श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

समज, गैरसमज व अफवा… भाग-१ ☆ श्री सुनील देशपांडे 

अनंत फंदींचा एक फटका आठवतो-……

बिकट वाट वहिवाट नसावी,

धोपट मार्गा सोडु नको,

संसारामध्ये ऐस आपल्या 

उगाच भटकत फिरू नको.

… पण एकदा समाजकार्यात शिरायचं म्हटल्यावर आपल्याला हा फटका वेगळ्या पद्धतीने म्हणावा लागेल 

बिकट वाट वहिवाट असूदे,

धोपट मार्गे जाऊ नको,

संसारामध्ये कशास नुसता,

समाजकार्या सोडू नको.

एकदा समाजकार्यामध्ये रममाण व्हायचं ठरवलं की ती वाट बिकट असणार हे नक्कीच. आपण बघतोच की समाज प्रबोधन ही अत्यंत बिकट आणि खडतर वाट आहे. तरी त्यातून कसा मार्ग काढायचा याचे वेगवेगळे पैलू आपण पाहत आहोत. अवयवदानाच्या क्षेत्रात चुकीच्या धार्मिक संकल्पनांमुळे ज्या काही अडचणी उभ्या राहतात तसेच चुकीच्या सामाजिक कल्पना आणि सोशल मीडियावर अथवा सांगोपांगी ज्या काही चुकीच्या घटना वा संकल्पना लोकांच्या मनावर ठसवल्या जातात त्याबाबत आपण पाहू.

ग्रामीण भागातील एका डॉक्टरशी चर्चा करताना तो असं म्हणाला “आपण देहदान करून टाकायचं. एकदा देह घेतल्यानंतर ते, त्यातलं जे काय पाहिजे ते काढून घेतील. पण लोकांना अशी भीती वाटते की देहदान केल्यानंतर त्यातले वेगवेगळे अवयव काढून त्याचा धंदा करतील. त्यामुळे देहदानासाठी माणसे तयार होत नाहीत. ” हे आता एका डॉक्टरने म्हणावे हे आश्चर्यकारक आहे. आता डॉक्टरांना सुद्धा अवयवदाना बद्दलची फारशी माहिती नसते हे बर्‍याच वेळेला लक्षात आलेलं आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये जे डॉक्टर झाले आहेत त्यांना थोडीफार माहिती आहे. पण तरी सविस्तर व योग्य ज्ञान नाही. ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील सुद्धा कांही डॉक्टर लोकांशी चर्चा करताना लक्षात येते की डॉक्टर मंडळींना सुद्धा या विषयाचे योग्य ते व सखोल ज्ञान नाही. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचे सुद्धा प्रबोधन होणे आवश्यक आहे, कारण त्यांच्या सांगण्यावर लोक तज्ञ म्हणून विश्वास ठेवतात. तर डॉक्टर्स नर्सेस आणि अर्धवट माहितीच्या आधारे जनजागृती करण्याच्या फंदात पडणारे काही कार्यकर्ते या सर्वांचे पहिल्यांदा प्रबोधन केले पाहिजे. म्हणजे या तथाकथित तज्ञ मंडळींकडून समाजामध्ये चुकीचे संदेश जाणार नाहीत. सरकारकडे आम्ही बरीच वर्षे आग्रह धरला आहे की वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये अवयवदानाचा समावेश असावा. परंतु अजूनही त्याला म्हणावे तसे यश आले नाही. तरीसुद्धा सध्या दहावीच्या सायन्स-२ पुस्तकात एक परिच्छेद अवयवदान या विषयावर आहे. त्यामुळे थोडी उत्सुकता म्हणून का होईना त्याबाबत विद्यार्थी माहिती मिळवतील. निदान ज्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे जायचे आहे ते या बाबतीत जागृत होतील. अभ्यासक्रमाचा जरी भाग नसला तरी जनरल नॉलेज म्हणून या विषयाची तोंड ओळख अनेक डॉक्टरांना नक्की आहे.

वास्तविक पाहता हृदयक्रिया बंद पडून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की तीन मिनिटात त्याचं रक्ताभिसरण थांबतं आणि शरीरातील अंतर्गत अवयव निष्क्रिय होतात. निरुपयोगी होतात. त्यामुळे प्रत्यारोपणासाठी कोणताही अवयव उपयोगाला येत नाही. किमान एवढे ज्ञान तर्कदृष्ट्या तरी डॉक्टरांना असणे आवश्यक आहे. एकंदर याबाबतीत जागृती करणे गरजेचे आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे आवश्यक ठरते. डॉक्टरांच्या बाबतीत ही अवस्था आहे तर नर्सिंग विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याबाबत माहिती असणे अवघड आहे. म्हणून वैद्यकीय अभ्यासक्रमाबरोबर नर्सिंग अभ्यासक्रमामध्येही या विषयाचा समावेश होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आमच्या पदयात्रेच्या दरम्यान काही ग्रामीण रुग्णालयांमध्ये अशा वर्कर्सबरोबर आम्हाला या विषयासंबंधीची चर्चा करण्याची संधी मिळाली. तेंव्हा असे लक्षात आले की जर अशा वर्करना या विषयाची माहिती करून दिल्यास समाजाच्या तळागाळापर्यंत या विषयाची ओळख लोकांना नक्की होईल आणि ती योग्य पद्धतीने होईल. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाला आम्ही सूचना दिलेली होती की अशा वर्करच्या प्रशिक्षणामध्ये या विषयाचा समावेश व्हावा.

हृदयक्रिया बंद पडून म्हणजेच सर्वसाधारण ज्या पद्धतीने मृत्यू होतो या पद्धतीने मृत्यू झाल्यावर त्या व्यक्तीच्या शरीरातला कोणताही अवयव प्रत्यारोपणासाठी योग्य राहत नाही. तो प्रत्यारोपणासाठी निरुपयोगी असतो. त्यामुळे देहदान केल्यास त्यातील अवयवांचा व्यापार होण्याची शक्यता शून्य आहे. हे समजावून सांगणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांचा याबाबतीतला गैरसमज दूर करण्यासाठी या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे.

व्हाट्सअप अथवा इतर सोशल मीडियावर विकृत माहिती प्रसृत करणाऱ्या मनोवृत्तीचे लोक अनेक वेळा गैरसमज पसरवणारे मेसेज टाकत असतात. त्यामुळे लोकांना या चुकीच्या संदेशापासून सावध करणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही मृत व्यक्तीचे अवयवदान करायचे असेल तर ती व्यक्ती मेंदू-मृत असलीच पाहिजे. मेंदू-मृत म्हणून निश्चित केलेली व्यक्ती ही रुग्णालयाच्या अतिदक्षता विभाग (आय. सी. यू. ) मध्येच असू शकते. ती व्हेंटिलेटरवरच असू शकते. ज्यावेळेला वेंटिलेटरच्या सहाय्याने श्वासोच्छवास कृत्रिम पद्धतीने चालू ठेवला जातो तेव्हा, जरी व्यक्ती मृत असली तरीही या कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेमुळे मृतदेहामध्ये रक्ताभिसरण चालू असते. त्यामुळे सगळे अवयव जिवंत अथवा कार्यरत म्हणजेच वर्किंग कंडिशनमध्ये असतात. असे जिवंत-कार्यरत अवयवच दुसऱ्या जिवंत व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रत्यारोपणासाठी बसविण्यास योग्य असतात. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट समाजामध्ये आपल्याला परत परत आणि ठासून सांगितली पाहिजे.

या सोशल मीडियाची चुकीचे मेसेज देण्याची अजून एक पद्धत जाणून घेणे आवश्यक आहे. कधीतरी आपल्याला व्हाट्सअप वर एखादा मेसेज येतो की … ” एक माणूस मृत्यूशय्येवर आहे आणि त्याला आपल्या किडन्या दान करायच्या आहेत. ज्या कुणाला गरज असेल त्यांनी त्वरित दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. हा संदेश त्वरित आपल्या सर्व संबंधितांना फोरवर्ड करा ज्यामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो ” 

अशा किंवा थोड्याबहुत याच्यासारखा संदेश असलेल्या पोस्ट व्हाट्सअपवर अनेक वेळेला येत असतात. आपण त्याची शहानिशा न करता खऱ्याखोट्याचा विचार न करता सद्भावनेपोटी आपल्या बऱ्याच मित्रांना तो मेसेज फॉरवर्ड करतो. असे चुकीचे मेसेज अनेक व्यक्तींना बऱ्याच वेळेला येत असतात. तोच मेसेज काही महिन्यांनी पुन्हा आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. असे मेसेज सतत फिरत असतात. ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचत असतात. अशा प्रकारच्या मेसेजबाबत एक सगळ्यात महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे. प्रथम हे जाणून घेतलं पाहिजे की अशा प्रकारचे मेसेजेस हे सन १९९४ मध्ये भारत सरकारने मंजूर केलेल्या ‘मानवी अवयव प्रत्यारोपण आणि ऊती प्रत्यारोपण कायद्या’ च्या विरोधात आहेत. एखाद्याला अवयव दान करायचे असले तरी जाहिराती देऊन असे अवयवदान करता येत नाही. हे बेकायदेशीर आहे. दुसरी गोष्ट एखाद्या व्यक्तीने की ज्याला या कायद्याचे ज्ञान नाही अशा व्यक्तीने चुकून असा संदेश पाठवण्याची शक्यता गृहीत धरली तरी आपण, प्रथम दिलेल्या क्रमांकावर फोन करून या घटनेबद्दलची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. जर खरोखरच कोणी फोनवर उपलब्ध असेल तर त्याला हे समजावून सांगितले पाहिजे की अशा तऱ्हेने संदेश प्रसृत करणे हे बेकायदेशीर आहे. अवयवदान हे ज्या रुग्णालयास अवयव प्रत्यारोपणचा परवाना असेल अशा रुग्णालयामार्फतच (झेड टी सी सी) ‘विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र’ या सरकारमान्य यंत्रणेशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच अवयवदान करायचे असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या पद्धतीचे मेसेज चुकीचेच असतात. हा फोन आपण फिरवला आणि जर तो लागला नाही किंवा नो रिप्लाय मिळाला तर शंभर टक्के समजायचं कि हा मेसेज खोटा आहे आणि तो पुढे पाठवायचा नाही. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत असा मेसेज आपल्याला आला तर तो बेकायदेशीर असतो आणि आपण पुढे पाठवायचा नसतो. एक तर शहानिशा करून घ्या किंवा सरळ तो काढून टाका आणि ज्या व्यक्तीकडून आपल्याला हा मेसेज आलेला आहे त्या व्यक्तीला हा मेसेज ताबडतोब डिलीट करून टाकायला सांगावा तसेच ज्या व्यक्तींना तू हा मेसेज पाठवला असशील त्यांना सुद्धा हा मेसेज खोटा आहे हे कळवण्याची खबरदारी घ्यावी असे सांगावे. ही सर्व माहिती वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण त्यांचेकडून आलेली माहिती ही तज्ञ व्यक्तीकडून आलेली माहिती असे समाज समजतो. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये या माहितीचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. मला आणि कित्येकांना अनेक डॉक्टरांकडून सुद्धा असे मेसेज फॉरवर्ड झालेले आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील आणखी एका गोष्टीबद्दल आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आत्तापर्यंत अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मी व्याख्याने दिली आहेत. त्या प्रत्येक वेळी मी एक प्रश्न नेहमी विचारत असतो. ” इथे बसलेल्या व्यक्तींपैकी ज्या कुणी देहदानाचा संकल्प केला आहे त्यांनी हात वर करावेत “. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दहा टक्के व्यक्तीसुद्धा हात वर करत नाहीत. याचा अर्थ असा की वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे किंवा जे उद्या डॉक्टर होणार आहेत त्यांनासुद्धा देहदानाचे महत्व समजून सांगणे खरंच आवश्यक आहे. याबाबतीत त्यांचेमध्ये अनास्था आहे. कुणाच्यातरी देहदानाच्या कृतीमुळे या डॉक्टरांना शिक्षण मिळते आणि समाजामध्ये डॉक्टरीसारखा प्रतिष्ठेचा व्यवसाय करण्याची संधी मिळते. ते देहदान डॉक्टरांनी स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबियांचे करण्याचा संकल्प का करू नये ? याबाबत एक उदाहरण आवर्जून सांगावेसे वाटते. अकोला येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ज्या वेळेला माझे व्याख्यान झाले त्यावेळेला मी हा प्रश्न विचारला असता 100% विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे सुद्धा हात वर झाले होते. त्यावेळी डॉ. कार्यकर्ते हे प्रभारी डीन म्हणून तेथे कार्यरत होते. त्यांनी व्याख्यानानंतर असेही सांगितले की विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून आम्ही स्वेच्छेने फॉर्म भरून घेतच असतो. परंतु त्यांना आम्ही हे सुद्धा आवाहन करतो की आपल्या कुटुंबीय आणि मित्रमंडळी पैकी किमान पाच जणांचे याबाबत प्रबोथन करून त्यांचे फॉर्म भरून आपले वैद्यकीय शिक्षण संपायच्या पूर्वी सादर करावे. अशा प्रकारची कल्पना व कृती प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयांनी राबविल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. बऱ्याच वेळेला प्रत्येकामध्ये ही अनास्था असतेच असे नाही, परंतु त्यांना याबाबत आवाहन करणे आणि प्रवृत्त करणे यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता मात्र नक्की आहे. सर्वच वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयांनी तसे केल्यास या क्षेत्रातील ही अनास्था दूर होऊ शकेल हे नक्की.

देहदानाबाबत लोकांची अजून एक गैरसमजूत असते. ती म्हणजे देहदान केल्यानंतर मृतदेहाची विटंबना होते. देहदान करतानाच हे दान वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आहे हे माहिती असलं पाहिजे. या मृतदेहांचं डिसेक्शन म्हणजेच शवविच्छेदन करण्यासाठीच हे मृतदेह देण्यात आलेले आहेत याची जाणीव देहदान करणाराला असली पाहिजे. मृतदेहाचं डिसेक्शन करणे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी गरजेचे असल्याने त्याची विटंबना होण्यासारखे काही नाही.

 – क्रमशः भाग पहिला 

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments