☆ विविधा ☆ शेवटची पंगत ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

एकत्र कुटुंबांमधल्या कर्त्या बायकांची पंगत म्हणजे शेवटची पंगत.  हिंगणघाटला माझ्या आजोळी आणि विजापूरला परमपूज्य अण्णांच्या घरची… अशा दोन्ही घरच्या शेवटच्या पंक्ती माझ्या सवयीच्या आणि त्या पंक्तींमधले जेवण तर अतिविशेष आवडीचे.

माझ्या लहानपणी आजोळी खूप माणसे असायची.  त्यामुळे पहिली पंगत मुले आणि बाहेर कामासाठी जाणा-या पुरुषांची,  नंतरची लेकुरवाळ्या मुली आणि सुनांची.. आणि सर्वात शेवटी स्वैपाक करणा-या बायकांची म्हणजे आजी, मामी वगैरे लोकांची.  कधी कधी तर या पंक्तीला इतका उशीर होई की पहिल्या पंक्तीत जेवूनही शाळेला सुट्टी असलेली पोरे परत त्या शेवटच्या पंक्तीत परत जेवायला बसत. सणासुदीला तर असे हमखास होई.

या पंक्तीत अनेकदा भाज्यांनी आणि भाताने तळ घातलेला असे.  कधी पोळ्याही पुरेशा नसत. माझी सदा हसतमुख आजी म्हणे… चांगला झाला असणार स्वैपाक…  म्हणून सर्व भरपेट जेवले!  असे म्हणत ती विझू घातलेल्या निखा-यावर तवा ठेवून  पटकन होणा-या भाज्या किंवा पिठलं करी,  त्यात तेल,  तिखट आणि मसाले सढळ हाताने पडे शिवाय त्या शेतातून नुकत्याच आलेल्या त्या ताज्या रसदार भाज्या अर्धवट शिजल्या तरी खूप चवदार लागत.  उरलेल्या वरणावर थोडे तेल,  मीठ,  तिखट आणि मसाला घालूनही एखादे कालवण होई.

पोळ्याच्या परातीत उरलेल्या पीठात थोडे ज्वारीचे पीठ घालून त्यात मिरच्या कोथिंबीर घालून चुरचुरीत खमंग धिरडे करत.  त्याचा वास थेट झोपलेल्या आजोबांच्या नाकात जाई आणि तेही उठून स्वैपाकघरात येत. एकदा जेवल्यावर ते काही पुन्हा जेवत नसत पण मग तिथेच एका पाटावर बसून काहीबाही मजेच्या गोष्टी सांगून सर्वांना हसवत.   आजी ठेवणीतली लोणची काढी.  भाताच्या खरपूडी लोणच्याबरोबर कालवताना पाहून आजोबा हमखास सूर्याच्या थाळीची गोष्ट रंगवून रंगवून सांगत.

त्या पंक्तीत जेवणा-या बायकांसाठी सुबक विडे लावून देत.

दुस-या दिवशी स्वैपाकाच्या अगोदर आजीला बोलावून…थोडे तांदूळ,  डाळ,  कणिक आणि भाज्या जास्तीच्या घ्यायला आवर्जून सांगत.

विजापूरच्या त्या श्रीमंत घरातही मोठ्या बायकांची शेवटची पंगत असे. या पंक्तीला आक्का,  वहिनी,  वाढणा-या मुली,  स्वैपाकाच्या काकू आणि सगळ्या कामाच्या बायका एकत्र बसत. त्या घरी फारसे काही संपलेले नसे पण अन्न गार झालेले असायचे.  कोशिंबिरींनी माना टाकलेल्या असत  तरी मालकीणींपासून ते नोकरवर्गापर्यन्तच्या बायका समाधानाने जेवत.  त्यांच्याकडे या पंक्तीला आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे फ्लाॅवरच्या पानांची चटणी,  ती पण फ्लाॅवरची भाजी केली असली तरच होई. फ्लाॅवरची पाने चिरताना बाजूला काढून ठेवलेली असत. ती बारीक चिरून त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट आणि किंचित मीठ घालत.  त्यावर लिंबू पिळून तांबड्या मिरच्यांची फोडणी देत. सगळ्या बायकांचा तो अगदी आवडता पदार्थ होता.

आज मी एकटीच जेवत होते अचानक या दोन्ही ठिकाणच्या शेवटच्या पंक्ती आठवल्या आणि गलबलल्यासारखे झाले.

अनेक प्रश्नांनी मनात काहूर माजवले वाटले, अन्नपूर्णेच्या हातातल्या त्या ओगराळ्याची दिशा कायम दुस-यांच्या पोटात ताजे घास पडावेत म्हणून… तिच्याकडे ते कधीच का नाही पहिल्यांदा वळत?  सर्वाना गरमागरम खायला घालून स्वतः मात्र  गारढोण अन्न गिळताना… वरवर समाधानाचा आव आणला तरी घशात किती आवंढे दाटत असतील!  भाजी संपली म्हणून लोणच्याबरोबर भात कालवताना…माझ्या वैद्यकी जाणणा-या आजीला स्वतःच्या तब्बेतीची हेळसांड केल्याबद्दल किती वेदना होत असतील…!

अर्थात हे सर्व विचार आत्ता मनात आलेत.  पण हिंगणघाटला असताना त्यांच्या त्या लोणचे भात आणि धिरड्यात वाटा मागताना यातले काही सुध्दा वाटत नसे.

आता विभक्त कुटुंबात सगळे एकत्र जेवत असले तरी शेवटचे.. उरले सुरले संपविण्याचा मक्ता त्या घरातल्या बाईकडेच!  त्यामुळे सर्वांनी हात धुतले तरी ही आपली अजून डायनिंग टेबलावरच बसलेली असते. एकत्र कुटुंबात निदान त्या पंक्तीला इतर बायका तरी असत…आताची शेवटची पंगत तशी सर्वार्थाने तिची एकटीचीच…!

 

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments