☆ विविधा ☆ सहभोजन….. ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

सहभोजने: वनातली, शेतातली आणि मनातली!!

कुणीतरी म्हटलेय ना!  निसर्गाच्या सानिध्यात एकत्र जेवा. मग पहा!  मनातली सगळी किल्मिष निघून जातील आणि स्वच्छ मनात नव्या नात्यांचे आणि नव्या मैत्रीचे गोफ विणले जातील. याचे कारण म्हणजे या जेवणानंतर होणारे उपस्थितांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम,  आणि त्यामधून व्यक्त होणारी त्यांची अंतरे!!!

कोजागिरी पौर्णिमा, शाळेतले हदगा विसर्जन, केळवणे,  डोहाळजेवणे, ट्रेकिंगच्या वेळचे कॅम्प फायर… कितीतरी… माझ्या नशिबाने मी अशी सहभोजने खूप आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर आणि वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवलेली आहेत.

त्या सहभोजनांच्या वेळी खाण्याच्या पदार्थांची चव तर खुलतेच पण त्यासाठी आलेली माणसेही खुलतात आणि मनापासून उलगडतात. तेव्हा आपल्याला अजिबात अज्ञात असलेले त्यांच्यातले कला गुणही कळतात.

अशाच एका प्रसंगाच्या वेळी..एरवी सतत सर्वांवर करवादत असलेल्या माझ्या एका आत्याला केशवसुतांच्या कितीतरी कविता आणि गडकरींच्या नाटकातले उतारे पाठ आहेत हे कळल्यावर तिच्याकडे पहायचा दृष्टिकोनच बदलला.

अनेकदा आम्ही त्यावेळी ‘जस्ट ए मिनिट’  हा खेळ खेळत असू. यामध्ये आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने आपल्याला एखादा विषय द्यायचा आणि त्या विषयावर आपण मिनिटभर विचार करून बोलायचे.  यावेळी लोकांची खरी ओळख व्हायची.  त्यांच्याबद्दलचा आदरही दूणावायचा.

माझ्या त्या सहभोजनविशिष्ट आठवणींच्या पोतडीतल्या काही खास आठवणी आज मी इथे पेश करते आहे.

नवरात्र दिवाळी संपली की आमचे हिंगणघाटचे आजोबा,  ‘अंगणातल्या स्वैपाकाचा म्हणजे पानगे वरणाचा बेत जाहीर करत.  सर्वांनाच मोठा उल्हास येई. खरे तर पानगे वरण हा स्वैपाक घरातली पुरुष मंडळी करत.  पण त्याची तयारी मात्र अर्थातच बायकांना करावी लागे.

अंगणात काट्या कुटक्या गोळा होत. तुराट्या आणल्या जात.  पळसाची आणि वडाची पाने जमवली जात. आजी मिरच्याचा ठेचा,  जवस आणि तीळाच्या चटण्या करून ठेवी. गव्हाची जाडसर कणिक दळून आणे.

बहुधा सुट्टीच्या दिवसात हा बेत जमवत असल्यामुळे शेजारी पाजारी आणि जवळपासची नातेवाईक मंडळी या सर्वांना त्याचे निमंत्रण जाई.

भल्या सकाळी अंगणातली चूल सारवून घेत आणि त्यावर तूरीच्या वरणाचे मोठ्ठे पातेले चढे.  पुरूष मंडळी धोतर खोचून भरपूर तूप घालून मोठ्या परातीत कणिक भिजवत.  त्याचे गोळे पळसाच्या पानात बांधत आणि ते निखा-यांवर भाजायला ठेवत. पान जळले की आतले पानगे शिजत. जळलेल्या पानासकट पानगे वाढले जात.  ती पाने काढणे कौशल्याचे असे. मग ते गरम गरम पानगे मधोमध फोडायचे आणि मग त्यात ते वाढणारे तूप ओतायचे. हे पानगे द्रोणात वाढलेल्या तूरीच्या गोड वरणात  भरपूर तूप घालून  खाल्ले जात.

दुसर्‍या बाजूच्या निखा-यावर विशेषतः तरूण मंडळी भरपूर तेल घालून कणिक भिजवत आणि तर्री मसाला घालून तिखटजाळ फोडणीचे वरण करत.

हे सगळं होत असताना बायका पत्रावळ्या आणि द्रोण लावत आणि अखंड बडबड करत. मुले इकडून तिकडे पळापळी करत.

यावेळी पहिली पंगत बायका आणि मुलांची बसे… आग्रह करकरून पुरुष मंडळी वाढत. जेवण झाल्यावर विविध गुणदर्शन…  स्त्रिया आणि पुरूष अशा गाण्याच्या, कधी स्वरचित गाण्याच्या भेंड्या होत.   एकमेकांना कोपरखळ्या मारत.  बरोबर नेम बसायचा.

कधी कधी घरात केलेले जेवणाचे पदार्थ आणि लोणचं घेऊन एखाद्या बागेत जायची पध्दत होती.  शेजारच्या चार पाच घरांमध्ये बेत ठरायचा आणि रोजचे नेहमीचेच जेवण खूप रूचकर बनायचे.

सगळ्यात मजा यायची ती आवळीभोजनाला, हे बहुधा आळीतल्या किंवा भिशीतल्या बायका ठरवत.  प्रत्येक जण जेवणातले वेगवेगळे पदार्थ घेऊन येण्याची जबाबदारी वाटून घेई . सांज्याच्या पोळ्या, साध्या पोळ्या,  पु-या, बटाट्याची भाजी, घट्ट पिठले, दहीभात, चटण्या आणि लोणची,  आवळ्याचे लोणचे असावेच लागे.   असे पदार्थ असत.  शिवाय पेरू आणि बोरेपण आणत.

यावेळीही गाण्याच्या भेंड्या, उखाणे, बैठे खेळ रंगायचे. चारच्या सुमाराला सगळ्या बायका मिळून कच्चा चिवडा करत. एरवी घरात अगदी हळू आवाजात बोलणा-या  आणि पदर तोंडावर ठेवून हसणा-या बायका तिथे मोठमोठ्यांदा बोलत आणि हसत.

त्यामुळेच की काय कोण जाणे दिवस उतरायला आला की  घरी परतताना पावले जड होत.

माझ्या वर्धेच्या काकांनाही  पाहुणे आले की गावाबाहेर पेरूच्या मळ्यात, झाडाखाली जेवायला जायला अतिशय आवडे.  काकू पालक परोठे,  लोणचे, शेंगदाण्याची चटणी करून बरोबर घेत.  बाहेरच्या मोकळ्या हवेत चार घास जास्त जात.  आपसातली भांडणे विरून जात.

या सगळ्यांवरची कडी म्हणजे… हुर्डा पार्टी,  आजीच्या माहेरी वैद्यांची हुर्डापार्टी आणि तळेगावकर देशपांड्यांची हुर्डा पार्टी दोन्हीही खासच असत.  पण देशपांड्यांकडे हुर्डा पार्टीच्या वेळी काका मोठ्या आकाराचे गोड साखरेचे पेढेही कधीतरी आणत.  कोवळी ज्वारीची कणसे निखा-यावर भाजून त्यातले कोवळे दाणे पत्रावळीवर देत.

त्याबरोबर निखा-यावर वांगे,  टोमॅटो, कांदे आणि मिरच्या भाजून केलेले भरीत असे.  प्रत्येकाला द्रोण भरभरून दही साखर आग्रह करकरून खायला घालत. शेतातले कच्चे मूळे,  गाजर कांदे,  टोमॅटो, पेरू चिरून देत. कोवळ्या तूरीच्या शेंगा आणि बोरे खाऊन पोट गच्च भरायचे.  मनसोक्त शेतात हुंदडून झाले की घरी परतताना प्रत्येकाला भाजलेला हुरडा आणि शेतातली भाजी द्यायची पध्दत वैद्यांकडे होती. यावेळीही हास्यविनोदाचे फवारे उडत.

कधीतरी घरात कोणत्यातरी निमित्ताने पाहुणे जमले की एखाद्या शेतात,  देवळाजवळ स्वैपाक करायची टूम निघे.  अशावेळी घरातून फक्त पोळ्या करून घेत.  तिथे चूल मांडून  एका मोठ्या हांड्यात पाणी उकळत . त्या पाण्यात डाळ,  टोमॅटो, मिरच्या, वांगे,  मूळे,  भोपळ्याच्या फोडी,  बोरे भुईमुगाच्या शेंगा अशा असतील त्या भाज्या घालत. उपलब्ध असतील ते मसाले घालत आणि अक्षरशः  भाज्या आणि डाळीचे असे काही चवदार मिश्रण तयार होई की त्याची सर घरात बनवलेल्या कोणत्याही भाजीला येत नसे.  कधी कधी मात्र तिखट चमचमीत वांग्याची भाजी किंवा विदर्भ स्पेशल मसाले भरून अख्ख्या भोपळ्याचे गाकर बने…

कोल्हापूरला राजारामपुरीत मुडशिंगीकरांच्या वाड्यात रहात असताना त्यांच्या गच्चीवर आपापली ताटे घेऊनही कितीदा एकत्र जेवत असू किंवा मुडशिंगीच्या त्यांच्या शेतात किंवा त्यांच्या गु-हाळावर सगळे बि-हाडकरू एकत्र जेवायला जात असू. अशा वेळी जून्या आठवणी निघत. अनुभवांचे खजिने रिते होत. कितीतरी माहितीची देवाणघेवाण होई.

या सहभोजनांच्या आणि विशेषतः त्यानंतरच्या गप्पांच्या स्मृती माझ्या रसनेने आणि अर्थातच मनातही जपलेल्या आहेत.

त्या अधून मधून बाहेर पडतात.  मग मी या लाॅकडाऊनच्या काळात… आमच्या कोल्हापूरच्या घरातही दुपारच्या चहाच्या वेळी कच्चा चिवडा नाहीतर दडपे पोहे करते आणि कर्दळीच्या पानात घेऊन …आंब्याच्या झाडाखाली बसून एकटीच खाते. त्यावेळी संगतीला सोबत माणसे नसली तरी असतात त्या आठवणी आणि पाखरांची गाणी!

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

सहभोजन खूप चविष्ट.