☆  विविधा ☆ शिशीर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

माझ्या मते ऋतुचक्रातला शेवटचा, ऋतु म्हणजे शिशिर ऋतु!!

या वर्षी २१ डीसेंबरच्या मध्यरात्री पासून सुरु होऊन १७ फेब्रुवारी पर्यंत ढोबळ मानाने शिशीर ऋतुचा काल आहे.. थोडेसे या ऋतूविषयी…

असं मानलं जातं की,वसंत,ग्रीष्म आणि वर्षा हे देवींचे ऋतु तर शरद ,हेमंत,शिशीर हे पितरांचे ऋतु.काडाक्याची थंडी, कधी घनदाट धुके,धवल दिशा आणि ऊज्वल धरती हेच शिशीराचे रुप! जणु पृथ्वी आणि आकाश यांचे एकतत्व!!

भरपूर ऊर्जा देणारा ऋतु म्हणजे शिशीर ऋतु!! या कालात सूर्यकिरणांत अमृततत्व असते. आणि वनस्पती,फळं, भाज्या,या सर्वांमधे याच तत्वांचा समावेश झाल्यामुळे त्या अधिक स्वस्थ्यवर्धक बनतात.

शिशिर ऋतु म्हणजेच शीतऋतु. हलक्या गुलाबी थंडीचा हेमंत सरतो  आणि कडक थंडीच्या शिशिराची चाहुल लागते.या दिवसात गोड आणि स्निग्ध पदार्थांचा आहार योग्य मानला जातो. त्यामुळे या काळात येणारे सण, विशेषत: माघी गणेश जयंती, सोमवती अमावस्या, मकर संक्रांत साजरी करत असताना तीळ आणि गुळाचे सेवन हे फार महत्वाचे ठरते.

माघ आणि पौष महिन्यात तिळ—गुळाचे दान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. खरं म्हणजे आपले ऋतु आणि आपले सर्वच सण यांच्या केंद्रस्थानी धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचेच अधिष्ठान असते. शिवाय या संकेताच्या माध्यमातून संस्कृती,परंपरा जपण्याबरोबरच परस्परांमधले प्रेम,आपुलकी, जिव्हाळा, नात्यांची जपणूक, याचाही पाठपुरावा असतो.

“तिळगूळ घ्या अन् गोड बोला..” हा प्रेमाचा, वैरभाव दूर करण्याचा, एक महान संदेश शिशिर ऋतु देत असतो!!

खरं सांगायचं, म्हणजे सृष्टी आणि मानवी जीवन हे एकात्म आहेत. सृष्टी ,निसर्ग हा मानवाचा महान गुरु आहे. बदलते ऋतुचक्र हे मूळातच जीवन कसं असावं, जगण्याचे नियम कोणते याचीच शिकवण देते. ही शिकवण शरीराबरोबर मनही घडवत असते.मनावरच्या संस्कारासाठी हवा फक्त निसर्गाशी जाणीवपूर्वक संवाद!! जगतानाची डोळस दृष्टी!

शिशिर ऋतुला पतझड अथवा पानगळीचा ऋतु असेही संबोधिले जाते. कारण या ऋतूत शुष्कता वाढलेली असते.झाडांवरची पानं पिवळी पडुन ती गळून जातात .. म्हणून पानगळ!! पण यामागचा निसर्गाचा नियम समजून घेण्यासारखा आहे.पानाद्वारे जे पाण्याचे शोषण होते त्याला अवरोध करण्यासाठी ही पानगळ असते. धरतीचं यौवन राखण्याची ती धडपड… परिपूर्ण आयुष्यन जगल्यानंतर आनंदाने गळून जाणं आणि मातीत मिसळणं, आणि  नव्या पालवीला बहरु देणं हा सृष्टीचा नियम!!नियम पाळण्याची ही तटस्थता निसर्गाकडुनच शिकायला मिळते!

किती सुंदर संदेश! रात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल!!

जुनं जाऊद्या मरणालागुनी…।

विरक्ती म्हणजे निष्क्रियता नव्हे. निर्विकारताही नाही. आसक्तीविरहीत जगणं आणि मरणं म्हणजेच विरक्ती. या खर्‍या विरक्तीचं दर्शन शिशिर ऋतुतील ,सूर्याच्या ऊत्तरायण काळातल्या पानगळीच्या रुपानं होतं…. स्थित्यंतर हा निसर्गाचा स्थायी भाव!  आणि त्याची सकारात्मक स्वीकृती हा सृष्टीचा नियम!!थंडी, वारा, ऊन, पाऊस, आर्द्रता, शुष्कता , तेज,तम ही सारीच निसर्गाची रुपे! जी मानवाच्या जीवनाशी निगडीत आहेत… सहा ऋतुंची सहा रुपे! शिशिरात या ऋतुचक्राची समाप्ती होऊन नवा वसंत येतो! नवे चक्र. नवा बहर. मिटणं, गळणं तितकच महत्वाचं जितकं ऊमलणं, बहरणं.

अनुभवांची शिदोरी मागे ठेऊन एखाद्या वृद्धासारखा आनंदाने निरोप घेणारा, हा पानगळीचा शिशिर ऋतु मला वंदनीयच वाटतो!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments