सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ विविधा ☆ सार्थक ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर 

‘अगं आई, बास कर आता… काय बारीकबारीक पाकळ्या वेचतीहेस… चांगली फुलं पण निघालीत भरपूर.. दे आता पिशवी.. बाकी कचरा टाकून देते’ असं माझं जरा वैतागलं वाक्य! मागं एकदा आई माझ्याकडं आली असताना फुलांच्या छोट्या पिशवीतून देवपूजेसाठी फुलं काढत होती. बरीच फुलं पारच बावली आहेत असं लक्षात आल्यावर म्हटलं, ‘संध्याकाळी नवी फुलं आणूया. आज आता चांगली सगळी घेऊन टाक पुजेला आणि खराब झालेली टाकून देते. फार कुजली तर वास येत राहातो फ्रिजमधेही!’ ‘हो, तसंच करते’ म्हणत ती फुलं निवडू लागली. मी माझ्या उद्योगातून मधेच स्वयंपाकघरातून बाहेर आले तरी ही अजून अगदी शेवंतीच्या फुलांच्या गळलेल्या अतीबारीक पाकळ्यांतूनही चांगल्या पाकळ्या निवडतच होती. मुळात चार-सहा देव आणि चार-सहा फोटो इतकंच काय ते देवघर! बाजूला निघालेल्या चांगल्या फुलांचा बऱ्यापैकी ढीगच देवांच्या मानानं खूप होता आणि आई उगीच जीव का शिणवतेय ह्या विचारानं मी वैतागून तिला ‘बास कर’ म्हटलं. त्यावर ती मानही वरती न करता शांतपणे पाकळ्या निवडत स्निग्धपणे म्हणाली, ‘त्यांचा पण जन्म वाया जाऊ नये गं! अगदी बावलेलं काही वाहाता येणार नाही देवाला, पण ज्या पाकळ्या अजून जरा टवटवीत आहेत त्या तरी वाहाते.’ ‘जाऊदे, आपल्याला कुठं काय तोशीस आहे, करुदे काहीतरी’ असं मनाशी म्हणत मी परत स्वयंपाकघराकडं वळले… मात्र नंतर कधीतरी असे आपल्याही नकळत रुजलेले क्षण तरारून उगवून येतात अचानक!

तसंही काही गोष्टी ह्या आपल्याकडं अपरिहार्य असतातच… अगदी रट्टे देऊन गळी उतरवलेल्या! पान इतकं स्वच्छ असलं पाहिजे कि माणूस त्यात जेवलं आहे कि नाही कळू नये, भांडी घासायला टाकताना ती स्वच्छ निपटलीच पाहिजेच… अन्नाशी मस्ती करायची नाही म्हणजे पर्यायाने अन्नाच्या एकेका कणाचा जन्म सार्थकी लागला पाहिजे. साडी जुनी झाली कि पूर्वी त्याची गोधडी व्हायची, फाटलेल्या कपड्यांच्या पिशव्या व्हायच्या… धाग्याचा जन्म पूर्णपणे सार्थकी लागायचा.  वहीतल्या उरलेल्या कोऱ्या कागदांची दाभण-दोऱ्यानं विणून वरती छान कोरा कागद चिकटवून त्यावर नक्षी रेखून दिमाखदार होममेड वही व्हायची. त्यातही कोरे कागद प्रत्येकी चार भागांत कापून गृहपाठ उतरवून घ्यायला केलेली पिटुकली वही तर काळजाच्या फारफार जवळची असायची. आज पाच ते पंचवीस ते शंभर रुपयांपर्यंत किमान दर्जापासून बऱ्या, मध्यम ते उत्तम दर्जापर्यंत वह्या सहजी बाजारात मिळतात… पण मला त्या भावत नाहीत. कागदाचा पर्यायानं वृक्षराजाच्या काळजाचा एकेक कण सार्थकी लावताना त्याचे जे नकळत आशीष लाभायचे ते ह्या वह्यांमध्ये कुठून यायचे आणि त्याशिवाय आपलं काळीज त्याच्याशी कसं जोडलं जायचं!?

गतिमानतेची अपरिहार्यता, त्यातून बंद झालेली मनाची कवाडं, अती बरकतीसोबत येणारा अहंकार, कोडगेपणा आणि कोरडेपणा, काळजाची गुंतवणूक हरवलेली स्पंदनं.. ह्या सगळ्यातून जुन्या सोन्यांतलं झळाळलेपण मागं पडत गेलं, आपणं अंतर कोरडंठक्क झालंय, स्वत: किती दर्जेदार जगतोय असा विचारही मनात येत नाही तर हळवे धागे गुंफत दुसऱ्याचा जन्म सार्थकी लावण्याचा विचार फारच दूर! त्यातून भाळी येणारं नैराश्य, वैफल्य, एकाकीपणही आपण सोसत होतो्च… मात्र वेगानं फिरणाऱ्या जगण्याच्या ‘मेरी गो राऊंड’ला थोपवायचं कसं हाही प्रश्न होताच. काही ओढवून घेतलेली आणि काही काळानुरूप स्वीकारावी लागलेली अपरिहार्यता कळसावर पोहोचून खदाखदा हसून आपला अंत पाहात होती आणि एका क्षणी अनपेक्षितपणे हे ‘मेरी गो राऊंड’ थांबलं… थोड्याश्या भयशंकांमधेही जगणं किंचित स्वस्थावलं आणि काही अवधीनं जेव्हां चक्र उलट दिशेनं फिरू लागलं तेव्हां अंतरी नकळत रुजलेल्या जाणिवांना पालवी फुटू लागली. स्वस्थावलेपण विरत जात कुठंतरी क्षणांचा जन्म सार्थकी लागतोय असं मनात आलं आणि आईच्या वाक्याची आठवण झाली.

ज्या मृगजळामागे वेड्यासारखे धावत होतो ते अख्खं मृगजळ अचानक लुप्त झालं, धावणं थांबलं तरी जगणं थांबलं नाही, उलट ते मोहरू लागलं… जन्म सार्थकी लागल्या क्षणांचे भरभरून आशीर्वाद मिळूनच कदाचित तृप्तावलं, शांतावलं, सुखावलं. पुरवूनपुरवून वापरताना अन्नाच्या एकेका कणाला जपलं जाऊ लागलंय, घरट्याच्या कानाकोपऱ्याला गोंजारलं जाऊ लागलंय, बेदरकारपणे टाकाऊ म्हणून फेकल्या जाणाऱ्या गोष्टींतलं सौंदर्य टिपायला नजर सरावतेय आणि त्यातून सृजनाचे रंग उधळले जाताहेत, माळ्यावरच्या अडगळीतली अनमोल हिरे-माणकं खाली येत त्यांना पैलू पाडून कोंदणात सजवण्याचा नाद लागला आहे, देवघरातली बेगडी माळ दूर सारली जात सांजवात उजळू लागलीये, शुभंकरोतीच्या सुरांनी तिन्हीसांज सजू लागलीये. दूरस्थ नात्यांशी संवाद घडू लागलेत… सर्वांना सुखी ठेव म्हणताना त्यांच्यासाठी आठवणीनं हात जोडले जाऊ लागलेत. सोय असूनसुद्धा आता व्हिडिओ कॉल नको वाटू लागलाय, लवकरात लवकर एकदा ग्रहण सुटून जिवाशिवाच्या भेटीचीच जीव वाट पाहू लागलाय. बहुधा काळजचं रितेपण, संवेदनांचं शुष्कपण जाऊन घराचं घरपण, जगण्यातलं जिवंतपण परत येऊ लागलंय!

खरंतर हे सगळंसगळं अस्तित्वात होतंच.. मात्र त्याचं अस्तित्व जाणवून घ्यायला ना आपल्याकडे वेळ होता, ना मनाच्या बंद कवाडांना त्याची चाहूलही लागत होती. सुरेश भटसाहेबांच्या, उरले उरांत काही आभास चांदण्याचे आकाश तारकांचे उचलून रात्र गेली…. ह्या ओळींप्रमाणं आज आपण जेव्हां रिते झालो आहोत…. त्यावेळी मनाच्या कप्प्यात खोलवर रुजलेल्या ह्या गोष्टी आपल्यासाठी चांदण्यांचे आभास होऊन सामोऱ्या आल्यात. आज त्यातल्या तारकांची आभा आपल्याला जाणवायला लागली आहे. आता हे जपायला हवं असं कुठंतरी आत जाणवू लागलं तशी मी प्रहार ह्या अप्रतिम हिंदी सिनेमातल्या मंगेश कुलकर्णींच्या अप्रतिमच शब्दांशी पोहोचले…

हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा

कभी ना ढले जो, वो ही सितारा, दिशा जिससे पहचाने संसार सारा

वाटलं, हाती येऊ लागलेलं आकाश आता मुठीत घट्ट पकडून ठेवायला हवं. त्यातल्या आपल्याच जिवाला लुभावणाऱ्या चांदण्या, तारका, नक्षत्रही हातून निसटता कामा नये. नैराश्याचा झाकोळ दूर करणारी ही रत्नमाला जपायला हवी. त्यातून संवेदना जिवंत होताहोता जगण्याला भान येईल… जे आजूबाजूलाही संवेदनशील डोळसपणे पाहायला शिकवेल… ज्यातून ज्ञानोबारायांच्या,

हे विश्वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर ।

किंबहुना चराचर । आपणची जाहला ॥…. ह्या शब्दरत्नांच्या तेजार्थाचीही कदाचित अनुभूती मिळेल.

 

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

चेन्नई

मो 09003290324

ईमेल –  asawarisw@gmail.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest


1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

सार्थकःखूप छान लेख.