श्री मेघःशाम सोनवणे
विविधा
☆ श्रमाची ॲलर्जी: एक राष्ट्रीय रोग – लेखिका- सुश्री परिज्ञा पुरी ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆
एक विचार की आजचे वास्तव?
आधुनिक शिक्षणाने औद्योगिक क्रांतीला लागणारे कामगार तयार झाले का? होय. पण त्याच आधुनिक शिक्षणाने पारंपरिक आणि सामाजिक जीवनातील श्रमाची प्रतिष्ठा नष्ट करून टाकली का? दुर्दैवाने त्याचेही उत्तर होकारार्थी आहे.
शेतकऱ्यांना शेती नको, कष्टकऱ्यांना मोलमजुरी नको, विद्यार्थ्यांना अभ्यासाचे कष्ट नकोत आणि स्त्रियांना घरकाम नको, त्यातही स्वतःच्या मुलांना पूर्णकालिक आई होऊन मोठे करण्याचे दिव्य तर नकोच नको. कोणालाही शारीरिक कष्टाची कामेच नकोशी झाली आहेत. सगळ्यांना खुर्चीत बसून आरामात मिळणारा पगार हवा आहे.
श्रमाची एक खासियत आहे. शारीरिक, अंगमेहनतीची कामे क्वचितच कुणाला आवडतात. पण एकदा का श्रमाची सवय शरीराला जडली की शरीरही तिला सोडू इच्छित नाही. श्रमाने तयार होणारे न्यूरल पाथवेज आयुष्यभर साथ देणारे ठरतात. शारीरिक श्रम ही एक थेरपी आहे. मनात दुःखाचा, अपमानाचा, क्रोधाचा आगडोंब जरी उसळला तरी त्याला शांत करण्याची किंवा त्याची तीव्रता कमी करण्याची शक्ती श्रमात आहे.
मला मनस्वी राग आहे त्या सर्व तथाकथित समाजसुधारकांच्या शिकवणुकीचा ज्यांनी पुस्तकी शिक्षणाला महत्त्व देता देता श्रमाने मिळणाऱ्या भाकरीची किंमत शून्य करून टाकली. या जगात अशी कुठलीही अर्थव्यवस्था अस्तित्वात नव्हती आणि येणार नाही जी सगळ्यांना व्हाइट कॉलर जॉब देऊ शकेल. ब्लू कॉलर जॉब हे जगाचे वास्तव आहे आणि ते कधीही कमी महत्त्वाचे नव्हते.
शेतीसाठी मजूर मिळत नाहीत, घरकामाला बायका मिळत नाहीत, चांगले कामसू आणि होतकरू व्हाइट कॉलर स्टाफ मेंबर्ससुद्धा आजकाल मिळत नाहीत, विद्या ही कष्टाने अर्जित करायची गोष्ट आहे हे आजकालच्या परीक्षार्थींच्या गावीच नसल्याने वर्कफोर्समध्ये गाळ माल भरला आहे ज्यांच्या हातात केवळ कागदाचे तुकडे आहेत, ज्ञान नाही. कारण कुठल्याही प्रकारचे कष्ट कोणालाच नको आहेत. घरातील मोठ्या माणसांची सेवा नकोशी झालीय, लहान मुलांना त्यांचे समाधान होईपर्यंत वेळ देणे नकोसे झाले आहे, सुनेला घरकामात मदत करायला सासूला नकोसे झाले आहे आणि बायकोला घरकामात मदत करायला नवऱ्याला नकोसे वाटत आहे. मी चार पुस्तके शिकले आणि बाहेरून कमावून आणते म्हणजे माझा आणि घरकामाचा आणि स्वयंपाकाचा संबंध नाही हे लग्नाआधी डिक्लेअर करण्यात मुली आणि त्यांच्या आईवडिलांना धन्यता वाटू लागली आहे. एकूण काय, आनंदी आनंद आहे सगळा!
हे सगळं डोळ्यासमोर घडतंय तरी आपलं काही चुकतंय अस कोणालाच वाटत नाहीये. सगळे कसे बदललेली परिस्थिती, जीवनशैली, इ. ना दोष देण्यात व्यस्त आहेत. पण ते बदलणारे आपणच आहोत, हे मात्र कोणालाच मान्य नाहीये.
एकीकडे श्रमाची प्रतिष्ठा नष्ट करणे आणि दुसरीकडे माणसातील मीपणा वाढीस लावणे, ह्या आधुनिक शिक्षणाने निर्माण केलेल्या अशा समस्या आहेत की, त्या समस्या आहेत हेच मुळी लोकांच्या लक्षात येत नाही.
श्रमाने अहंकार ठेचला जातो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे! मग मोठ्या माणसांनी सुनावलेल्या खड्या बोलांचा राग येत नाही, धाकट्यांनी काळजीपोटी केलेल्या प्रेमळ सूचनांचा त्रास होत नाही, घरातल्या किंवा ऑफिसमधल्या आळशी माणसांनी न केलेल्या कामामुळे आपल्यावर वाढलेल्या बोजाचा अवाजवी त्रास होत नाही आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे मी कोणीतरी विशेष आहे, माझे काही अस्तित्व आहे आणि इतरांची मर्जी राखता राखता माझे अस्तित्व कसे नष्ट होत चालले आहे आणि काय माझ्या शिक्षणाचा उपयोग, चूल मूल शिवाय मला आयुष्य आहे किंवा मी काय पैसे कमावण्यासाठी आणि इतरांना आधार देण्यासाठीच जन्माला आलो आहे का, असे प्रश्न लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन पडणे कमी होते.
या पोस्टद्वारे आधुनिक शिक्षणाचा विरोध करायचा नसून आधुनिक शिक्षणामुळे केवळ लाभ नाही तर हानीही झाली, हे निदर्शनास आणणे आहे. आणि ती हानी वैचारिक, सांस्कृतिक पातळीवर घडून आली आहे, हे शोचनीय आहे.
जाता जाता एक वास्तवात घडलेला प्रसंग: माझी एक आंबेडकरवादी मैत्रीण होती. तिच्या मोठ्या बहिणीला जिने पदव्युत्तर शिक्षण घेतले तिच्या सासरी तिला खूप जाच होऊ लागला. त्याला अनेक कारणे होती पण त्यातील एक मुख्य कारण असे होते की ही बहीण पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्या कारणाने शेतीत सासरच्यांची मदत करू इच्छित नव्हती. माझ्या मैत्रिणीचेही असे म्हणणे होते की शिक्षण घेतले तर तिने मोलमजुरीची, कष्टाची कामे का करावीत? हाच माझा मुद्दा आहे: शिक्षण घेतले की स्वतःच्या घरच्या शेतीतही काम करणे कमीपणाचे वाटावे, हे जे ब्रेनवॉश काही तथाकथित समाजसुधारकांनी गेल्या अडीचशे वर्षांत भारतीयांचे घडवून आणले आहे ना, ते आपल्या ऱ्हासास कारणीभूत ठरत आहे.
☆
लेखिका – सुश्री परिज्ञा पुरी
संग्राहक – मेघःशाम सोनवणे
मो – 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈