सुश्री अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ सिंहावलोकन… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

🚩 प्रभूवर भूवर शिववीर आला

तुजसाठी मरण ते जनन

तुजवीण जनन ते मरण…

✍️”दातृत्व” हा दैवी गुण आहे. दैवी संपत्ती.

“स्वीकार” सुध्दा दैवी गुणच आहे ह्याची मला जाणीव झाली. देणे सोपे नाही हे आपण मानतोच पण मन:पूर्वक स्वीकार सुध्दा कठीणच बरं.

वरवर स्वीकारणे व खरे स्वीकारणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. देणार्याने देत जावे व घेणारा त्या क्षमतेचा असेल तरच ती दैवी संपत्ती ची देवाण घेवाण होते.

सद्गुरू परमहंस तळमळत होते त्यांच्या ज्ञानदानासाठी. गोष्ट प्रथम ऐकली विशेष वाटली नाही. पण अनुभवाने समजतंय सत्पात्रही तितकेच महत्त्वाचे आहे. विवेकानंद दिसल्याबरोबर तळमळ शांत झाली व ज्ञानदान करत असताना दैवी आनंदाची अनुभूती दोघांनाही आली.

हा सुयोग असतो ते दैवी कार्य असते ते क्वचितच घडत असते.

त्याला चमत्कार म्हणता येईल. सृष्टी चमत्कार.

असे दैवी संकेत व कार्य अव्याहत सुरू असते.

स्वामीजी हे एक उदाहरण स्वरूप लिहिले.

शंखामध्ये मौक्तिकाची निर्मिती हे दैवी क्षणाचे द्योतक आहेत.

म्हणून देणे व घेणे या परस्परपूरक क्रिया आहेत हे पटते.

यालाच once in a life time opportunity म्हणतात.

एकतर देण्याची किंवा घेण्याची पूर्ण तयारी करणे हेच खरे जीवन आहे. एक मार्ग निवडणे आवश्यक आहे.

(अन्यथा जास्तीत जास्त गोष्टी आपण वायाच घालवतो.)

गुरू शिष्य जोडीच अमरत्व‌ प्राप्त करू शकते. मधला पर्याय नाहीच.

या अशा क्षणांची अनुभूती घेणे अध्यात्म आहे.

||जय भवानी जय शिवाजी ||

।।जय शिवराय।।

छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांना शहाजीराज्यांनी स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-

संस्कृत :

“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।

शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।”

मराठी :

ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल.

ही अशी जाज्वल्य राजमुद्रा ज्यांची आहे व शुकासारखे पूर्ण वैराग्य व वशिष्ठासारखे ज्ञान असणारे रामदास स्वामी ही उत्तम गुरू शिष्य जोडी आहे. अश्या या सुवर्ण युग निर्मित्यावर स्वातंत्यवीरांनी केलेले कवन म्हणजे सर्वोत्तम कलाकृती च म्हणावी लागेल.

प्रखर देशभक्त, उत्तम कवी व युगनिर्मात्याचे चरित्र हे ह्या कवितेचे वैशिष्ट्य आहे.

सावरकर म्हणताहेत यवनाचा पृथ्वी वर अतोनात भार झाला व हिंदूंची श्रध्दास्थाने व गोमातेचा वध करू लागलेत. हे श्री महाराजांना सहन होणे शक्यच नव्हते. अशा दयनीय परिस्थितीचा सामना करण्यासाठी…

प्रभूवर भूवर शिववीर आला…

हे हिंदूंचे हाल जिजाऊ कसे पाहू शकणार? त्यांना सावरकर जगताची जननी उद्बोधत आहेत. अशा या मातेने शिवबांना असे बाळकडू व ओतप्रोत देशप्रेम दिले व कुलभूषण हा संस्कृतीसंरक्षकच नव्हे तर संवर्धक बनला.

प्रभूवर भूवर शिववीर आला…

सावरकर जिजाऊ शिवबा जोडीची तुलना राम कौसल्या, कृष्ण यशोदा यांच्या शी करतात.

रामकृष्णांनी जसा राक्षसांचा वध केला तसेच महाराजांनी अती क्रूर यवनांचा नि:पात करुन स्वराष्ट्र निर्मिती केली व चंद्र जसा कलेकलेने वृध्दिंगत होतो तसे सुराज्य प्रस्थापित केले.

प्रभूवर भूवर शिववीर आला…

“जय जय रघुवीर समर्थ” चा उद्घोष दिशादिशात घुमला व सर्वोत्तम गुरू शिष्य जोडी उदयास आली. देश व धर्म जागवणे व वाढवणे हेच त्यांचे ब्रीदवाक्य ठरले. राजकारण डावपेच शिकवणारे गुरु कृष्णनीतीची आठवण करून देणारे ठरलेत.

प्रभूवर भूवर शिववीर आला…

पुढील दोन कडव्यात सावरकर अफजलखानाचा अतर्क्य असा खातमा व नंतर आई भवानी चा गोंधळ याचे रसभरीत वर्णन करतात. काय तो दैदिप्यमान सोहळा असेल याची आपण कल्पना केलेली बरी. मातोश्रीचे स्वप्न व कुलस्वामिनी जगदंबेने स्वप्नात भवानी तलवार देणे अद्भुत अलौकिक च असे ते गाताहेत.

प्रभूवर भूवर शिववीर आला…

शेवटी सावरकर गदगद् होऊन म्हणतात या सुपुत्राने “अवतार कार्य” पूर्णत्वास नेले. अशक्य कार्यास अवतार कार्य म्हणताहेत. व कार्यपूर्ती करून निजधामास गेले. अशा या युगपुरुषाचे कवन विनायकासोबत इतर सगळे कवी गाताहेत ही अत्युत्तम कोटी ते करताहेत. (सविनायक कविनायक)

प्रभूवर भूवर शिववीर आला…

असा हा त्रिवेणी संगम आपणासमोर यथामती मांडताना परमानंद होतो आहे.

विनायका हिंदू एकवटला…

जय जय रघुवीर समर्थ..

जय भवानी जयशिवराय..

🚩🚩🚩🚩

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments