श्री विश्वास विष्णु देशपांडे
विविधा
☆ स्वदेशीचा जादू… भाग – २ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
योग आणि आयुर्वेद
आपल्या देशात आणि आपल्या राज्यात स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या वस्तू, वनस्पती, फळे, फुले या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात. म्हणूनच जाहिरातबाजीच्या मागे लागून विदेशी वस्तू वापरण्यापेक्षा स्वदेशी वस्तू वापरणे कधीही चांगलेच. स्वदेशी चळवळीचे एक महान प्रचारक आणि अभ्यासक राजीव दीक्षित यांनी आपले संपूर्ण आयुष्यच त्यासाठी वाहून घेतले होते. स्वदेशी चळवळीला त्यांनी योग आणि आयुर्वेद यांची जोड दिली होती. घरात विशेषतः स्वयंपाकघरात असणाऱ्या अनेक वस्तूंचा आपल्या आरोग्यप्राप्तीसाठी वापर कसा करून घेता येईल हे त्यांनी अनेक रुग्णांवर प्रयोग करून सप्रमाण सिद्ध केले. घरात असणाऱ्या हळद, दालचिनी, मिरी, लवंग या सारख्या मसाल्याच्या वस्तू तसेच मेथी, खाण्याचा चुना, मीठ यासारख्या अनेक गोष्टींचे अनेक आजारांवर उपयोगी पडणारे गुणधर्म सांगितले. या सगळ्या गोष्टींचा वापर करून आज बाजारात अनेक औषधे आणि सौंदर्यप्रसाधने उपलब्ध आहेत आणि ती आपण घरच्या पदार्थांचा वापर न करता अत्यंत महागड्या किमतीने विकत घेतो.
मीठ, साखर,बेकरी पदार्थ, फ्रिज आणि फ्रिजमधील वस्तू यासारख्या गोष्टींच्या अतिवापरापासून दूर राहा असेही राजीव दीक्षित यांनी निक्षून सांगितले. तरी घरात मोठा फ्रिज असणे ही आम्ही प्रतिष्ठेची बाब समजतो. रोज मिळणाऱ्या ताज्या भाज्या आणि तयार झालेले अन्न लगेच खाल्ले तर फ्रिजची फारशी गरज राहणार नाही. आजचे आधुनिक संशोधन सुद्धा या सगळ्या गोष्टींचा वापर आरोग्यासाठी चांगला नाही हेच सांगते.
आपला आयुर्वेद आणि योगशास्त्र ही भारतीयांनी जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. पण आपल्या एखाद्या गोष्टीचा जेव्हा परदेशात अभ्यास केला जातो, आणि त्याचे महत्व ते लोक जेव्हा आपल्याला सांगतात, तेव्हा आपल्याला आपल्या प्राचीन गोष्टींचा, परंपरांचा त्या चांगल्या आहेत असा साक्षात्कार होतो. आज भारतातील आयुर्वेद आणि योग यांचे महत्व जगाने मान्य केले आहे. आयुर्वेदाचा उपयोग विदेशात विशेषतः अमेरिकेत एक पर्यायी औषधपद्धती म्हणून केला जात आहे. योग आणि आयुर्वेद ही परस्परपूरक शास्त्रे असून त्या जीवन जगण्याच्या पद्धती आहेत. त्यात मन, शरीर आणि आत्मा यांचे संतुलन साधले जाते.
आयु म्हणजे आयुष्य किंवा जीवन आणि वेद म्हणजे शास्त्र. आयुर्वेद हे जगण्याचे शास्त्र आहे. आयुर्वेद हे शास्त्र अतिप्राचीन असून त्याचा उल्लेख ऋग्वेदात आढळतो. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे प्रणेते मानले जातात. आयुर्वेदात पुढे चरक, सुश्रुत, वाग्भट आदी महर्षींनी संशोधन करून मानव जातीवर अनंत उपकार करून ठेवले आहेत. याच महर्षींच्या ग्रंथांचा अभ्यास आजही आयुर्वेदाच्या अभ्यासकांना होतो आहे. सुश्रुत यांना तर सर्जरीचे जनक मानले जाते. त्यांच्या ‘ सुश्रुत संहितेत अनेक शस्त्रक्रियांचे वर्णन आले आहे. सृष्टीमध्ये कार्यरत असणारे पृथ्वी, आप, तेज, वायू, जल आणि आकाश या पंचमहाभूतांचा आपल्या आरोग्यावर पडणारा प्रभाव याचा अभ्यास त्यात आहे. त्यानुसार कफ, पित्त, वायू या शरीरातील प्रकृतीचा विचार त्यात आहे.
आयुर्वेद केवळ रोगाच्या लक्षणांचा विचार करून उपचार करीत नाही, तर रोगाचे मूळ कारण शोधून त्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करतो. प्राचीन काळात जे परदेशातील व्यापारी आणि पर्यटन करणारे लोक भारतात आले, त्यांनी आपल्याबरोबर भारतातील हे आयुर्वेदाचे ज्ञान नेले. त्यांच्या बऱ्याच औषधोपचार पद्धतींवर भारतीय आयुर्वेदाचा प्रभाव त्यामुळेच दिसतो. आयुर्वेदाची शास्त्रशुद्ध जपणूक करून प्रसार करण्याचे कार्य केरळ सारख्या राज्यात मोठ्या प्रमाणावर होते. अनेक देशी विदेशी पर्यटक त्याचा लाभ घेतात. महाराष्ट्रातही अनेक नामवंत वैद्यांनी ही आयुर्वेदाची परंपरा जपली आणि वाढवली.
अर्थात वैद्यकीय क्षेत्रात आज अनेक शोध लागताहेत. अनेक आजारांवर संशोधन होते आहे. अलोपथीतील उपचार आणि शस्त्रक्रियांमुळे अनेक रुग्णांना जीवघेण्या आजारातून जीवदान मिळाले आहे. विविध रोगांवर शोधल्या गेलेल्या लशींमुळे लाखो लोकांचे प्राण जगभर वाचले आहेत. त्यामुळे दोन्ही पॅथी आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. असे असले तरी या दोन्ही उपचार पद्धतींचा मेळ घालून त्यांचा वापर तारतम्याने करणे योग्य होईल. छोट्या मोठ्या आजारांसाठी आयुर्वेदातील उपचारांचा वापर करून अगदी आवश्यक तेव्हा अलोपॅथी उपचार पद्धती वापरता येईल. आयुर्वेद हा सुमारे सहा हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन असल्याचे पुरावे आहेत. त्यातील संशोधकांनी आपले आयुष्य त्यासाठी खर्ची घातले आहे. आयुर्वेदातील उपचारात रोग पूर्णपणे बरा करण्याची क्षमता असून त्या औषधांचे दुष्परिणाम अलोपथी औषधांच्या तुलनेत अतिशय कमी आहेत.
आपल्याला होणाऱ्या आजारातील सुमारे ऐंशी टक्के आजार हे मनोकायिक ( सायकोसोमॅटीक ) असतात असे संशोधन सांगते. म्हणजेच हे आजार संसर्गजन्य नसतात. योग आणि आयुर्वेद शरीर आणि मन या दोहोंचा विचार करून आपल्याला आरोग्यदायी जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. योग, आसन आणि प्राणायाम यांचे महत्व आज जगाने मान्य केले आहे. 21 जून हा दिवस तर जवळपास संपूर्ण जगात योग दिन म्हणून साजरा केला जातो. योगाचा अभ्यास जगातील अनेक देशात आज केला जातो आहे. आयुर्वेद आणि योग यांच्यात आपल्याला निरामय आरोग्य देण्यापासून ते मोक्षापर्यंत पोहोचवण्याचे अद्भुत सामर्थ्य आहे. योगासने, प्राणायाम, ध्यान आदींच्या साहाय्याने अनेक असाध्य आजारांवर मात करता येते याचा अनुभव आज जगभरातील अनेक लोक घेत आहेत. आजच्या धकाधकीच्या आणि दैनंदिन तणावपूर्ण वातावरणात योग, आसने आणि प्राणायाम अनेक लोकांना आनंदी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करत आहेत. रामदेव बाबांसारख्या अनेक योगाचार्यांनी जगभर योगाच्या प्रसारासाठी मोठा हातभार लावला आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा नियमितपणे योगासने आणि प्राणायाम करतात.
रॉबर्ट स्वोबोदा हा अमेरिकेतील ओक्लाहोमा विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणारा एक तरुण. एकदा काही कारणाने तो आफ्रिकेत गेला. तिथे त्याला अतिसाराची लागण झाली. तेथील एका आदिवासी व्यक्तीने त्याला कसला तरी झाडपाला खायला दिला. त्याचा आजार आश्चर्यकारकरित्या बरा झाला. आपले ओक्लाहोमा विद्यापीठातील वैद्यकीय शिक्षण सोडून आपण शास्त्रशुद्ध असे आयुर्वेदाचे शिक्षण घेतले पाहिजे असे त्याच्या मनाने घेतले. त्यासाठी भारताइतका चांगला देश दुसरा नाही असे त्याला वाटले. आयुर्वेदाच्या ओढीने तो भारतात आला. पुण्याच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेदाची पदवी घेतली. रॉबर्ट स्वोबोदा यांनी मग आयुर्वेदाबरोबरच योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र, तंत्रविद्या इ. अनेक गोष्टींचा अभ्यास केला. आज ते जगभर आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. ‘ लाईट ऑन लाईफ ‘ हे त्यांचे पुस्तक त्यापैकीच एक.
आरोग्यपूर्ण जीवनासाठी दररोजचा शुद्ध आणि ताजा आहार, योगात सांगितलेल्या अष्टांग मार्गाचे आचरण या गोष्टी आपल्याला निरामय आणि आनंदी जीवनाकडे घेऊन जातात. नियमित योग आणि प्राणायाम करणाऱ्या आणि संतुलित आहार घेणाऱ्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत. त्यांनी योगाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवले आहे. त्याशिवाय त्यांचा दिवस सुरु होत नाही आणि संपत नाही. वयाला, वृध्दापकाळाला आणि अनेक व्याधींना दूर ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. आज नव्वदी गाठली तरी पूर्वीच्याच क्षमतेने काम ते करीत आहेत. गाडी चालवताहेत, सभा, समारंभांना जाताहेत. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी प्रेरणादायी नाहीत काय ?
क्रमशः…
©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे
चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈