श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ ‘स्मृती’ आठवणींचं ब्रम्हांड..!☆ श्री अरविंद लिमये ☆

‘स्मृति’ हा संस्कृत शब्द.एक धर्मग्रंथ.

‘श्रृति, स्मृति, पुराणोक्तफलप्राप्त्यर्थं…’

या फलश्रृतित उल्लेख असलेला तो हाच धर्मग्रंथ..!

स्मृती शब्द मराठीत वापरला जातो तेव्हा ‘ति’ दीर्घ होते , तसा त्याचा अर्थही मर्यादित रुपात रुढ होत असावा. स्मृती हा शब्द आपण आठवण या अर्थाने सर्रास वापरतो.पण मला आपल़ं उगीचच वाटतं(उगीचच एवढ्याचसाठी कि त्याच्या पृष्ठ्यर्थ संदर्भ मला मिळालेला नाहीय)की आठवणी स्मृतींमधे साठवल्या जातात असं आपण म्हणतो, तर स्मृती म्हणजे आठवणी नव्हे तर त्या साठवल्या जातात ती जागा. माणूस दिवंगत झाल्यानंतरही तो स्वत:च्या कर्मांसोबत तो साठा बरोबर नेत असतो.पूर्वजन्मीच्या आठवणी म्हणतात त्या याच.

नवीन जन्मानंतर आपल्या पूर्वजन्मातील आठवणी पुसल्या जातात. त्या पुसल्या गेल्या नसत्या तर आपण त्या आठवणींसकट नवं आयुष्य नीट जगूच शकलो नसतो. म्हणूनच निसर्गयोजनेनुसार पुनर्जन्मापूर्वी जाणिवांवरील आठवणींचे ठसे पुसले जातात. मात्र कांही ठसे इतके खोलवर कोरले गेलेले असतात किं ते पुसले न गेल्याची शक्यता असते. नवजात अर्भक नजर स्थिर होईपर्यंत स्वत:शीच अस्फुटसं हसत असतं किंवा मधेच अचानक रडतही असतं ते पूर्वजन्मातल्या आठवणींभोवती त्याचं मन घोटाळत असल्यामुळेचअसं म्हणतात, त्यात म्हणूनच तथ्य असावे असे वाटते. नजर स्थिर झाल्यानंतर मात्र ते नव्या जन्मात खर्या अर्थाने स्थिर होते. त्या आठवणींपासून विलग होऊनसुध्दा या जन्मातही  काहीजणाना ‌वयाच्या ३-४ वर्षांपर्यंत त्यांचे गेल्या जन्मातले आईवडिल, जवळचे नातेवाईक सर्व संदर्भांसह आठवत असल्याच्या घटनाही कपोलकल्पित  नसल्याचे प्रत्ययास आलेले आहे. अर्थात ४-५वर्षांनंतर मात्र त्या आठवणी पुसट होत नाहीशा होतात.

कांहीवेळा एखाद्या माणसाला प्रथमच भेटत असूनही तो पूर्वी कधीतरी भेटला असल्याची  भावना मनात येते न् मन अस्वस्थ होते. कधी एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यानंतर, आपण इथे आधी कधीतरी येऊन गेल्याची भावना आपल्या मनात निर्माण झाल्याचा अनुभवही अनेकाना आला असेल.

या सर्वांवर सखोल संशोधन सुरु असले तरी मला स्वत:ला मात्र त्याचा थांग लागूच नये असे वाटते. नाहीतर आपल्या जगण्यातली सगळी मजाच निघून जाईल. पाटीवरची अक्षरे पुसली तरी त्या अक्षरांचा अर्थ मात्र मन:पटलावरुन पुसला जात नाही. तशाच या पूर्णत:पुसल्या न गेलेल्या पूर्वजन्मातल्या आठवणी..!!

आठवणी रम्य असतात तशा क्लेशकारकही.गोडअसतात तशा कडवटही.फुललेल्या असतात तशा रुतलेल्याही. त्या कशाही असल्या तरी त्यांचा गुंता होऊ न द्यायची काळजी आपण घ्यायला हवी. तरच हव्याहव्याशा आठवणी सोबत करतील आणि नकोशा आठवणींवर नियंत्रणही ठेवतील.

कटू आठवणी विसरता आल्या नाहीत तरी कधीच विसरु नयेत अशा आठवणी निर्माण करणं मात्र आपल्याच हातात असतं. कारण वर्तमानातलं आपलं वागणं, बोलणं, नव्हे जगण्यतला प्रत्येक क्षणच पुढे आठवणींमधे रुपांतरीत होणार असतो. त्या चांगल्या कि वाईट हे असं आपल्यावरच तर अवलंबून असतं. त्या आठवणी चांगल्या हव्या असतील तर आपलं जगणंही चांगलं असायला हवं हे ओघाने आलंच. चांगलं म्हणजे कसं, तर आठवत रहावं असं…!!

आपल्या स्मृतीत साठवल्या जाणार्या आठवणी या पुढील जन्मासाठीचं आपलं ‘संचित’असणार आहे एवढं भान जरी जगताना ठेवलं, तरी उद्या काय होईल याचं दडपण निर्माण होण्यापूर्वीच विरुन गेलेलं असेल.

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

खुप सुंदर लेख! आठवणी दाटतात धुके जसे पसरावे……हे गाणं आठवलं.
पुनर्जन्मावर माझा विश्वास आहे.
लेख आवडला आणि पटलाही!