे राम |
संगीत,गायन दे रें राम |
आलाप,गोडी दे रे राम
रसाळ मुद्रा दे रे राम |
शब्द मनोहर देरे राम ||
म्हणूनच या शब्दांशी मैत्री करु या
शब्दसंग्रह वाढवू या नि त्याचबरोबर शब्दांची गोडी जाणु या नि कटु शब्द टाळू या.
खरोखरच शब्द हे सुंदर आहेत.मनातल्या भावना आपण शब्दातूनच व्यक्त करतो. अगदी एकाक्षरी हुंकारातुनही हे घडू शकतं.
उदा.” हं ” हा शब्द कधी संमती दर्शवितो,तर कधी समाधान.कधीकधी तिरस्कार किंवा क्रोध सुद्धा हुंकारातूनच प्रगटतो.
गोड शब्द दुसर्याला आपलसं करुन घेतात नि नाती जोडतात. याउलट कटु शब्द दुरावा निर्माण करतात नि नाती तोडतात.अशक्य वाटणारं मोठं काम नुसत्या गोड शब्दांच्या वापरातून पूर्ण होतं.म्हणूनच या शब्दास आपण
“शब्दब्रह्म “म्हणुया नि नि नि:शब्द होऊन शब्दांपुढे नतमस्तक होऊ या. 🙏
© सुश्री दीप्ति कुलकर्णी
कोल्हापूर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈