डॉ. मेधा फणसळकर

☆ विविधा ☆  सृजनाचा सोहळा ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆

ग्रीष्माच्या तप्त झळा अंगाची लाहीलाही करत असतात. कधी एकदा पावसाळा सुरू होतो आहे म्हणून आपण वाट बघत असतो. आणि अशाच वेळी आकाशात मेघ दाटून येतात. झरझर धारा बरसू लागतात आणि ही जलधारा तृप्तीचे क्षण निर्माण करत सर्व सृष्टीला सृजनत्वाचे दान देत असते. पावसाळा म्हणे सृजनत्वाचा सोहळा! असे काहीसे अलवार- हळूवार विचार मनात घोळत असतानाच अचानक एका सृजनत्वाची प्रचिती आम्हाला आली. अर्थात् या सृजनत्वासाठी कोणत्याही ऋतूची गरज नसते बरं का! आता कसे ते सोदाहरणच बघा.

त्याचे झाले असे की परवाच आमच्या पुतणीचा फोन आला. “काकू, च्यवनप्राश कसा करतात ग? माझ्याकडे पाच- सहा किलो आवळे आहेत घरचे. सुपारी, लोणचे, मोरावळा सर्व करुन झाले. आता पाऊस पडल्यामुळे उरलेले आवळे उन्हात वाळवता येणार नाहीत. म्हणून च्यवनप्राश करायचे ठरवलंय.” अस्मादिक आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे तिने आम्हाला फोन केला होता. बोलता बोलता ती पुढे म्हणाली, “यू नळीवर बऱ्याच रेसिपी आहेत ग, पण नक्की बरोबर कोणती ते लक्षात आले नाही म्हणून फोन केला.” तिने हे सांगितल्यावर आम्ही उत्सुकतेने यू- नळी उघडून बघितली तर भूछत्रासारख्या च्यवनप्राशच्या अनेक रेसिपी उगवलेल्या दिसल्या. सृजनत्वाचे विविध आविष्कार बघून आपण साडे- चार वर्षे हे  आयुर्वेदाचे ज्ञान घेण्यात फुकट घालवली आहेत याची उपरती झाली. औषधे तयार करताना त्यावर होणारे अग्नीचे संस्कार, औषधी द्रव्ये, काळ, त्याचा परिणाम या सर्व संकल्पना आमच्या गुरुनी आणि पर्यायाने आमच्या ग्रंथोक्त गुरुनी पण का बरे आपल्याला शिकवल्या असतील असा प्रश्न उगीचच मनात उद्भवू लागला. अर्थात ही आमच्या भाबड्या मनाची प्रतिक्रिया होती बरे. कोणाचा अवमान करण्याचा आम्हा पामराचा बिलकूल इरादा नाही हे वाचकांनी कृपया लक्षात घ्यावे. अन्यथा पु.ल. देशपांडे म्हणतात तसे “ राजहंसाचे चालणे जरी डौलदार असले तरी सामान्य लोकांनी चालूच नये की काय?” याच धर्तीवर आम्हाला प्रश्न विचारले जातील की “यांनी आयुर्वेदाचे ज्ञान घेतले म्हणजे सर्व हेच जाणतात आणि आम्ही सामान्य लोकांनी यात पडूच नये की काय?” असे काही ज्ञान पाजळण्याचा आमचा बिलकूल हेतू नाही बरं का! त्यामुळे अगदी “बाजार जैसा च्यवनप्राश” या रेसिपीमधून साध्य होत असेल ( सिद्ध होतो का ते आम्हाला माहीत नाही.) तर त्यांनी जरुर हा सोहळा आनंदाने साजरा करावा.

तर हे सृजनत्वाचे सोहळे यू- नळीवर हल्ली जागोजागी दिसतात. सुरुवातीला आम्हाला जणू काही अलिबाबाच्या गुहेतील खजिना सापडल्यासारखे वाटले. म्हणजे अमुक बिस्किटापासून केलेला तमुक तमुक केक, अमुक ऐवजी वापरून केलेले ढमुक, अमुक पासून केलेला तमुक खरवस, इन्स्टंट याव आणि इन्स्टंट त्याव! पहिल्यांदा आम्हीसुद्धा  हौसेने या सोहळ्यात हिरिरीने भाग घेतला. आता माझी मुले आणि नवरा किती खूष होतील या कल्पनेने आधीच आमच्या सर्जनशीलतेसाठी स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. पण अमुक बिस्किटापासून तयार केलेले तमुक पुडिंग घरच्या तमाम मंडळीनी “बी- कॉम्प्लेक्सच्या औषधासारखे लागतेय” म्हणून रिजेक्ट केले. एवढेच कशाला? दारातल्या आमच्या मोत्याने तर एकदाच वास घेतला आणि   चार दिवस सरळ अन्नसत्याग्रह केला. मनीमाऊने तर दोन दिवस घरच सोडले. एकदा अमुक बिस्किटाचे आईसक्रीम डीट्टो अमूलसारखे लागते म्हणून केले तर एक – एक चमचा खाऊन मुलांनी ते आमच्या शीतकपाटदेवालाच नैवेद्य म्हणून ठेऊन दिले. शेवटी तो देवही कंटाळला आणि त्यानेही तोंड उघडून संपूर्ण कपाटभर दुर्गंधी सोडली  तेव्हा ते आमच्या रोजच्या कचराकलशात समर्पित करावे लागले. अशावेळी मला लहानपणी दारावर येणाऱ्या भरतकामाच्या सुया विकणाऱ्या विक्रेत्यांची आठवण येते. कापडावर ते इतक्या भराभर त्या विशिष्ट सुईने आणि रेशमाच्या दोऱ्याने सुंदर नक्षीकाम करायचे की आपल्यालाही ते सहज जमणार म्हणून आम्ही ती सुई विकत घ्यायचो. पण हाय रे दैवा! तो विक्रेता निघून गेल्यावर आमची ती सुई कापडातून सुद्धा आरपार जायची नाही तर नक्षीची गोष्टच दूर!

डाएटचे तर इतके सोहळे आहेत की नक्की कुठल्या सोहळ्याने आपले वजन कमी होईल ते समजतच नाही. एकजण सांगतो- भरपूर पाणी प्या, तर दुसरा सांगतो की शरीराला आवश्यक तेवढेच पाणी प्या- नाहीतर किडन्या खराब होतील. एकजण सांगतो सकाळी उठल्या उठल्या लिंबू- मध- पाणी प्या, तर दुसरा सांगतो की सकाळी उठल्यावर एक फळ खा. एक सांगतो भात अजिबात खाऊ नका तर दुसरा सांगतो की जिथे जे पीक उगवते तेच जास्त खाल्ले पाहिजे. म्हणून पंजाबातील माणसाने भरपूर गहू आणि कोकणातील माणसाने भरपूर भात खाल्ला पाहिजे. तर एक म्हणतो भरपूर सॅलड खा आणि दुसरा म्हणतो कच्च्या भाज्या अजिबात खाऊ नका. एक सांगतो मोड आलेली कडधान्य खा तर दुसरा म्हणतो बिलकुल खाऊ नका. एक सांगतो दर दोन तासांनी खा तर दुसरा म्हणतो की फक्त दोनदाच खा. आणि या सर्वांबरोबर त्यांनी सांगितलेले विश्लेषण सुद्धा आपल्याला पटत असते. मग यापैकी कुठला सृजनत्वाचा सोहळा आपल्याला लागू होतो हे ठरवण्यात आपले शरीर इतके सृजन(की सूजन)शील होते की ते सृजन उतरवण्यासाठी सुजनाचे दरवाजे टोकावे लागतात.

‘व्यासो$च्छिष्टं जगत् सर्वम् ‘ म्हणजे “व्यासमुनींनी  या जगातील सर्व विषयांना स्पर्श केला आहे” असे कधीतरी आम्ही ऐकले होते. तसेच काहीसे या सृजनत्वाच्या सोहळ्याचा बाबतीत आमच्या लक्षात आले. पाककला, चित्रकला, संगीत, नाट्य अशा जवळजवळ चौसष्ठही कलांमध्ये हा सोहळा आपली सर्जनशीलता दाखवत यू- नळी, मुखपुस्तक, कायप्पा, अशा अनेक माध्यमातून संचार करत आम्हा रसिकांना अधिकाधिक सोहळ्याचा आनंद लुटण्यास प्रवृत्त करत असतो. म्हणूनच जसे आम्ही सुरुवातीला नमूद केले की ऋतू पावसाळा म्हणजे सृजनाचा सोहळा! तसाच हा अंतरजालाच्या मायाजालाचा पावसाळा…. ज्यात आम्ही अनुभवतो नवनवीन सृजनत्वाचे सोहळे!

 

©  डाॅ. मेधा फणसळकर

9423019961

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments