डॅा. सौ. पुष्पा सुभाष तायडे
विविधा
☆ सेल्फी… ☆ डॅा. सौ. पुष्पा सुभाष तायडे ☆
आजच्या या आधुनिक युगात प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. मोबाईल मध्ये फोटो काढायचा कॅमेरा देखील असल्यामुळे फोटो काढायचे वेड दिवसेंदिवस वाढतच आहे. फोटो काढून देणारा व्यक्ती नसेल तेव्हा सेल्फी काढला जातो. स्वतःलाच स्वतःचा फोटो काढता येत असल्याने त्याची मजा काही औरच आहे. अलीकडील तरूण पिढी तर सेल्फी काढण्यासाठी वेडी झालेली दिसतात. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी पाण्याच्या जवळ समुद्रकिनारी प्रेक्षणीय स्थळी परिसर चांगला असेल तिथे वाटेल त्या त्या प्रसंगाचे सेल्फी फोटो काढून आठवणीच्या संग्रहात ते ठेवले जातात. अशा फोटोमुळे निश्चितच आयुष्यातील चिरस्मरणीय प्रसंगाच्या स्मृती जपता येतात. हा एक महत्त्वाचा भाग आहे.
त्यामुळे सेल्फीने मानवाला दिलेला हा अमूल्य ठेवाच आहे.
अलीकडच्या तरुणांना तर या सेल्फीने वेडच लावले आहे. दिवसातून कितीतरी वेळा ते आपला स्वतःचा सेल्फी फोटो काढतात. मग पाहतात त्या अँगलने फोटो चांगला निघतो की या अँगलने चांगला निघतो याचा विचार करतात. चांगले निघालेले फोटो ठेवतात. खराब निघालेले डिलीट मारतात. आपल्या मित्रमंडळींसोबत ,कुटुंबातील व्यक्तींसोबत,गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंड सोबत असे सेल्फी फोटो काढण्यात त्यांना काही गैर वाटत नाही. गर्लफ्रेन्ड किंवा बॉयफ्रेंड सोबत पुढे लग्न झाले तर काही बिघडत नाही. परंतु दुसऱ्या व्यक्ती सोबत लग्न झाले तर अशा फोटोंचा गैरवापर करून ब्लॅकमेल करणारीही काही मंडळी असतात. आपले प्रेम यशस्वी झाले नाही तर नैराश्य येऊन दुसऱ्या व्यक्तीला देखील सुखाने जगू द्यायचे नाही असे मनाशी ठरवून अशा फोटोंचा गैरवापर करणारेही समाजात आढळतात. तेव्हा सेल्फी काढताना सावध राहणे आवश्यक आहे.सेल्फी काढताना प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहणे हा एक गमतीदार अनुभव असतो कधी रागाचे भाव चेहऱ्यावर असतात तर कधी हास्याचे भाव असतात. कधी चेहरा वाकडा तर कधी हसमुख निघालेले फोटो ही गमतीदार असतात आपण आपल्या फोटोकडे पाहून हसायला लागतो.
सेल्फी म्हणजे स्वतःचा फोटो काढणे असा अर्थ आपण लक्षात घेतो. सेल्फी काढण्याच्या नादात काही अपघात घडून गेल्याचे व्हिडिओ आपण व्हाट्सअप वर पाहिले आहेत यात नदीच्या काठावर सेल्फी काढणाऱ्या मुलाचा पाय मगरीने धरला व मुलाला ओढून नेले कड्यावर उभे राहून सेल्फी काढताना खाली पडणे किंवा पाण्यात पडणे सेल्फी काढताना फोन पाण्यात पडणे अशा काही अपघाताची उदाहरणे आपण पाहिली आहेत. तेव्हा सेल्फी काढताना अपघात होणार नाही स्वतः सुरक्षित राहू याची काळजी घेणे देखील आपले कर्तव्य आहे. सेल्फी म्हणजे स्वतःचा फोटो काढणे असा वरवरचा अर्थ असला तरी आपण कसे आहोत हे पाहणे महत्त्वाचे आहे. स्वतःचे व्यक्तिमत्व जर प्रभावी बनवायचे असेल तर स्वतःच्या अंतरंगाचा सेल्फी काढायला पाहिजे. सेल्फी म्हणजे कॅमेरातून काढलेला बाह्य स्वरूपाचा फोटो होय. परंतु बाह्य रंगापेक्षाही अंतरंग पाहणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या स्वतःच्या अंतरंगाचा फोटो काढायचा असेल तर मला एका दिवसात किती वेळा राग येतो.
लहान सहान गोष्टींवरून माझी चिडचिड होते का?.
चिडचिड कमी करायची असेल तर मला या रागावर नियंत्रण कसे मिळवता येईल त्यासाठी मी काय करायला पाहिजे. माझ्यात या दिशेने परिवर्तन व्हायला पाहिजे. मला पैशाचा मोह होतो का अवैध मार्गाने पैसा गोळा करण्यासाठी माझे मन तयार होते का? हा मोह टाळून कष्टाने मिळवलेल्या पैशात समाधानाने राहण्याची वृत्ती माझी वाढीस लागलेली आहे का?
या दिशेने विचार करणे योग्य ठरते.
कोणतीही सुंदर स्त्री दिसली की कामांध होणे किंवा कोणत्याही सुंदर पुरुषाशी लगट करण्याची इच्छा होणे ही विकृतीच होय. संयमाने मनावर व अशा भावनांवर नियंत्रण ठेवण्याची पावले उचलायला हवीत. आजची तरुण पिढी तर अशा भावनांच्या अधिकच आहारी गेलेली आपल्याला दिसते. स्वतःच्याच रूपाचा व्यक्तिमत्त्वाचा अहंकार वाटणे व माझ्यापेक्षा कोणीही चांगले नाहीच. इतर सारे तुच्छ असे लेखण्याची भावना खूप लोकांमध्ये आढळते. हिंदी चित्रपटात गाणे आहे. गोरे रंगपे न ईतना गुमान कर. गोरा रंग दो दीनमे ढल जायेगा हेच सत्य आहे. अहंकार जाईल व इतरांचा सन्मान करण्याची भावना वाढीस लागेल या दृष्टीने विचार करून पावले उचलावी. द्वेष आणि मत्सराची भावना ही जीवनात अस्वस्थता निर्माण करते.
कोणाचा न करी द्वेष , दया मैत्री वसे मनी!
असे रामदास स्वामींनी म्हटले आहे. द्वेष आणि मत्सराच्या भावनेला क्रोधाची जोड मिळून नको त्या घटना जीवनात घडून आलेली अनेक उदाहरणे आपण रोजच वर्तमानपत्रांमध्ये वाचतो. वेळीच या भावनेला लगाम घातला तर सर्व मंगल होईल. लोभापाई इतरांवर अन्याय करणारे लोक समाजात दिसतात अधिक धन प्राप्त करण्याचा लोभ व तेही विशेष कष्ट न करता मिळत असेल तर चांगलेच म्हणून त्यामागे धावणारे लोक लोभाने मनःशांती गमावतात. सातवा रिकामा हंडा भरावा म्हणून मरेस्तोवर काम करूनही तो भरत नाही म्हणून चिंताग्रस्त होण्याची कथा आपण ऐकली आहे. लोभापाई दिवसभर धावून जमीन पायाखाली घालणारा माणूस शेवटी पूर्वीच्या जागेपर्यंत पोहोचू शकत नाही आणि अति धावल्यामुळे त्याचा मृत्यू होतो. ही कथा सर्वांना माहिती आहे. लोभापाई जीवनाची माती करण्यात काय अर्थ आहे. काम क्रोध मद मोह आणि मत्सर या साऱ्या विकार विचारांना ताब्यात ठेवून जीवन जगाल तर तुमचा सेल्फी आनंदी हसमुख आणि शांत चेहऱ्याचा निघेल एवढे निश्चित.
© डॅा. सौ. पुष्पा सुभाष तायडे
नागपूर
मो 9422119221.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈