सुश्री विभावरी कुलकर्णी
🌸 विविधा 🌸
☆ स्वतःवर प्रेम करा… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
स्वतः वर प्रेम करा..
म्हणजे नक्की काय? आणि याचे फायदे काय?
आपण जसे आहोत तसा स्वीकार करणे.रंग,रूप,उंची,तब्येत,एकूणच व्यक्तिमत्व यांचा स्वीकार करणे.आपण जरा समाजात बघितले तर बरीच माणसे अशी दिसतात की, आकर्षक अशा बाह्य गोष्टी काहीच नसतात.पण तरीही ती यशस्वी असतात.अगदी बरेच दिव्यांग सुद्धा असे असतात की ते इतरांसाठी काम करतात.मग आपणाच आपल्याला का कमी लेखायचे? या साठी एक उपयुक्त वस्तू आहे. ती प्रत्येक घरात अगदी प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असते.ती म्हणजे आरसा.याचा उपयोग कसा करायचा ते बघू.
मिरर थेरपी
सकाळी उठल्यावर प्रथम स्वतःला आरशात बघावे.आणि सुंदर हसून म्हणावे मी स्वतःचा स्वीकार करत आहे.व स्वतःचे आभार मानवेत.ही कृती दिवसातून शक्य असेल तेवढ्या वेळा करावी.या मुळे काय होते? आपले मन स्वतःचा स्वीकार करते.व तसे मनाचे प्रोग्रॅमिंग होते.आणि तशाच सूचना मिळतात. आपण सगळ्या गोष्टी स्वीकारू लागतो.स्वतःला नावे ठेवणे बंद करतो.आपण बरेचदा दोन चेहरे घेऊन जगत असतो.इतरांसाठी आपला वेगळा चेहरा असतो.आणि स्वतः साठी वेगळा चेहरा असतो.त्या मुळे आपल्यावर ताण येतो. हे कमी करणे आपल्याच हातात असते.स्वतः वर प्रेम करणे व स्वाभिमान,अभिमान वाटणे यात फरक आहे.ज्यावेळी स्वतः वर प्रेम करतो त्यावेळी स्वाभिमान वाटतो.स्वाभिमान वाढला तर त्याचे रूपांतर अभिमान म्हणजे गर्व यात होते.यात खूप पुसट रेघ असते.आपल्याला अभिमान व स्वाभिमान सोडून स्वभान आणायचे आहे. त्या साठी स्वतःचा स्वीकार करून स्वतःवर प्रेम करावे.
स्वतःवर प्रेम केले की आपण आनंदी होतो.खोटा मुखवटा धारण करत नाही.स्वतः कडे साक्षी भावाने बघायला शिकतो.त्या मुळे स्वतः मधील गुण व दोष लक्षात येतात.एकदा हे लक्षात आले की आपण दोष कमी करू शकतो आणि गुणांची वाढ कशी होईल या कडे लक्ष देऊ लागतो.आणि अशी गुणी आनंदी असणारी व दुसऱ्यांना आनंदी करणारी व्यक्ती सर्वांनाच हवीशी वाटते.इथे आपल्या बाह्य रूपाचा काहीही संबंध उरत नाही.
हे सगळे फक्त एका साध्या गोष्टीमुळे घडते.आणि ती गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करणे.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈