☆ विविधा ☆ सुख म्हणजे काय ☆ सौ. राधिका भांडारकर ☆
माझ्या आजोबांच्या घरात दर्शनीच भिंतीवर एक मोट्ठी पाटी होती. त्यातलं पहिलं वाक्य चांगलच ध्यानात आहे!
समाधान हेच खरे सुख! गंमत म्हणजे लहानपणी, मोठे होत असताना सुखाविषयीची अनेक सुभाषिते ,श्लोक ऐकले अन् अभ्यासिले.
जगी सर्वसुखी असा कोण आहे? किंवा,
अलसस्य कुतो विद्या
अविद्यस्य कुतो धनम्
अधनस्य कुतो मित्र
अमित्रस्य कुतो सुखम्
कधीतरी माझ्या मनात, हाश्लोक आठवला आणि आले, आळशी असुनही शिकलोच की! पदवी मिळाली! नोकरी मिळाली..
मित्रपरिवार तर लहानपणापासून विस्तारलेलाच!
म्हणजे हा श्लोक आपल्याला लागू होत नाही!
मग हे सगळे ऊदात्त सिद्धांत मी जरा बाजुलाच ठेवले आणि माझ्या सुखाच्या ,आनंदाच्या व्याख्या तपासून पाहिल्या. शाळेत असताना ,मे महिन्याच्या सुट्टीत अडीचकं (आता हे पाढे वगैरे प्रकरण संपुष्टातच आलय्) म्हटलं की वडील अडीच आणे द्यायचे आणि मैदानात भाड्याची सायकल चालवायची परवानगी द्यायचे.. केव्हढा आनंद व्हायचा!
अबोला धरलेली जीवलग मैत्रीण एकदम एके दिवशी गळामीठी द्यायची!तो असायचा परमोच्च सुखाचा क्षण!
छोटे छोटे सुखाचे अनंत क्षण!
बसच्या भल्यामोठ्या रांगेत ऊभे असताना, आपल्याला हवी असलेल्या नंबरची बस आली की,सगळ्यांना ओलांडून बसमधे शिरताना होणारा आनंद कसा सांगू?
रेल्वेने प्रवास करत असताना आपल्या आरक्षित जागेवर कुणीही आगंतुक बसलेले नाहीत म्हणून भांडण टळल्याचा तो आनंद माझ्रासाठी विलक्षण असतो!
माझ्यासाठी वरसंशोधन चालु असताना, वडीलांनी विचारले,”तुझ्या जोडीदाराबद्दल काय अपेक्षा आहेत?”
मी लगेच ऊत्तर दिले,”जेवताना भुरके मारणारा आणि ताटात अन्न सांडणारा नवरा नको मला!”
आणि खरोखरच पुरुषांत अभावानेच अढळणारा व्यवस्थितपणा असलेला जोडीदार मिळाला अन् मी भरुन पावले!
पुढेपुढे माझ्या सुखाच्या व्याख्या बदलतच राहिल्या.
म्हणजे मदतनीस वेळेवर आली तर होणारा आनंद अन् त्यातून जाणवणारं सुख !
प्रभातसमयी नवर्याने दिलेला गरमागरम वाफाळलेला चहा! वा! क्या बात है! It makes my day!
अमेरिकास्थित मुलींशी बोलताना त्यांच्या आवाजावरुन जाणवणारी त्यांची ख्यालीखुशाली हाही एक सुखदु:खाचा विषय असतो.त्या मजेत तर मी मजेत त्यांचा आनंद माझा आनंद!
लाॅकडाउनमुळे सगळंच बंद! पण नवर्याने वाढदिवसाचे गिफ्ट काय दिले? कुंडीतल्या झाडावर ऊमलललेलं टवटवीत गुलाबाचं सुंदर फुल! अन् नजरेतली गाढ प्रीत!
किती सुखाचा क्षण!
एकीकडे म्हणतात, Sky is the limit. ध्येय बाळगा. जीवनात लक्ष्य हवं. Low ambition is crime. तर वडील म्हणायचे माणसांनी फार महत्वाकांक्षा बाळगु नयेत——नव्हे महत्वाकांक्षाच नसाव्यात!
गोंधळ व्हायचा माझा. पण कुठेतरी आता पटतं. गीतेतलाच ना हा सिद्धांत.
कर्म करा फळाची अपेक्षा न ठेवता! महत्वाकांक्षे सोबत अपेक्षा येते अन् मग अपयशातून दु:ख नैराश्य!
मग मनांत येत, सुशांत सिंगने आत्महत्या का केली? अधिक पैसा अधिक ग्लॅमर अधिक कीर्ती———— आणि मनाविरुद्धच्या परिस्थितीत टिकुन राहण्याचं नसलेलं मनोबल!
म्हणुनच सुखाच्या व्याख्या तपासल्या पाहिजेत. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण! पण मोठेपणातही छोटेपण जपता आलं पाहिजे! म्हणूनच छोट्याछोट्या क्षणातलं सुख मुठीत सांभाळून ठेवते मी. मला मेडीकलला जायचं होतं .पण नाही जाऊ शकले. झाले होते मी निराश, दु:खी! पण दुसरे पर्याय मिळाले आणि यश मिळालं! जीवन थांबलं नाही.
हंं..!! म्हणजे परवा संपूर्ण भारत देशाने जेव्हां डाॅक्टरांना अभूतपूर्व सलामी दिली तेव्हां नकळत वाटलंही “आज आपणही या समुहात असतो…!!”
असो तर मंडळी सुखाची व्याख्या करता येत नाही. दोन अधिक दोन बरोबर चार असे ते गणित नाहीच! पुन्हा तत्वंआलीच..सुख मानण्यावर आहे!
प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या. सुख प्रेमात आहे .सुख त्यागात आहे .सुख अहिंसेत आहे.
सुख देण्यात आहे! वगैरे वगैरे खूप काही…!सुख म्हणजे काय रे भाऊ? ——या प्रश्नाला काहीच ऊत्तर नाही.
मी मात्र एव्हढच म्हणेन, सुख—सुखी असणं ही वृत्ती आहे कदाचित असे तर नाही ना, तुज आहे तुजपाशी परी जागा चुकलासी,..!!
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
लेख छान. छोट्या छोट्या गोष्टीतून अापल्याला अानंद शोधता अाला पाहीजे .