☆ विविधा: स्फुट लेख – सुश्री अनुराधा फाटक   ☆

संध्याकाळची वेळ होती.मी अंगणात तांदूळ निवडत बसले होते.

‘काय करताय काकू?’ म्हणतच शेजारची रमा माझ्याजवळ येऊन बसली .

‘रिकामा वेत्र आहे. दुसरं काही काम नाही म्हणून बषले आपली तांदूळ निवडत पण तू आता इथं कशी?’

‘उद्या दहावीचा रिझर्ल्ट असल्याचे आता बातम्यात सांगितले आणि एकदम टेन्शन आलं काही सुचेना आले तुमच्याकडं ‘ तांदळात हात घालत रमा म्हणाली.

‘इतकं कसलं टेन्शन घ्यायचं? तुम्ही अलिकडची मुलं म्हणजे..कशाचं टेन्शन घ्याल काही कळत नाही.

‘काकू, सध्या आमच्याकडंच प्रत्येकाचं लक्ष आहे. किती मार्कस मिळतील? पुढं काय करायचं ?याचा विचार आमच्यापूक्षा आमचे आईवडीलच करतात.आता बाबा ऑफिसमधून आले की तोच विषय घरात असणार’

रमा बोलत असतनाच रमाच्या आईची हाक आली. पटकन तांदळातला हात काढून रमा घरी गेली.मीही शरद येईपर्यंत स्वयंपाक व्हायला हवा म्हणत उठलेरात्रीची जेवणं झाली.सर्व आवराआवरी करून मिही अंथरुणाला पाठ टेकली. आणि रमा नजरेसमोर आली.

‘आमचा विचार आमच्यापेक्षा आमचे आईवडीलच करतात’

रमाचं ते वाक्य आठवलं आणि मला आमचं शालेय जीवन आठवलं शाळेत नाव घातलं की आईवडिलांची जबाबदारी संपायची. शाळेसाठी लागणारी वह्या पुस्तके, भरावयाची फी याची आठवण केली तरी वडील ओरडायचे. कधी जुनी पुस्तके मिळायची कधी तीही नसायची, वह्याचे तेच.. फी थकलेली असायची. सारखं विचारलं की, शाळा सोडा हे उत्तर ठरलेलं असायचं.मग आमचे प्रश्न आम्हीच सोडवायचो. कुणाची तरी पुस्तकं, पाठकोऱ्या वह्या वापरून अभ्यास व्हायचा, वरच्या वर्गात जायचो.. पण त्यामुळं आम्ही स्वावलंबी झालो.सुटीत काहीतरी उद्योग करून शाळेची तयारी व्हायची. परीक्षेचे तेच घरात परीक्षा झालेली कळायची नाही की निकाल लागलेला. तरीही आम्ही शिकलो. आता सर्वच बदलंल. मुलांच्या आधी पालकानाच सगळी घाई!

‘आई, झोपायचं नाही कां?’

शरदच्या आवाजाने भानावर आले घड्याळ बघितले.बराच उशीर झाला होता आज रमाचा रिझर्ल्ट! असं म्हणतच मीशरद ऑफिसला गेला तसं भरभर घरातलं आवरलं.केव्हा एकदा रमाला भेटत्येय असं मला झालं होतं.’ रमा नक्कीच चागल्या मार्कानी पास झाली असणार. तिला काहीतरी घेऊन जावं.. नको काय हवं ते तिलाच विचारावं. ‘स्वतःशी बोलतच मी रमाचं घर गाठलं. मी दरवाजाला हात लावताच नुसता पुढं ओढलेला दरवाजा लगेच उघडला.घरातलं वातावरण

एकदम शांत होतं. स्वयंपाक घरातल्या आवाजाने रमाची आई

स्वयंपाकघरात असल्याचे सांगितले आणि मी इकडंतिकडं न बघता स्वयंपाक घरातच गेले.

‘काय चाललयं?’

रमाची आई स्वयंपाक करताना दिसत असतानाही मी विचारलं.

तसं त्यानी माझ्याकडं वळून बघितलं. त्यांचा चेहरा उतरलेला होता.

‘काय झालं?’

रमाच्या आईजवळ जात मी विचारलं.

‘आमची रमा..’ डोळ्याला पदर लावत त्या म्हणाल्या.

‘कुठं आहे रमा?’ मी तिच्यासाठीच म्हणजे तिचं अभिनंदन करण्यासाठीच आले.’

‘कसलं अभिनंदन आणि कसलं काय? दार लावून बसली आहे ती आपल्या खोलीत. किती वेळ झाला. मी हाका मारल्या पण ती दारच उघडत नाही. काय करायचं हो शरदची आई? ‘मार्कस फार कमी पडले कां?’

नव्वद टक्के मिळाले. पण तिच्या वडिलांची तिच्याकडून यापेक्षा जास्त अपेक्षा होती. त्यांच्या ऑफिसमधल्या शिपायाच्या मुलाला नव्व्याण्णव टक्के मिळाले आहेत त्यामुळं त्याना ते कमी वाटले ‘

मी पटकन तिच्या खोलीजवळ जाऊन तिला हाक मारली. माझा आवाज ऐकताच तिनं दार उघडलं.रडूनरडून तिचे डोळे लाल झाले होते.

‘रमा, तुझे मार्कस चांगले आहेत मी तुला बक्षीसही देणार आहे’

मी असं म्हणताच रमा पटकन माझ्या गळ्यात पडून रडू लागली. थोडावेळ मी तिला रडू दिलं ती शांत होताच मी म्हणाले,

‘इतकं वाईट वाटून घ्यायचं नाही. तू लहान असल्यापासून तुझी हुशारी मी बघत आहे आणि मार्कसही वाईट नाहीत’

पण बाबा..’

‘मी सांगते बाबांना, तुझ्यामुळं तुझी आईही.. जा तोंड धू. दोघी जेवा. संध्याकाळी तुझे बाबा आल्यावर मी तुझे बक्षीस घेऊन येते’ रमाची समजूत काढून मी घरी आले पण रमाचेच विचार मनात होते.

रमा सर्व क्षेत्रात हुशार! शाळेतील सर्वांगीण विकासाचे बक्षीसही तिला मिळाले होते पण हल्ली मुलांच्याऐवजी मुलांच्या पालकांच्याच आपल्या मुलांकडून अपेक्षा वाढल्या आहे. मुलांची आवड, कुवत याचा विचारच केला जात नाही. दहावीत असतानाही स्वतःच्या इच्छेने रमाने वेगवेगळ्या स्पर्धात भाग घेतला होता, नंबरही मिळवले होते. ती केवळ पुस्तकातला किडा नव्हती. याचा विचार न करता  तिच्या वडालांनी कमी मार्क मिळाले म्हणून दुखवले होते. हे मलाही पटले नाही. दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्याचे सर्वस्व नाही.पुढच्या शिक्षणासाठी कॉलेजला प्रवेश मिळण्यासाठी ते पुरेसे होते.शिपायाच्या मुलाचे मार्क नक्कीच कौतुकास्पद पण याचा अर्थ रमाचे मार्कस कौतुकास्पद नाहीत असे होत नाही. उलट अशा पालकांनी आपल्या मुलांचे अधिक कौतुक करून त्याना प्रोत्साहन दिले पाहिजे आताच्या काळात पुस्तकी शिक्षणाच्या बरोबरीने इतर कलांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणून आपल्या अपेक्षेपेक्षा मुलांची आवड महत्त्वाची समजून त्याना जे हवे ते द्यावे प्रत्येकवेळा आमच्यावेळी असे नव्हते म्हणून मुलांना नाराज करू नये. या विस्तारलेल्या जगात त्याना त्यांच्या पंखानी उडू द्यावे

© सुश्री अनुराधा फाटक

मोबाइल – 9011058658

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

सुस्वागत आणि धन्यवाद.
आपल्या लेखनाविषयी मी काय लिहावे?
तरीसुद्धा ,लेख खरच छान व मार्गदर्शन करणारा आहे.
आपल्या लेखनाचे स्वागतच आहे.