सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ सखी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

कितीतरी दिवसातून आज

ती स्वतःस विसरुन

त्याच्या जवळ येवुन बसते.

 

आज त्याला जी भेटते.

 

कदाचित बायको नसते

रोजची धुणीभांडी आवरणं सावरणं

असे काहीच नव्हते तिच्या मनात.

आज स्वयंपाक रांधण्याचे पण

बहुतेक नव्हतेच तिच्या ध्यानात .

तो तसा नेहमीप्रमाणेच शांत बसलेला

ऑफिस मधून आल्यावर थोडा थकलेला

तिच्या हातचा चहा पिऊन प्रसन्नही झालेला .

 

आज तिनं त्याला विचारले नाही ,

येताना भाजीपाला आणला का?

सामानाची लिस्ट दुकानात पोहचवली का…

वगैरे वगैरे…काहीच नाही .

 

तोही आज थोडा गोंधळूनच जातो .

चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह देवून

तिच्याकडे एकटक पहातो .

इतक्यात तिच बोलू लागते

आपल्या रोजच्याच बडबडी प्रमाणं

“आज बाहेर वातावरण छान आहे ना

चला बाहेर ओट्यावर बसूया का?”

 

तो अजूनच गोंधळून जातो .

माझी बायको कुठं हरवली

असे स्वतःलाच विचारतो .

 

इतक्यात ती त्याच्या अगदी जवळ जाते

आणि स्वतःचा हात पुढे करते .

त्याचा हात हातात मागते.

ती त्याला बाहेर ओट्यावर नेते

तेंव्हा, एक-एक चांदणी आकाशावर उमटते

पुन्हा तिची बडबड चालू होते

आज ती त्याला ती वेगळीच भासते .

तिच्या बडबडीत

ना त्रुटींची उणिव असते,

ना व्यथांची जाणिव ओघळते .

नुकत्याच उमललेल्या मोगऱ्याच्या

फुलांप्रमाणे तिच्या शब्दातिल गंध

तिला सुगंधित करतो .

नकळत मौन सोडुन तोही

तिच्या मधुर शब्दांना दाद देतो .

दोघांच्या सुखद  संवादानी

वातावरण गंधाळून जाते .

आज बायको नाही त्याला

नविन मैत्रीण भेटली असे वाटते !

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments