सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – २ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
सोशल मीडिया विषयी बोलताना आपण फक्त जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात वापरले जाणारे दुसरे माध्यम म्हणजे फेसबुक या विषयी बघू.
आज पहाटे मला एक रिल मुलाने पाठवले.हा एक लोकप्रिय होत असलेला नवीन प्रकार काही सेकंदात आपले म्हणणे दुसऱ्यांच्या गळी उतरवणे कधी विनोद,कधी सावध करणे हे याचे काम.तर या रिल मध्ये एक नवीन फसवणुकीचा प्रकार सांगितला आहे.आपल्याला फेसबुक वर Look who died in an accident असा मेसेज येतो.त्यात एक लिंक येते.त्यावर क्लिक केले की आपले log in चे डिटेल्स विचारतात.ते दिले की आपण out आणि विचारणारा in होतो.आणि आपल्यालाच मोठा अपघात होतो.आपले बँक खाते रिकामे होते.थोडा तपास केला असता दुर्दैवाने यात फसलेले लोक सापडले.
अजून एक उदाहरण मी बघितले.एकीने घरातील लग्न सोहळ्याचे सतत रोज होणारे कार्यक्रम फेसबुक वर टाकले.अगदी फोटो सहित.येणारे लाइक्स बघून खुश झाली.घरी बसल्या बसल्या सर्वांना सगळे कार्यक्रम फोटो,व्हिडिओ याच्या माध्यमातून दाखवू शकली.आणि या वयात मी किती जगा बरोबर आहे ( हम भी कुछ कम नही ) हे ऐटीत दाखवू शकली.मग त्यात सगळेच फोटो,विधी अगदी कव्हर केले.लग्न छान झाले.लग्नात एक आकर्षक पाकीट आले.त्यात हरखून सोडणारे गिफ्ट सगळ्या फॅमिली साठी चार दिवसाची ट्रीप मिळाली अगदी तिकिटे सुद्धा मिळाली. मंडळी खूप आनंदली.लगबगीने तयारी करून निघाली.आणि या मॅडमचे फेसबुक वर अपडेट सुरू झाले.प्रवासाचे फोटो येऊ लागले.सगळे डिटेल्स आम्हाला कळू लागले.मोठ्या आनंदात घरी आले.बघतात तर घर पूर्ण रिकामे.आंघोळीची बादली सुद्धा घरात राहिली नव्हती.हे घरातील फेसबुक वर केलेले प्रसारण किती महागात पडले?
अशा फसवणूका पण मोठ्या प्रमाणावर चालू आहेत.यात चोरांना आपणच माहिती पुरवतो.ते फक्त त्यांची थोडी हुशारी वापरतात आणि आपल्याला अद्दल घडवतात.
एक घटना तर मन बधीर करणारी समजली.एका घरात राहणारी चार माणसे.घरातील वयस्कर आजोबा वारले.मुलाने ही बातमी सगळी कडे टाकली अर्थातच सोशल मीडिया वर. सांत्वन करण्यासाठी भरभरून संदेश आले.पण प्रत्यक्ष एकही माणूस फिरकला नाही.शेवटी ८/१० तास उलटून गेल्यानंतर इमारती समोर भाजी विकणारा भाजीवाला त्याचे मित्र घेऊन मदतीला आला.
काही मंडळी तर अशी आहेत की घरात आणलेले/ केलेले किंवा आत्ता जे खायचे ते पदार्थ देवाला नैवेद्य दाखवावा त्या प्रमाणे मोठ्या निष्ठेने फेसबुक वर पोस्ट केल्या शिवाय खात नाहीत.
मला तर हा प्रश्न पडतो आपणच आपले आयुष्य इतके सार्वजनिक ( जुन्या काळातील भाषेत सांगायचे तर चव्हाट्यावर मांडणे ) का करतो?
या काही घटना व सध्या फेसबुकवर जे सगळे बघायला मिळते ते बघून मन सुन्न होते.आणि वाटते समोरा समोर माणसांशी न बोलणारे आपण कुठे चाललो आहोत?कुठे पोहोचणार आहोत?आणि नवीन पिढीला कोणते संस्कार देणार आहोत?
हे सगळ्या घटनांनी माझ्या मनात अनेक तरंग उमटले.तरंग कसले वादळच उठले.आणि वाटले आपल्याच मंडळींना थोडे सावध करावे.नाहीतरी विष हे प्रत्येकाने थोडेच अनुभवायचे असते? त्या वरचे लेबल किंवा कोणी सांगितले तर आपण विश्वास ठेवून त्या पासून दूर जातोच की.तसेच लेबल दाखवण्याचा मी थोडा प्रयत्न केला.
माझी अगदी मनापासून विनंती आहे.ही सगळी साधने जगाची माहिती मिळवणे.परदेशातील आपल्या व्यक्तींशी संपर्क साधणे.चांगले विचार,चांगले कार्य यांचा प्रसार करणे.अशा कारणांसाठी करावा.माझी आजी कायम म्हणायची आपण आपलं जपावं आणि यश द्यावं घ्यावं हे अगदी पटते.
एक गाणे आठवते सावधान होई वेड्या सावधान होई आणि हीच सर्वांना विनंती आहे.
धन्यवाद
© सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈