डाॅ. मेधा फणसळकर
☆ विविधा ☆ सलीलप्रवाहात डोकावताना…. ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆
आम्ही टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील सर्व कलाप्रेमी वैद्य लोक कॉलेजमध्ये असताना एका कलासक्त, संस्कृत विषयाच्या प्राध्यापिक असणाऱ्या “ माधवी पटवर्धन” या व्यक्तिमत्वाबरोबर कलेच्या माध्यमातूनच जोडल्या गेलो. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या आम्हा मुलांमधील कलेच्या ओढीला हलकेच साद घालत सुरु केलेले कलामंडळ म्हणजे एक आनंदाचे झाड होते. तेच झाड पुन्हा एकदा अतुलच्या प्रयत्नाने पुन्हा बहरले. आम्ही ऑनलाईन भेटू लागलो आणि जवळजवळ वीस वर्षांनी ते मैत्र पुन्हा एकदा उजळले. त्यातीलच कालचे पुष्प म्हणजे ‛ सलील कुलकर्णी’ यांच्याशी झालेल्या गप्पा! सलीलप्रवाहात डोकावताना आलेली अविस्मरणीय क्षणाची अनुभूती!
सलीलजींच्या भाषेत सांगायचे तर “ विकिपीडियावर जे नाही ते ज्ञान केवळ आजी- आजोबांकडे आहे आणि अशा अनुभवाच्या पायाशी नेहमी बसावे” आम्हीही काल असाच काहीसा अनुभव घेतला. आणि एक संपन्न अनुभवाचा, विचारांचा खजिना आम्हाला गवसला.
सलीलजींच्या गाण्यातून, लेखनातून आणि वेगवेगळ्या कार्यक्रमातून ते आपल्याला नेहमी भेटतच असतात. पण काल झालेल्या ‛या हृदयीचे त्या हृदयी’ संवादातून हे व्यक्तिमत्त्व अधिकच उलगडत गेले. आज महाराष्ट्रात राहूनही उत्तम मराठी शब्दसुद्धा कानावर पडणे दुरापास्त झाले आहे. अशा वेळी सलीलजींच्या बोलण्यातील शब्दसंपत्ती, सखोल चिंतन मनाला अधिक समृद्ध करुन गेले. ऐकण्याची प्रक्रिया कमी झाली आहे याबद्दल त्यांना खंत वाटते. एखादे गाणे कित्येक वेळा ऐकले तरी प्रत्येक वेळी काहीतरी नवी अनुभूती देते. म्हणूनच ते म्हणतात ,“ गप्पा आणि भाषणामध्ये फरक आहे आणि त्यामुळेच मला गप्पा मारायला आवडतात.” कारण त्यात देवाण- घेवाण आहे. बोलणे आणि ऐकणे या दोन्ही प्रक्रिया त्यात आहेत.
आपले वैद्यकीय शिक्षण आणि कार्यक्षेत्र याची निवड करायची वेळ आली तेव्हा मनाला पटला तोच निर्णय घेतला आणि संगीतक्षेत्र निवडले. हे सांगताना ते म्हटले,“ ज्या गावात राहायचे नाही तिथे बंगला का बांधायचा?” अशा सहज सोप्या उपमा- उदाहरणानी हा सलीलप्रवाह आम्हाला त्यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवत होता.
सातशेच्या वर त्यांनी संगीतरचना केल्या. बरेच वेळा आधी चाल आणि मग त्यावर शब्द सुद्धा बांधले. पण ठिपके जोडून रांगोळी काढण्यापेक्षा एखाद्या मनस्वी चित्रकाराने कुंचल्याच्या सहज मारलेल्या फाटकाऱ्यातून अप्रतिम चित्र उमटावे तसे गाणे आतून आले तरच रसिकांपर्यंत सहज पोहोचते असे त्यांना वाटते.
हृदयनाथ, लता मंगेशकर या नेहमीच त्यांच्या गुरुस्थानी असणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांच्याविषयी भरभरून बोलताना ते म्हणाले,“ झाड जितके मोठे तितका त्याचा विस्तार मोठा! ते ओरबाडण्यापेक्षा त्याचे सतत निरीक्षण करावे आणि ते आपल्या आत रुजवण्याचा प्रयत्न करावा.”
अशाच गप्पा रंगत असताना “पुढच्या पिढीसाठी काय संदेश असेल किंवा काहीतरी उत्तम- अभिजात पुढे रुजावे असा गाण्यातून प्रयत्न असतो का?” असे विचारल्यावर ते लगेच म्हणाले,“ माझ्या मुलांनी काय ऐकावे हे मी ठरवू शकत नाही. पण उत्तम तेच त्यांच्या कानावर पडावे असा विचार कदाचित अंतर्मनात असेल आणि त्यातून जर असे संगीत निर्माण होत असेल आणि त्यातून पुढची पिढी घडली तर जास्त आनंद आहे.”
प्रत्येक गाणे हे खरं तर मूळची एक कविता असते हे आपण जाणतोच. जेव्हा अशा कवितांना संगीतकाराचा परिसस्पर्श लाभतो तेव्हा त्याचे सोने होते. पण त्यातही एक संगीतकार म्हणून त्यांनी एक विचार मांडला जो खरोखरच विचार करण्यासारखा आहे. ते म्हणतात,“ प्रत्येक वृत्तबद्ध कविता चालीत बांधण्याचा अट्टाहास करु नये. काहीवेळा सूरांनी त्याची धार बोथट होते आणि कवितेचा भाव हृदयापर्यंत पोहचू शकत नाही.” एक मनस्वी कलाकारच एखाद्या कालाकृतीकडे इतक्या डोळसपणे बघू शकतो. म्हणूनच या सलीलप्रवाहात डोकावताना खोल असला तरी त्याचा नितळ तळ स्पष्ट दिसत होता. या प्रवाहाची स्वतःची अशी मनोभूमिका, दिशा ठरलेली आहे. आणि ती सखोल चिंतनातून आली आहे. म्हणूनच त्या प्रवाहातून वाहणारा विचारांचा खळखळता झरा काल आम्हाला निखळ आनंदात चिंब भिजवून गेला.
© डाॅ. मेधा फणसळकर
9423019961
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
हा सलील प्रवाह आम्हालाही चिंब भिजवून गेला.खूप चांगले विचार वाचायला मिळाले.मस्तच .