श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

स्त्री… विविध भूमिकांमधील ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

जागतिक महिला दिन !!!

स्त्री……. विविध भूमिकांमधील

सर्वप्रथम सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्रिवार वंदन !!!

आपल्या आयुष्यात स्त्रीया (महिला) कायम वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात आणि आपले आयुष्य समृद्ध करत असतात. हे सर्व करताना त्यांना काय मिळतं याचा कितीही अभ्यास केला तरी पूर्णत्वाने ते मला कळेल असे म्हणणे धाडसाचेच होईल. “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे।” हेच खरे. आज ‘जागतिक महिला दिनाच्या’ निमित्ताने आपल्या जीवनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या काही प्रमुख नात्यांस या लेखाच्या माध्यमातून मानाचा मुजरा करीत आहे.

आई

आज हा लेख लिहिण्याचा प्रयत्न करु शकतोय कारण एक स्त्रीने (मातेने) मला जन्म दिला आहे. आपल्या आयुष्यातून स्त्री वजा केली तर आपले आयुष्य अर्थहीन होईल असे म्हटले तर वावगे होऊ नये. आई नुसता जन्म देत नाही तर ती आपली बाळाच्या जीवनास आकार देते. आई देताना काही हातचे राखून ठेवत नाही. जे शक्य असेल ते सर्व आपल्या बाळास देते आणि सर्व देऊनही भरुन पावते. या “जगात ‘रिती’ होऊनही ‘भरुन’ पावणारी” कोण असेल तर फक्त ‘आई’!! ‘आई’ या शब्दात सारे विश्व सामावलेले आहे. सर्व शास्त्रे, शस्त्रे, सुखदुःख आणि अध्यात्म ‘आई’ दोन अक्षरी शब्दात मावते. ज्याला संपूर्ण समाधान प्राप्त करायचे असेल त्याने समोरच्या मनुष्याची ‘आई’ व्हावे अथवा त्याला आपली ‘आई’ मानावे. ज्याला अध्यात्मात प्रगती करायची आहे त्याने सद्गुरुंना किंवा आपल्या आराध्य देवतेला ‘आई’ मानावे आणि स्वतःला ‘बालक’. सर्व ठिकाणी जर मातृभाव ठेवता आला तर कोणत्याही शस्त्र अथवा शास्त्राची गरजच पडणार नाही, असे वाटते. मनुष्याने सुखी होण्यासाठी एकतर ‘मातृभाव’ ठेवावा किंवा ‘पुत्रधर्म’ पाळावा. दोन्हीकडे कर्तव्यपूर्तीचे समाधान खात्रीने लाभते. सर्व महान संतांचा हाच अनुभव आहे. आपण तसा प्रयत्न करू. *

बहीण

आईनंतर सर्वात जवळचे नाते कोणते असेल तर ते बहिणीचे. बहीण लहान असावी की मोठी यावर वाद होऊ शकतो पण बहीण असावीच असे प्रत्येकाचे मत असेल असे खात्रीने वाटते. ताई आणि माई. घरात मोठी मुलगी असेल तर घराला आपसूक वळण लागते असे माझे मत आहे. जे आपण आई किंवा बाबांना सांगू शकत नाही ते आपण आपल्या बहिणीला नक्की सांगू शकतो. मन मोकळं करण्यासाठी सर्वात खात्रीचे, जवळचे कोण असेल तर बहीण. कारण तिच्यात आणि आपल्यातील वयाचे अंतर फार नसते त्यामुळे ती आपली मनःस्थिती अधिक सजगतेने समजून घेऊ शकते. कधी ती आपली ‘ढाल’ बनते तर कधी ‘तलवार’!! बहीण लग्न होऊन प्रथम सासरी जायला निघते तो क्षण भावाच्या आयुष्यातील सर्वात कसोटीचा !! जरी ती सासरी गेली तरी तिची नजर कायम आपल्या भावंडांवर असते. पुढे कालांतराने आई वडील नसले तरी बहिणीमुळे भावाला एकाकीपण येत नाही. ती आपल्या आयुष्यात सावली सारखी असते. ती शीतल छाया जरुर देते पण आपल्या आयुष्यात अडसर बनत नाही. द्रौपदीने हरि ला चिंधी बांधली आणि तिच्या आयुष्याचे ‘सोने’ झाले. *’बहिण अथवा भावासाठी आपल्या आयुष्याची ‘चिंधी’ करणाऱ्या अनेक बहिणी या जगात आहेत. आज आपण त्यांना वंदन करू.

पत्नी

एखाद्या स्त्रीसाठी सर्वात नाजूक आणि आव्हानात्मक भूमिका कोणती असेल तर पत्नीची. आपल्याकडे परंपरेनुसार स्त्रीच सासरी जाते. साधारण २० ते २२ वर्षे माहेरी राहिल्यावर लग्न होऊन दुसऱ्या घरी जायचे. तेथील सर्व माणसांना आपले मानायचे. पती, सासूसासरे, नणंद, दीर, आणि कुटुंबातील इतर नातेवाईक तसेच पुढे मुलांना समजून घेऊन त्यांच्याशी आपुलकीने सुसंवाद साधायचा. ते घर आपलं मानून आवश्यक ते सर्व त्या घरासाठी करायचे. एका अर्थांने त्या घराला घरपण द्यायचे. हे लिहायला, वाचायला सोपे नक्कीच आहे पण आचरणात आणायला तितकेच अवघड. इतकं सारं करीत असताना स्वतःचे भावविश्व जपायचे. इतकं सारं फक्त स्त्रीचं करु शकते.

*कार्येषु मंत्री करणेषु दासी|

भोज्येषु माता शयनेषु रम्भा ||

धर्मानुकूला क्षमया धरित्री |

भार्या च षाड्गुण्यवतीह दुर्लभा||*

(भावार्थ :- कार्यात मंत्री, गृहकार्यात दासी, भोजन करताना माता, संसारधर्म पाळताना रंभा, धर्मकार्यात अनुकूल आणि क्षमाशील पत्नी असावी. पण असे सहा गुण असलेली पत्नी मिळणे दुर्लभ आहे.)

वर सांगितलेल्या गुणांपेक्षा कितीतरी अधिक गुण आज प्रत्येक ‘पत्नी’ने आत्मसात केलेले असतात असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. पत्नी ‘पत्नी’ राहिलेली नाही तर ती आज सर्वार्थाने घराची पालनकर्ती झाली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरु नये. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण हे नातं निभावणाऱ्या सर्व स्त्रियांना वंदन करू.

लेक अर्थात मुलगी

“मुलगी शिकली तर सारे घर शिकते” असे बरीच घोषवाक्ये आपण ऐकतो. कुटुंबाचा विचार केला तर घरात मुलींचे स्थान खूप महत्वाचे असते. त्यातल्यात्यात बापलेकीचे नाते अधिक रेशमी आणि तितकेच उबदार. मुलगी जशी घराची शान असते तशी ती बाबाचा प्राण असते. खरं ती घराचं ‘नाक’ असते. ‘कालचा’ बाबा आणि ‘आजचा’ बाबा यात लौकीक अर्थाने फरक दिसत असेल पण लेकीच्या बाबतीतील आजचा बाबा अगदी तसाच संवेदनशील आहे आणि पुढेही राहील…. उलट तो अधिक भावुक झालेला दिसेल. ‘दमलेल्या बाबांची कहाणी’ त्या त्या घरात जितकी लेकीला उमगते तितकी खचितच दुसरं कोणाला उमगत असेल. मुलीचा जन्म झाल्यापासून ती सासरी जाईपर्यंत आणि त्यानंतरही ह्या नात्यात तसूभरही फरक पडत नाही. बालपणी ‘लाडकी बाहुली होती माझी एक…. ‘ म्हणून जोजवणाऱ्या बाबाला आपली ‘बाहुली’ कितीही मोठी झाली तरी त्याला ती ‘बाहुली’च वाटते. लेक चालली सासरला…. यातील वेदना आणि भावना फक्त एक बापच खऱ्या अर्थाने समजू शकतो. तिच्या मनात बाबासाठी एक खास रेशमी कप्पा कायम असतोच. आज या नात्यालाही वंदन करू.

मैत्रीण (स्त्री अथवा पुरुष दोघांची)

मैत्रीण :- स्पर्श न करताही जिला आधार, ज्याला आधार देता येतो तो मित्र अथवा मैत्रीण असे म्हटले तर सयुक्तिक होईल असे वाटते. आज अनेक स्त्रपुरूष सहकारी आहेत, एकत्र काम करतात त्यामुळे त्यांच्यात मैत्री होणे अधिक सहज. बदलत्या जीवनशैलीमुळे एखादी स्त्री पुरुषाला अधिक चांगले समजून घेत असेल. आज मैत्रीत कोणताही विषय वर्ज्य नाही. नीती नियमांचे, विधीनिषेधाचे नियम पाळून जेव्हां निकोप मैत्री केली होते, तेव्हा ते मैत्री न राहता त्याचे मैत्र कधी होते ते कळतही नाही. कृष्ण (युगंधर) आणि द्रौपदी (युगंधरा) हे आपल्यासाठी स्त्री पुरुष मैत्रीचा आदर्श आहेत.

खरंतर स्त्री अनेक नाती/भूमिका निभावत असते, मी इथे प्रमुख ‘नात्यां’चे वर्णन केले आहे. आज स्त्री काय करीत नाही असे नाहीच. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांना स्त्रीशक्तीने स्पर्श केलेला आहे. नुसतं स्पर्श न करता स्त्रीशक्तीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. चूल, मूल, कला, क्रीडा, शास्त्र, संरक्षण, अग्निशमन, नौकानयन, अग्निरथ/विद्युतरथ, प्रशासन, शिक्षण, राजकारण, धर्मकारण, सेवा, उद्योग, अशा विविध क्षेत्रात महिला अव्वल स्थानावर आहेत. याबद्दल या सर्व स्त्रिया आदरास पात्र आहेत.

लेखाचा समारोप करताना काही गोष्टी जाणीवपूर्वक नमूद कराव्याश्या वाटतात. आज आपण स्पर्धेच्या युगात आहोत. सामाजिक बंधने आज सैल होताना दिसत आहेत. समाज झपाट्याने बदलत आहे. स्त्रीला अनेक उपमा दिल्या जातात. *त्यामध्ये स्त्रीला प्रामुख्याने शक्ती म्हटले जाते आणि ते खरे देखील आहे. पण विज्ञान असे सांगते की शक्ति जर नियंत्रित नसेल तर अधिक घातक आहे. स्त्री शक्तीची अनेक उदाहरणे आपल्याला माहीत आहेत म्हणून ती मुद्दाम इथे देत नाही. शक्ति जर ‘स्वनियंत्रित’ असेल तर अधिक चांगले!! त्यासाठी संपूर्ण समाजाने यमनियम पाळले पाहिजेत असे सुचवावेसे वाटते.

श्रीसद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे एक वचन आहे. “आजपर्यंत धर्म टिकला तो घरातील स्त्रियांमुळेच!!!”* सर्व संतांनी स्त्रियांचे नेहमीच कौतुक केले आहे, त्यांचा आदर केला आहे. सर्व संतांनी कायम पुरुष जातीला उपदेश केला आहे पण स्त्रियांना उपदेश केल्याचे उदाहरण नाही. पुरुष मूलतः स्खलनशील आहे पण स्त्री संयमी आहे, मर्यादा पाळणारी आहे, असा त्यांना विश्वास आहे. आज स्त्रीमुक्तीबद्दल अनेक आंदोलने करणाऱ्या महिला दूरदर्शन वरील ‘अर्धनग्न’ जाहिराती बघून मूग गिळून गप्प बसतात, तेव्हा मनास खंत वाटते. उदाहरण द्यायचे झाल्यास एखादा सुगंधित फवारा मारला म्हणून परपुरुषाच्या मागे पळणाऱ्या अनेक स्त्रिया जाहिरातींमधून दाखवल्या जातात तेव्हा हा समस्त स्त्रीशक्तीचा अपमान आहे. पण यात आपला अवमान होतो असे स्त्रियांना वाटत असते तर अशा जाहिराती बनल्या नसत्या किंवा त्या प्रसारित झाल्या नसत्या. त्यांच्याविरुद्ध कोणी न्यायालयात गेल्याचे ऐकिवात आलेले नाही. #स्त्रीमुक्ती म्हणजे फक्त पेहरावबदल’ इतकाच अर्थ अभिप्रेत आहे का? पुरुषाने प्रत्येक स्त्रीचा तिच्या वयानुसार सन्मान करावा अशी आपली संस्कृती सांगते. मग ती कधी आई असेल, कधी बहीण असेल तर कधी मुलगी तर कधी आज्जी आणि स्त्रीनेही याच नात्याने प्रत्येक पुरुषाकडे पाहावे असा दंडक होता. पूर्वी स्त्रिया स्वतःची ओळख मी अमक्याची आई (उदा. राजूची आई) अशी करून देत असत. समाजात मातृत्वाला मूल्य होते, प्रतिष्ठा होती, आज पुन्हा याचीच गरज आहे असे जाणवते. आपल्या देशाला ‘माता’ मानणारा भारत हा एकमेव देश आहे. ‘स्त्रीशक्तीचा इतका मोठा गौरव खचितच कोणी केला असेल.. !’

आज समाजात काय चालू आहे, हे आपण सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. पण ही स्थिती आपल्यालाच बदलावी लागेल. हे काम फक्त स्त्रियांनी करुन जमणार नाही तर ते प्रत्येक समाजघटकाचे दायित्व आहे. आजच्या महिला दिनाच्या शुभमुहूर्तावर प्रत्येक माता भगिनीस घरात आणि समाजात योग्य तो सन्मान मिळेल असा प्रयत्न आपण सर्वांनी करु.

स्त्रीशक्तीचा जयजयकार!

मातृशक्तीचा जयजयकार!!

भारतभूचा जयजयकार!!!

भारत माता की जय।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments