सौ शालिनी जोशी
विविधा
☆ शब्द… ☆ सौ शालिनी जोशी ☆
आज काहीतरी लिहिण्याची हुक्की आली. पेन व कागद घेऊन बसले. पण काय लिहावे? विषय कोणता असावा? निसर्गावर लिहावे का अध्यात्मावर लिहावे? मन एकच पण त्याचेही एकमत होत नव्हते. आपण लिहितो ते शब्दात. शब्द तयार होतात अक्षरातून. अक्षरे म्हणजे स्वर आणि व्यंजने. त्यालाच वर्णमाला म्हणतात. प्रत्येक भाषेत त्याची संख्या वेगळी मराठीत 52 तर इंग्रजीत 26. हे वर्ण कशातून तर ओंकारातून असे सांगितले जाते. ओंकार म्हणजे तीन मात्रा (अ, उ, म )आणि अर्ध मात्रा म्हणजे वरचा चंद्राकार. यातून सर्व वर्णमाला. पण ओंकार तरी कुठून आला? तर हा परब्रह्मवाचक शब्द. त्या निर्गुण निराकाराचे व्यक्त रूप. म्हणून त्याला परब्रम्हची सही म्हटले जाते. आपलीही सर्व कामे सहीनेच होतात. म्हणजे शब्दाचे मूळ त्या परब्रम्हाचे ठिकाणी. तोच शब्दाचा अर्थ. आपण मात्र त्याला वेगवेगळ्या अर्थ देतो.
येथे एक गोष्ट आठवली. एक छोटी मुलगी होती, पाच सहा वर्षांची असेल. रोज नित्य नेमाने देवळात जाऊन देवापुढे उभी राहत असे. हात जोडून डोळे मिटून काहीतरी हळू आवाजात तुटपुटत असे. पुजार्याला उत्सुकता होती, ही रोज काय म्हणत असेल? देवाकडे काय मागत असेल? म्हणून त्याने त्या मुलीला सहज प्रश्न विचारला’ बाळ तू देवाकडे रोज काय मागतेस?काय म्हणतेस?’ तिचे उत्तर आपणा सर्वांनाच विचार करायला लावणारे आहे.
ती म्हणाली, ‘मला स्तोत्र, मंत्र म्हणजे काय कळत नाही. मला काही येत नाही. म्हणून मला येणारी सर्व अक्षरे अ आ इ ई….. आणि क ख ग…. मी रोज देवापुढे शांतपणे म्हणते. आणि देवाला सांगते यातून तू तुला पाहिजे तो आवडेल तो मंत्र किंवा स्तोत्र तयार करून घे. ‘आणि देव माझ्याकडे पाहून हसतो. मला आनंद होतो. गोष्ट छोटीशीच पण केवढे तत्त्वज्ञान सांगून गेली.
पूजेची तयारी नाही, देवाला आवडती फुले नाहीत, आरती येत नाही म्हणून आपण पूजा करायचे टाळतो. पण देवाला कशाचीच गरज नाही. तोच सर्व निर्माण करणारा, त्याचे त्याला देऊन आपण काय साधतो? तेव्हा त्याची पूजा म्हणजे आपला भाव आपला अहंकार त्याला अर्पण करणे. त्यासाठी शब्दांची गरज नाही. मी पेन खाली ठेवले.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
खूप छान विचार मांडले लेखांमधून