श्री उमेश सूर्यवंशी

? विविधा ?

☆ संविधान – लोकशाहीतील शक्तीमान शब्द ☆ श्री उमेश सूर्यवंशी

एखाद्या शब्दात किती अभूतपूर्व ऊर्जा सामावलेली असते याची प्रचिती मोठी आश्चर्यकारक असते. तो शब्द ..केवळ शब्द नसून तमाम मोठया समूहाचे स्वप्न असते , काटेकोर नियमावली देखील असते. तो एक शब्द असंख्य मोठ्या समूहाला आपल्या जगण्याची हमी पुरवू शकतो. तो एक शब्द राष्ट्र नावाच्या रचनेतून एकदा वगळून टाकण्याची कल्पना केली तरी त्याक्षणी त्या राष्ट्र नावाच्या रचनेचे शतशः तुकडे होत असल्याची व्यापक जाणीव पसरते. तो एक शब्द जेव्हा मोठमोठया समूहांना ऊर्जेबरोबरच हमी व विश्वास पुरवू लागतो तेव्हा तो शब्द त्या लोकसमूहाच्या दृष्टीने अगदी पवित्र होऊन जातो. इतका महत्त्वाचा असा तो शब्द …त्याची नेमकी जाणीव मात्र बहुतांशी समाजमनाला योग्यरित्या नसते ही एक शोकांतिकाच आहे. एका महान वारश्याला लागलेला तो एक अभूतपूर्व असाच शाप आहे.

संविधान….म्हणजे लोकशाही रचनेतील व्यापक लोकसमूहाला जगण्याची हमी पुरवणारा शब्द आहे. संविधान हे एका दृष्टीने त्या लोकशाही राष्ट्रांतील लोकसमूहावर टाकलेली जबाबदारी देखील असते. संविधान नावाचा शब्द जेव्हा व्यापक लोकसमूहाला ऊर्जा , हमी व विश्वास पुरवतो तेव्हा त्या संविधान नावाच्या रचनेला तोलून धरण्याचे , सतत योग्य रितीने कार्यान्वित ठेवण्याचे आणि त्याच्या पवित्रपणाला बाधा येऊ न देण्याची जबाबदारी मात्र त्याच लोकसमूहाला उचलायची असते. संविधान जिवंत आहे तोवर प्रत्येक जनसमूह प्रचंड आत्मविश्वास राखून आपल्या राष्ट्रांप्रती जागरुकता ठेवून एका विशिष्ट पण विधायक नियमावलींना प्रमाण मानून खुशाल जगू शकतो. संविधान जिवंत असते तोवर आपल्या अवतीभवती कितीही वेगवेगळ्या विषमतेच्या रचना उभारल्या जात असल्या तरीही आपल्या जगण्याची हमी देणारी संविधान नावाची रचना उपलब्ध आहे ही भावनाच सर्व अल्पसंख्य समूहाला आश्वस्त करत असते. संविधान जिवंत आहे तोवरच आपल्या राष्ट्रांच्या प्रगतीत सर्वसामान्य माणूस आपला वाटा उचलण्याची उमेद बाळगून जगत असतो. संविधान जिवंत आहे तोवरच आपल्या मतांना व्यक्त करण्याची संधी उपलब्ध असते याची जाणीव होणे आवश्यक आहे. संविधान हा नुसताच शब्द राहत नसतो तर तमाम लोकसमूहाची जगण्याची व जगवण्याची हमी घेऊन उभारलेली पेटती मशाल असते. या मशालीला जिवंत राखण्यासाठी मात्र लोकसमूहाला जागरुकता नावाचे तेल अखंड पुरवत रहावे लागते. ही जागरुकता जेव्हा नष्ट होईल तेव्हा संविधान नावाची पेटती मशाल थंडावत जाईल अन् नष्ट होईल. संविधान नावाचा एक शब्द किती मोठ्या क्रांती प्रतिक्रांतीला जन्माला घालू शकतो आणि मिटवू देखील शकतो याची उदाहरणे जगभर पसरलेली आहेत….” संविधान बचाव ” ही आरोळी एकाचवेळी ” राष्ट्रबचाव व कॉमन मॕन बचाव ” या अर्थाची होऊन जाते ती याकरीताच….

संविधानविना कोणत्याही लोकशाही राष्ट्रांचा गाडा पुढे जाऊ शकत नाही . तो कोणत्या दिशेला घेऊन जायचा आहे याची खबरबात लोकांना लागत नाही . राष्ट्रांच्या जडणघडणीत सर्वाधिक प्रभावशाली भुमिका संविधान नावाचा शब्द अर्थात रचनाच बजावू शकते. संविधान याचकरीता एखाद्या भविष्यकालीन स्वप्नांची मूर्ती बनून समोर उभी असते. त्या पवित्र मूर्तीला कोणतेही कर्मकांड करण्याची जरुरी नसते…आवश्यकता असते ती लोकसमूहाच्या अखंड जागरुकतेची , विधायक जाणीवेची.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments