सुश्री संगीता कुलकर्णी
विविधा
☆ संध्याकाळ… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
मी फिरत फिरत समुद्र किना-यावर गेले तांबूस पिवळा मावळता सूर्य मला नेहमीच भुरळ घालतो, लाटा आज जरा मोठ्याच होत्या जमेल तेवढी पुढे गेली, दगडांवर, भिंतीवर आपटणा-या लाटांचे तुषार छान पैकी उसळून अंगावर येत होते त्यांची खारट चव ओठांवर जाणवत होती. हलकेच पण बोचरा होऊ लागलेला सांजवारा.. पक्षांचे थवे घरट्याच्या ओढीने परतीला निघाले होते पण असं का वाटत होतं मला की आज सूर्य अस्ताला जायला उशिर करतोय… ?
आज संध्याकाळ जरा जास्तच रेंगाळली.. तिलाही कळलं मला तुझी आठवण आली.. ! स्वाभाविकच आहे म्हणा. अश्या रम्य वेळी त्याची आठवण येणारच की.. निसर्गच तो आपल्याला स्वत:त गुंतवतो हे मात्रं खरं.. समुद्र किना-यावरची संध्याकाळ आणि श्यामल काळे ढग जमा होता होता दूरवरून येणारा मातीचा सुगंध येऊ लागला कि आपसूकचं आठवणी जिवंत होऊ लागतात. पावसासोबत आमचं खूप प्रेमळ नातं आहे किंबहुना प्रत्येकाच तसं असतचं नाही का ? मग
ढगांनी केली सरींची पाठवण मग तो आला तर एकटा कसा येईल? त्याला सुद्धा आठवण करून देईल… ! आली असेल का त्याला माझी माझी आठवण ?
पाऊस पडायला लागला की सारं कसं मस्त, प्लेझंट, वेगळच हव हवंस वाटायला लागतं. पावसानं यावं, धुवांधार बरसावं आणि हो अशा वेळी नेमकी आपल्याकडेच छत्री असावी व त्यानं स्वतःची विसरून यावी.. ! किंवा याच्या उलट झालं तरी चालेल मग सर्वांच्या देखत, स्वतःच्या नकळत मला सावरत, भिजत घेउन जायचं, पुन्हा दुस-या दिवसासाठी त्याच ओढीनं एकमेकांकडे पहायचं… जसं.. धरणीच्या ओढीनं सरी येतात नी बरसतात.. केव्हा तरी परिस्थिती गडबड करते त्याच नसणं जास्त बोचरं भासतं.. एकटेपणाचं वाटतं मग माझ मन कशातच रमत नाही… उगीचच छातीत धडधडायला लागतं पण चेह-यावर ते न दाखवता काम करत रहायचं.. पण मनाचं काय ? ते तर केव्हाच ट्रांन्समध्ये गेलेलं असतं आठवणींच्या सरीत चिंब भिजत राहीलेलं असतं…. दोन्हीकडे तिचं परीस्थिती कुणी कुणाला समजावयच ? पण ते शक्य नसतं उरतं फक्त परस्परांसाठी झुरणं… कधी थेंब थेब अश्रुंचं झरणं..
चिंब पावसात आठवणींच्यात भिजायचं..
सवय लागते मग एकमेकांसाठी झुरण्याची.. !
पाऊस दरवर्षी येतच राहतो ॠतूचक्रा सोबत जीवनचक्र पण चालत रहातं आता एक छोटी छत्री सोबत आलेली असते मग पावसाची परीभाषा थोडीशी बदलते बोबडी होऊ लागते… पाऊस येतच राहतो… येतच राहतो
मग येते अशीच एक सांज संध्याकाळ आयुष्याची… पुन्हा नवा भूतकाळ दुस-याला गोठवतो. आराम खुर्चीत बसून आठवणींचे झोके घेत रहातो डोळ्यांच्या कडा ओल्या होऊन सुकत जात असतात… आपोआप डुलकी लागते. शरीराच्या थकव्याने व मनाच्या एकटेपणाने.. मग सारी मरगळ दूर होते व त्या सोबतच परत एक संध्याकाळ स्मरू लागते आणि ती संध्याकाळ मनात रेंगाळत राहते..
© सुश्री संगीता कुलकर्णी
लेखिका /कवयित्री
ठाणे
9870451020
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈