☆ विविधा ☆ सायकली उदंड होऊ देत! ☆ श्री विनय माधव गोखले ☆
खरे तर पुणे हे सायकलींचे शहर म्हणून एकेकाळी विख्यात होते. रस्त्यांवर, रस्त्यांच्या कडेला, गल्ल्यांमधून,वाडयांच्या बोळांमधून, इमारतीच्या पार्किंगमध्ये सायकलीच सायकली लावलेल्या असायच्या. शाळाकॉलेजांमधून, कार्यालयांमधून खास सायकलींचे स्टॅंड तैनात असायचे किंवा एकमेकांवर खेटून-रेलून लावलेल्या असायच्या. सायकलींचेच राज्य होते म्हणा ना! पण काळ काय बदलला आणि जीवनाच्या वाढत्या वेगाशी स्पर्धा न करता आल्याने ह्या दुचाकी वाहनप्रकाराची लोकप्रिय कमीकमी होत गेली.
सायकली गेल्या आणि मोटारसायकलींचा जमाना आला. कालांतराने “आजकाल की नाही सिटीत कुठेही जायचे म्हणजे कार ही इतकी नेसेसिटी झाली आहे ना!” अशी वाक्ये बोलून पुणेकर एकमेकांना कार घ्यायला भरीस पाडू लागले. मग त्यातून कार आणि मोटारसायकलींनी रस्ते तुडुंब भरून वहायला लागले आणि एका सीमेनंतर पावसाळ्याचे पाणी तुंबावे तसे तुंबून पडायला लागले. सिग्नलला उभे राहिले की वायुप्रदुषणाची भयानक जाणीव सर्वांना व्हायला लागली. मधल्यामधे सायकली मात्र पुण्याच्या रस्त्यांवरून पार पुसल्या गेल्या!
वरवर पाहिले तर सायकली गायब होण्यामागे पुणेकरच पूर्णपणे दोषी आहेत असे वाटेल. पण तसे नाहीये. शासनकर्त्यांकडून ’प्लास्टीक रीसायकलिंग’, ’कोरडा कचरा रीसायकलिंग’, ’ओला कचरा रीसायकलिंग’, ’पाणी रीसायकलिंग’ असा नानाविध गोष्टी रीसायकलिंग करण्याचा इतका भडिमार सर्वदिशांनी पुणेकरांच्या कानीकपाळी केला गेलाय की ह्या गदारोळात पुणेकर बिच्चारा ’सायकलिंग’ हा शब्दच विसरून गेला.
पण खर्या पुणेकराने घाबरून जायचे कारण नाही…परिस्थिती हळूहळू बदलत आहे.
पेट्रोल, डिझेलच्या किमती बेफाट वाढल्या आहेत. “हिंजवडीला कारने जायचे म्हणजे च्यायला ब्रेक-क्लच, ब्रेक-क्लच दाबून गुढगे पार दुखायला लागतात बुवा! शिवाय ट्रॅफिक जाममध्ये अडकून रोजचे तीन तास प्रवासात जातात ते वेगळेच…!” अशी हताश वाक्ये कानी पडायला लागली असून आयटी कर्मचार्यांचा कार पूलिंग करण्याचा किंवा कंपन्यांच्या बसनेच कामाला जाण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यास भरीला म्हणजे व्यायामाचा अभाव आणि त्यातून आरोग्य समस्या उग्र रूप धारण करायला लागल्या आहेत. वजनवाढ, ब्लड प्रेशर, गुडघेदुखी, पाठदुखी अशा आजारांनी लहान वयातच तरुण पिढीला ग्रासले आहे.
ह्यावर उत्तम उपाय म्हणजे, सायकल! ह्या उपायाचे फायदे खालीलप्रमाणे –
- सुलभ वापर – लहान मुला-मुलींपासून आजी-आजोबांपर्यंत सर्वजण सायकल चालवू शकतात. बरं पंक्चर झालीच तर हातात धरून ढकलत नेणे काही अवघड नाही. वजनाला एकदम हलकीफुलकी आणि पार्किंगसाठी सडपातळ. खूप लांब जायचे असेल किंवा काही तातडीचे काम असेल तर बाइक-कार जरूर वापरा. पण शाळेला, बाजाराला, व्यायामशाळेत, ऑफ़िसला जायचे असेल तर वेगाची काय गरज? सरळ सायकल काढा आणि सुटा.
- पैशांची बचत – सायकलीची किंमत माफ़क शिवाय दुरुस्तीचा खर्चही परवडण्यासारखा. सायकल चालविताना ना कुठल्या इंधनाचा खर्च, ना वंगणाचा खर्च. आपला देश ह्या दोन्ही गोष्टी आयात करीत असल्याने सायकलींचा वापर मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचवू शकेल. शिवाय सायकली चालवता ना हेल्मेटची गरज, ना लायसन्स, ना इंशुरन्स, ना पीयुसी आवश्यक. कुठलाही सीट-बेल्ट बांधू नका वा हेल्मेटचा पट्टा ओढू नका. नुसती टांग टाका आणि चालू पडा.
- शिक्षेची भीती नाही – सुधारीत मोटार वाहन कायद्यामध्ये वरील नियम न पाळल्यास कडक शिक्षांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची तसेच सीसी टीव्ही कॅमेर्याची करडी नजर सर्व दुचाकी-तिचाकी-चारचाकींवर असणार आहे. स्वयंचलित वाहनांना वेगाची मर्यादा पाळण्याची सक्ती असून ती तोडल्यास जबरी शिक्षेची तरतूद केली आहे. विशेषत: दारु पिऊन चालवणार्यांची तर काही खैरच नाही.
सायकलीला मात्र अलगदपणे सर्व नियमांच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. सायकलवाल्याने अगदी वाहतूक पोलिसाच्या अंगावरून सिग्नल तोडून जरी नेली तरी पोलिस त्या कृत्याकडे काणाडोळाच करेल. सायकलवाल्याला पकडणे त्याच्यादृष्टीने पूर्णपणे ’अर्थ’हीन असणार आहे. जास्तीतजास्त शिक्षा म्हणजे ’हवा सोडून देणे’ बस्स! J
- उत्तम आरोग्य – सायकल चालवणे हा फ़ुफ़्फ़ुसांची आणि ह्रदयाची कार्यक्षमता वाढवण्याचा उत्तम उपाय आहे. शिवाय घाम निघाल्याने शरीरातील जादा मेद वापरला जाऊन लठ्ठपणा नैसर्गिकरित्या कमी होतो. शरीरातील मांसपेशींचीही वाढ होते, हातापायांचे स्नायु बळकट होतात आणि संपूर्ण शरीराचा रक्तपुरवठा वाढतो.
- सुधारीत तंत्रद्न्यान – नवीन सायकलींना गिअर आणि शॉकअब्सॉर्बर आल्याने सायकलवरून भन्नाट वेगाने जाण्याचीही सोय झाली आहे. शर्यतींसाठी अत्यंत कमी वजनाच्या पण तितक्याच बळकट सायकली जगभर तयार आणि सहज उपलब्ध झाल्या आहेत. त्याशिवाय सायकलींसाठी सोयीचे खास आकर्षक रंगांचे गणवेश तसेच हेल्मेट बाजारात आली आहेत. सायकलींना बॅग्ज, मोबाईल फोन तसेच पाण्याची बाटली अडकविण्य़ाचीही सोय पर्यटनाला जाणार्यांसाठी उपयुक्त ठरते.
- सायकल म्हणजे कमीपणा नव्हे – युरोपियन देशांमध्ये विशेषत: नेदरलॅंडस वगैरे मध्ये सर्वचजण सायकलीवरून फिरतात आणि सायकलस्वारांना तिथे महत्व आणि प्रोत्साहनही दिले जाते. त्या देशांत जाऊन आलेल्या सर्वांनाच मग पुण्याच्या रस्त्यांवर सायकल चालविण्यात कमीपणा वाटायचे कारण उरत नाही.
अशा प्रकारे स्वयंचलित वाहनांचा वापर कमी होवो आणि सायकलींचा उदंड वाढो, हीच ह्या पुणेकराची इच्छा!
© श्री विनय माधव गोखले
भ्रमणध्वनी – 09890028667
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈