श्री सुनील देशपांडे
विविधा
☆ समज, गैरसमज व अफवा… भाग-१ ☆ श्री सुनील देशपांडे ☆
(मृतदेहाचं डिसेक्शन करणे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी गरजेचे असल्याने त्याची विटंबना होण्यासारखे काही नाही.) – इथून पुढे
खरं म्हणजे मृतदेह जाळून किंवा पुरून टाकणे किंवा कोणत्याही प्रकारे तो देह नष्ट करणे हीसुद्धा तसं पाहिलं तर त्या मृतदेहाची विटंबनाच आहे. मृत्यूनंतर देहाला तिरडीवर बांधणे त्याची मिरवणूक काढणे त्याला वेगवेगळे विधी करून हळूहळू जाळणे या सुद्धा खरं म्हणजे विटंबनाच आहेत की. मुख्यतः हे लक्षात घेतले पाहिजे की मृत्यूनंतर त्या देहाची कोणत्यातरी पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असते. हे सर्वांनाच मान्य आहे. देहदान ही सुद्धा मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची पद्धत नव्हे काय ? परंतु ती विल्हेवाट लावण्या अगोदर त्या मृतदेहाच्या डिसेक्शन मधून वैद्यकीय विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते. संशोधनाला चालना मिळते. ही सगळ्यात मोठी पुण्याचीच (यात ‘पुणे’ या शहराचा कांहीं संबंध नाही) गोष्ट आहे हे जाणून घेतले पाहिजे. सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जेव्हा मृतदेह डिसेक्शन साठी घेतला जातो त्यावेळेला डिसेक्शन सुरू करण्यापूर्वी सर्व विद्यार्थी त्या मृतदेहाला हात जोडून प्रार्थना करतात आणि आदर व सन्मान पूर्वक त्या मृतदेहाला म्हणतात की ‘तुमच्या या त्यागामुळे, दानामुळे आम्हाला ज्ञान मिळत आहे. आमचं शिक्षण पूर्ण होतं आहे, ही तुमची खूप मोठी कृपा आहे. त्याबाबत आम्ही आपले कृतज्ञ आहोत’ अशा प्रकारचा संदेश असणारी ही प्रार्थना असते. जगामध्ये बहुतेक सर्व वैद्यकीय महाविद्यालयात अशा प्रकारच्या विविध प्रार्थना करून मगच डिसेक्शन चालू केले जाते. त्यामुळे कुठल्याही तर्हेचा अनादर किंवा विटंबना त्या मृतदेहाची होत नाही. काही महाविद्यालयांमध्ये विशेषतः नाशिकच्या वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात वर्षातून एक दिवस कृतज्ञता दिन म्हणून साजरा करून त्यादिवशी देहदान करणाऱ्या कुटुंबियांचा कृतज्ञतापूर्वक आदरसत्कार आयोजित केला जातो त्यांनी केलेल्या या महान कृत्याबद्दल त्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात येतो.
याबाबतीत एक आगळे वेगळे व जगातले पहिले आणि आदर्श उदाहरण के.एल.ई. या संस्थेच्या बेळगाव येथील आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये घडले आहे. त्याचा आदरपूर्वक उल्लेख करणे आवश्यक आहे असे मला वाटते. २०२० या वर्षी के.एल.ई. महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. महांतेज यांनी स्वतः स्वतःच्या वडिलांचे शवविच्छेदन करून विद्यार्थ्यांना शरीरशास्त्राची माहिती दिली. डॉ. महांतेज यांचे वडील डॉ. रामण्णावर यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली होतीच, परंतु मृत्युपत्रात त्यांनी अशीही इच्छा व्यक्त केली होती की स्वतःच्या मुलाने त्यांचे शवविच्छेदन करावे. दोन वर्षांपूर्वी डॉ. रामण्णावर यांच्या निधनानंतर त्यांचे देहदान करण्यात आले होते. आणि यावर्षी त्यांचे चिरंजीव डॉ. महांतेज यांनी त्यांच्या देहाचे शवविच्छेदन करून विद्यार्थ्यांना शरीरशास्त्राचे ज्ञान दिले. अशा तऱ्हेने त्यांनी वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण केली. हे जगाच्या इतिहासातील पहिले आणि सध्यातरी एकमेव उदाहरण आहे. डॉ. महांतेश आणि त्यांच्या वडिलांना आमचे शतशत नमन. आमचे भाग्य मोठे म्हणून चौथ्या पदयात्रेच्या शेवटी बेळगाव येथे के.एल.ई. संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात आमच्या पदयात्रेचा सांगता समारंभ बहारदार रीतीने साजरा झाला. यावेळी डॉ. महांतेश यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला. धन्य ते वडील कै डॉ. रामण्णावर आणि धन्य त्यांचे पुत्र डॉ. महांतेश !
देहदानाच्या बाबतीत गैरसमजांना दूर ठेऊन तटस्थपणे आणि धीरोदात्तपणे देहदानाचा आग्रह धरणाऱ्यांपैकी आणखी एक उदाहरण म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय कै शंतनुराव किर्लोस्कर. त्यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केलीच होती, परंतु तसा विशेष आग्रहही धरला होता. जेव्हा त्यांनी देहदानाचा संकल्प जाहीर केला, तेव्हा त्यांचे एक स्नेही डॉ. गुजर यांनी तुम्ही देहदान करू नका असे पत्र त्यांना लिहिले होते. त्या पत्राला त्यांनी जे उत्तर दिले ते खरोखरच वाचण्यासारखे आहे म्हणून मुद्दामच मी खाली उद्धृत करीत आहे. विचार करा एक इंजिनियर एका डॉक्टरला हे पत्र लिहितोय लक्षपूर्वक वाचा…..
” प्रिय डॉ. गुजर,
आपले १९ जानेवारी १९९० चे पत्र मिळाले. आपण माझ्याबद्दल दाखविलेल्या आपलेपणासाठी मी आपला आभारी आहे. मागील ४० वर्षात माझ्यावर लहान-मोठ्या बारा ते चौदा शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. प्रत्येक वेळी मला आधुनिक वैद्यकशास्त्राचा चमत्कार जाणवला आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या डॉक्टरांशी अनौपचारिक चर्चा करत असताना, माझ्या असे लक्षात आले आहे की माझे देहदान हे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या संशोधनासाठी एक संशोधन प्रकल्प म्हणून उपयोगी पडू शकेल. इतक्या वर्षांमध्ये पार पडलेल्या शस्त्रक्रिया कशा झाल्या आणि त्यातून काही शिकण्यासारखे आहे काय यावरही काही संशोधन होऊ शकेल. वस्तुतः या नवीन वर्षाची सुरुवात माझ्या एका विशिष्ट धमणी मधील रक्तावरोध सुरु होऊन त्यासाठी कराव्या लागलेल्या शस्त्रक्रियेने झाली. हे सर्व अचानक कसे घडले, कोणत्याही लक्षणां शिवाय कसे घडले, हे सर्वांनाच अनाकलनीय वाटते. कदाचित माझ्या मृत्यूमुळे वैद्यकीय संशोधकांना हे कसे घडले असावे त्याचा माग मिळू शकेल व त्यातून दुसऱ्या कुणाला ते होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाय शोधून काढता येऊ शकतील.
“माझ्या देहाची राख होण्यापेक्षा माझ्या देहदानामुळे वैद्यकीय ज्ञानाच्या क्षेत्रात काही भर पडू शकत असेल तर ते नक्कीच जास्त श्रेयस्कर होईल असे माझे ठाम मत आहे”
… हे मूळ पत्र इंग्रजी भाषेत असून वरील मजकूर हा त्याचा मराठी अनुवाद आहे. परंतु एक इंजिनियर एका डॉक्टरला किती ठामपणाने कळवतो यावरून त्यांना देहदानाचे महत्त्व किती मनोमन पटले होते याची साक्ष पटते. देहदान किंवा अवयवदान याबाबत आपल्याला जे पटले आहे ते ठामपणे इतरांना आणि विशेषत: आपल्या कुटुंबियांना तेवढ्याच ठामपणे समजावून सांगता आले पाहिजे. त्यांची मानसिक तयारी करता आली पाहिजे. म्हणजे आपला संकल्प हा नुसता संकल्प न राहता मृत्यूनंतर त्याची अंमलबजावणी होण्याची निश्चिती होते. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री कै. ज्योती बसू व सुप्रसिद्ध साहित्यिक आदरणीय कै विंदा करंदीकर हे सुद्धा असेच देहदान या गोष्टीबाबत आग्रही असत. त्यांचेही मृत्यूनंतर देहदान झाले आहे.
देहदानाच्या बाबतीत कोकणा मधील आमच्या एका कार्यकर्त्याचा अनुभव सांगण्यासारखा आहे. आमच्या पदयात्रेच्या दरम्यान एकदा सभेमध्ये चर्चा करत असता त्या कार्यकर्त्याने हा अनुभव सांगितला. त्याच्या वडिलांनी मृत्यूनंतर त्यांचे देहदान झालेच पाहिजे असे त्याला निक्षून सांगितले होते. त्यांनी देहदानाचा फॉर्मही भरला होताच. पण मुलाला आवर्जून याबद्दल जाणीव करून दिली होती. देहदान नेहमी मेडिकल कॉलेजमध्येच म्हणजेच वैद्यकीय महाविद्यालयामध्येच करावयाचे असते. मृत्यूनंतर सहा तासाच्या आत देह मेडिकल कॉलेजमध्ये नेऊन द्यावा लागतो. त्यामुळे देहदान करायचे असल्यास बाहेरगावाहून येणाऱ्या कोणत्याही नातेवाईकांची वाट पाहणे शक्य नसते. या मुलाने वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ताबडतोब शववाहिकेची व्यवस्था केली. त्यांच्या गावापासून जवळचे मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथे होते आणि कोल्हापूरला जाण्यासाठी किमान तीन ते चार तासाचा अवधी लागणार होता. कुणालाही कल्पना न देता त्याने शववाहिकेमध्ये वडिलांचे शव ठेवले आणि कोल्हापूरच्या दिशेने निघाला. जाण्यापूर्वी त्याने मृतदेहाचा फोटो मोबाईल वर घेतला आणि सगळ्या नातेवाईकांना संदेश पाठवला “वडिलांचे निधन अमुक अमुक वाजता येथे झाले आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यासाठी मी कोल्हापूर येथे घेऊन चाललो आहे. आपल्यासाठी प्रत्यक्ष देहदर्शन शक्य होणार नाही. परंतु मृतदेहाच्या दर्शनाची सोय मी आपल्याला व्हाट्सअप च्या माध्यमातून करून देत आहे. घर बसल्या मृतदेहाचे दर्शन घेऊन वडीलांसाठी प्रार्थना करावी, आणि इकडे येण्याची धावपळ करू नये ही विनंती.” अशा तऱ्हेने सोशल मीडियाचा एक चांगला वापर करून नातेवाईकांची इच्छा आणि वडिलांची इच्छा या दोन्हीचा मान राखत देहदानाची पूर्तता केली. त्या तरुणाची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. आजच्या तरुणाईच्या डोक्यामध्ये अशा चांगल्या कल्पना येतात त्या कल्पनांना माझा सलाम !
मृत्यूनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावायच्या काही पद्धती आहेत. आनंदवनामध्ये आदरणीय बाबा आमटे यांनी प्रचलित करून ठेवली आहे ती पद्धत जास्त पर्यावरण स्नेही आणि सर्वोत्कृष्ट आहे असे मला वाटते. त्या ठिकाणी जमिनीत खोल खड्डा खणून मृतदेहाला केळीच्या पानामध्ये गुंडाळून तो मृतदेह खड्ड्यांमध्ये पुरला जातो. त्या मृतदेहाच्या खाली आणि आजूबाजूला मीठ टाकले जाते आणि नंतर तो खड्डा बुजवून त्यावर एक वृक्ष लावला जातो. ही माझ्या मध्ये सगळ्यात उत्कृष्ट देहाची विल्हेवाट लावण्याची पद्धत आहे. लिंगायत समाजामध्ये सुद्धा व्यक्तीच्या मृत्यूनंतर व्यक्तीला जमिनीत पुरण्याची पद्धत आहे. व्यक्तीच्या देहाची माती होऊन जाण्याची प्रक्रिया व त्या मातीवर एखादा वृक्ष जगवणे ही पर्यावरणपूरक पद्धत ही जगात सगळीकडे असावी असे माझे वैयक्तिक मत आहे. अर्थात आपल्या देशामध्ये याबाबतीत बदल होणे अशक्यच. अनेक धर्म, अनेक जीवनपद्धती अनेक प्रचलित समजुती यांचा पगडा आहेच. त्यातही समजा आनंदवनाच्या पद्धतीने मला माझ्या देहाची विल्हेवाट लावायची असली तरी ती होईल का ? प्रत्येक धर्माची वेगवेगळी दफनभूमी आहे. त्या दफनभूमी मध्ये दुसर्या धर्माच्या व्यक्तिचा देह नेला जाऊ शकत नाही. भविष्यात माझ्या मृत्यूनंतर तशी वेळ आलीच तर मला दफनभूमी मिळू शकणार नाही. कारण हिंदूंमध्ये दहनाची पद्धत असल्यामुळे हिंदूंसाठी दफनभूमी नाही. कोणत्याही शहरामध्ये अजून निधर्मी अथवा सर्वधर्मी सर्वसमावेशक दफनभूमी निर्माण करण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे याबाबत सरकार दरबारी समविचारी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे वाटते. मृत्यूनंतर आपल्या देहाचे काय व्हावे याबाबत, तसेच मृत्युपूर्वीही आपल्या देहावर वेळप्रसंगी उपचार कशा पद्धतीने व्हावेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून वैद्यकीय इच्छापत्र करण्याचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न काही सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. अजून त्याला कायदेशीर मान्यता नाही. पण याबाबतीत कायदेशीर मान्यतेचा लढा लढण्यासाठी समविचारी कार्यकर्त्यांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजेत. एखाद्या व्यक्तीने देहदान अवयवदान या बाबतही जर स्वतःचे खुले वैद्यकीय इच्छापत्र बनवले असेल, त्यामध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीला त्याबाबतचे अधिकार दिले असतील, तर त्याची अंमलबजावणी कायदेशीररित्या झाली पाहिजे. त्याच्या कुटुंबीयांच्या इच्छेपेक्षा त्या व्यक्तीची मृत्यूपूर्वीची इच्छा ही सगळ्यात महत्त्वाची मानली गेली पाहिजे. ज्याप्रमाणे मृत्युपत्राने स्वतःच्या संपत्तीचे वाटप व्यक्तीला करता येते आणि त्या पद्धतीने ते होणे ही कायदेशीर जबाबदारी असते. त्याचप्रमाणे शरीरसंपत्ती बाबत सुद्धा वैद्यकीय इच्छापत्र मान्य करून त्याप्रमाणे इतर कोणाच्याही इच्छेचा विचार न करता अंमलबजावणी करता आली पाहिजे. अशा पद्धतीने कायद्यामध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न करावयाचे आहेत.
— समाप्त —
© श्री सुनील देशपांडे
पुणे, मो – 9657709640 ईमेल : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈