सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
☆ समुद्राची हाक… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
तो समुद्र मला बोलवत होता,
पण त्याची हाक माझ्याशिवाय
कुणाला कळतच नव्हती!
ओढ लागली होती….
त्या भरती ओहोटीची, पांढऱ्या शुभ्र वाळूची…
तेथे वाळूचा किल्ला बांधायचा होता,
आणि लाटेच्या तडाख्याने पुसले जाणारे नाव लिहायचे होते..
थोड्याशा पाण्यात डुंबत राहून..
सागराचे ते विशाल रूप न्याहाळायचे होते!
उगवतीचा सूर्य नाही तर निदान
अस्ताला जाणारा सूर्य डोळ्यात साठवून ठेवायचा होता……
असे किती सूर्यास्त समुद्रावर पाहिले,
तरी मन तृप्त होत नाही…
तो केशरी,लाल गोळा स्वतःचे अस्तित्व,
त्या सागराच्या क्षितिजाशी विलीन करून,
त्यातच लोप पावताना पहायचा होता मला….
असे किती सूर्योदय- सूर्यास्त येतील..
पण गेला क्षण येत नाही ना…
ती खंत मी कुणाला, कशी सांगू?
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
पुणे
मो. 8087974168
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈