सौ. सुचित्रा पवार
☆ शोध बकुळीचा… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
“या,बाई या,या बाई या
बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया
वेचलेल्या फुलांचा हार करूया
आणि कृष्णाच्या गळ्यात हार घालूया”
लहानपणी बाईंनी शिकवलेल्या या गाण्यावर अधून मधून आम्ही नाच करत असायचो.बकुळीच्या झाडाची प्रथम ओळख अशी झालेली.डोळ्यांपुढं ओट्यात फुलं वेचलेलं चित्र यायचं;पण बकुळ फुले कशी असतील?असं वाटायचं.सर्वसाधारण मोगऱ्याची फुले नजरेसमोर यायची आणि प्राजक्ताचं झाड डोळ्यांपुढं दिसायचं.पण बकुळ कधी दृष्टीस पडलं नाही.कलापथक पाहताना मात्र बकुळ,गुलाब,शेवंता अशी पात्रांची नावे असायची.शालेय पाठयपुस्तकात परत कधी बकुळीचा उल्लेख आला नसल्याने जरासा विस्मरणात गेलेला बकुळ पुन्हा
तारुण्यात
“बकुळीच्या झाडाखाली,निळ्या चांदण्यात,हृदयाची ओळख पटली,सुगंधी क्षणात..”
या ओळीं ऐकल्यावर पुन्हा ताजा झाला.या झाडानं जणू वेडच लावलं.डोळ्यांपुढं ते आकाश व्यापणारं झाड,त्याखाली बसलेले दोन प्रेमी जीव,फुलांचा सडा आणि अपरिचित सुगंध आला;पण ते झाड असं स्वप्नवतच वाटायचं.मोबाईल,नेट असलं काही नसल्याने ते सर्च करून बघण्याचा प्रश्न देखील नव्हता त्यामुळं कुठंही बकुळीचा उल्लेख आला की डोळ्यांपुढं मोठा वृक्ष आणि त्याचा खाली पडलेला सडा असं दृश्य यायचं.पुढं कुठंतरी वाचनात आलं की बकुळ झाड कोकणात असते, मग तर त्याला बघण्याची आशा मावळली.स्वच्छ सुंदर गाव स्पर्धेत हातनूर गावाची बातमी वाचत असताना बकुळीच्या झाडाचा उल्लेख आला.शाळेच्या कॅम्पेनिंगला गेल्यावर चौफेर,रस्त्याकडेला कुठं बकुळ झाड दिसतेय का बघितलं.पण ते झाड कसलं असतंय माहीतच नव्हतं त्यामुळं ते शोधूनही उपयोग नव्हता. आता मोबाईल आल्यावर ‘दुर्मिळ झाडे व प्रजाती’ या फेसबुक ग्रुपवर बरीच झाडे,वेली ,फुले पाहण्याचा योग आला त्यातच बकुळीची फुलं न झाड बघायला मिळाले.
परवा अंगणात खारुताईने आकर्षक छोटी छोटी केशरी फळे टाकल्याचे बघितले पण ती कशाची असावीत ?कळले नाही.आमच्या कॉलनीत रस्त्याकडेला एकसारखीच झाडे बघून एकीला विचारलं,’ही एकसारखीच जंगली झाडं का बरी लावली असतील?’त्यावर ती म्हणाली,”अहो यातली दोन जंगली आहेत आणि बाकी बकुळीची आहेत?”काय?मला आश्चर्याचा धक्काच बसला.क्षणभर ‘युरेका!युरेका!करून ओरडावं की काय?असंच वाटलं.मी जवळ गेले.असंख्य कळ्यांनी नि केशरी फळांनी भरलेलं झाड बघून मला अत्यानंद झाला.मनात म्हणलं,”इतके दिवस तुला शोधत होते पण इतक्या जवळ असून देखील तू मला हुलकावणीच देत राहिलास ते केवळ तुला कधी न पाहिल्यानेच!मस्त धुंद करणारा सुवास घेतल्यावर वाटलं,देवघरात ही ओंजळभर फुलं ठेवल्यावर कशाला हवी कृत्रिम उदबत्ती?तसेही देवाने इतकी सुगंधित फुले निर्माण केली आहेत की खरेच त्याला उदबत्ती आवडत असेल का?हा प्रश्नही चाटून गेला.मला अगदी कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.किती वर्षे याच्या भेटीसाठी वाट पहावी लागली!
“मधूघट भरले तुझ्या दारी,का वणवण फिरशी बाजारी?”
अशीच काहीशी माझी अवस्था!आता दररोज त्या कळ्या फुलण्याच्या प्रतीक्षेत होते.मन:चक्षुपुढे पुन्हा त्या असंख्य कळ्या फुलून झाडावर चांदण्या सांडल्याचे भासमान दृश्य आले.पण अति उन्हामुळं किंवा कमी पावसामुळं असेल,माझी ही मनीषा पूर्ण झाली नाही,मात्र दररोज सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळी झाडाजवळून जाताना मंद धुंद सुगन्ध भरभरून लुटताना मन कसं प्रसन्न,खुश होतेय!
याच जन्मात मला बकुळीचं झाड भेटलं न कविना त्याची भुरळ का पडली असावी याचं इंगितही कळलं.
आता पावसाळ्यात अंगणात बकुळ नक्कीच लावणार आणि कधीतरी ते असंख्य चांदणफुलांनी डवरलेलं झाड पाहण्याचं स्वप्न पुरं करणार.बघू,कृष्ण खरेच ते भाग्य भाळी लिहितोय का?
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈