सौ. ज्योती कुळकर्णी `
🌸 विविधा 🌸
☆ सावित्रीबाईंच्या मनातलं… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
मी सावित्री बोलतेय गं माझ्या लेकींनो तुमच्याशी. मलाही थोडं मन मोकळं करावसं वाटतयं नं तुमच्या जवळ!
आज तुम्ही सगळ्या माझ्या कामाची दखल घेऊन कृतज्ञता व्यक्त करता आहात नं!खूप बरं वाटतयं मला!खरचं तेव्हा मला खूप कष्ट पडले गं मुलींनो प्रवाहा विरुद्ध पोहोतांना! सगळ्या समाजाचा विरोध होता मुलींना शिकवण्यासाठी. पण माझ्या पतीचा ज्योतीबांचा भरभक्कम हात होता माझ्या पाठीवर म्हणून मी तरून जाऊ शकले. अर्थात मलाही तेव्हढं धैर्य गोळा करावच लागलं बरं का?
का शिकवायचं नाही मुलींना याचं मुख्य कारण काय सांगायचे तेव्हाचे बुजरूक माहिती आहे का?ते म्हणायचे, मुलींना शिकवलं तर त्या आपल्या याराला पत्र लिहितील आणि त्याच्या सोबत पळून जातील. पण नंतरच्या काळात साने गुरूजींनी ठाम पणे सांगितले की खूप काळाने दाव्याला बांधलेली गाय सोडली की ती हुंदडते व आपल्या वासरासाठी घरी परतते. त्याचप्रमाणे स्त्री सुद्धा खूप काळ बंधनात होती म्हणून थोडा काळ भरकटल्यासारखी दिसेल पण आपल्या पिल्लांसाठी घरट्यात परतेलच!बरोबर आहे न गं मुलींनो! आतापर्यंत तरी तुम्ही त्यांचे बोल खरे करून दाखवले. शिकून, नौकरी करून, स्वातंत्र्य घेऊनही घरटं नीट सांभाळलं. आपल्या भारतीय संस्कृतीचे पाळंमुळं घट्ट धरून ठेवलीत.
पण आजकाल थोडं थोडं चित्र बदलू लागलयं का गं?मुली वरवरचं रूपडं बघून प्रेमात पडतात आणि स्वतःचंच जीवन उद्ध्वस्त करताहेत!अगं मला माझ्या ज्योतिबांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं म्हणून माझ्या हातून येव्हढं मोठं कार्य घडलं. पण मी आपल्या भारतीय संस्कृतीशी नाळ जोडलेलीच राहू दिली. कारण पाळंमुळं खोलवर रूजली होती मनात. शिकून मुलींनी उंच झेप घ्यावी. स्वतःची उन्नती करून घ्यावी. हेच चित्र होतं माझ्या डोळ्यापुढे तेव्हा. बरोबर होत ना गं ते!तुम्ही पण ते चित्र छान रंग भरून सर्वांसमोर आणलं बरं का!मला खूप अभिमान वाटतोय त्याचा.
पण एक सांगू का तुम्हाला?तुम्ही शिक्षणाचा उपयोग आपल्या उन्नती बरोबर आपल्या देशाची, संस्कृतीची शान राखावी या करताच करा हं मुलींनो. आज आपले मुलं मुली कुठल्या दिशेने धावताहेत याकडे वेळीच लक्ष द्या बरं का?दुसर्या संस्कृतीमधील चांगल्याबरोबर वाईटही गोष्टी आधुनिकतेच्या नावाखाली उचलू नका. अन्यथा पश्चात्तापाची वेळ येईल. अजूनही लगाम तुमच्याच हातात आहेत. ते आवरा, उधळू देऊ नका. “सावित्री बाईंनी स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले केले” या शब्दांना अलगद सांभाळणं, या शब्दां बरोबरचं माझाही मान राखणं आता तुमच्याच हाती आहे बरं का!कारण मी हाती घेतलेला वसा मी तुमच्या हाती खूप विश्वासाने सोपवला आहे. माझा विश्वास सार्थ करणे तुमच्याच हाती आहे.
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈