सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवन परिचय
शिक्षण : M. Com. CAIIB
व्यवसाय : स्टेट बॅंक ऑफ इंडिया मधून अधिकारी म्हणून निवृत्त
छंद : वाचन, संगीत ऐकणे, ललित लेखन व कविता करणे. “अंतर्नाद” हा कविता संग्रह प्रकाशित. आत्तापर्यंत १० इंग्लिश व एका हिंदी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे (मेहता पब्लिशिंग हाउस आणि अजब प्रकाशन).
☆ विविधा: सकारात्मकता – एक अभेद्य तटबंदी – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
परवा सहजच मनात असा एक विचार आला की, आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि सामाजिक जीवनातही बऱ्याच गोष्टी, बरेच विचार, एखादी मोठी लाट यावी तसे येतात, काही काळ त्यात आपण भिजतो, आणि मग ती लाट नकळतच आपोआप ओसरून जाते. एखाद्या फॅशनची लाट आलीये म्हणतात ना तसेच. वैचारिक लाटा तर अनेक प्रकारच्या असतात. जागतिक किंवा राष्ट्रीय परिस्थितीनुसार सतत वेगाने उफाळणाऱ्या, पण तितक्याच वेगाने अनिश्चिततेच्या किनाऱ्यावर आपटून विरून जाणाऱ्या लाटांची तर गणती करणेच अशक्य आहे. माणसाच्या वैयक्तिक जीवनातही, प्रत्येकाच्या भौतिक परिस्थितीनुसार, स्वभावानुसार, त्याच्या मानसिक आरोग्य कसे आहे त्यानुसार, शब्दशः असंख्य विचारांची मनात अशी सतत भरती- ओहोटी चालू असते, ज्याचा अनुभव प्रत्येकच माणूस क्वचित जाणतेपणाने आणि बहुतांशी अजाणतेपणी घेतच असतो. आणि बरेचदा या अशा लाटांचा माणसाला आनंद होण्याऐवजी त्रासच जास्त होत असतो हे सांगण्यासाठी स्वतःचे उदाहरण पुरेसे असते.
एकदा कुठेतरी मी असे एक वाक्य वाचले होते की, मनातले विचार नकारात्मक असोत की सकारात्मक, पण या दोन्ही प्रकारच्या विचारांचा माणसाच्या संपूर्ण आयुष्यावर प्रचंड प्रभाव, किंवा दबाव म्हणुयात, पडत असतो. आणि अर्थातच सकारात्मक विचारांचा प्रभावही सकारात्मक च असतो, ज्यातून सुख – शांती- समाधान यांचा अनुभव आयुष्यभर कळत नकळत पण आवर्जून येत रहातो. मनात असे ठरवून, विचार करून, विचार आणता येत असतात का? असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. आणि मला तरी या प्रश्नाचे उत्तर ‘ हो ‘ असेच द्यावेसे वाटते. सकारात्मक विचार किती मोलाचे आणि महत्वाचे असतात हे खूप पूर्वीपासून अनेक विचारवंत, तत्वज्ञ, आणि जाणकार लोक सांगत आलेलेच आहेत. पण असे विचार आणि त्यांचे महत्त्व अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत, त्याच्या जाणिवेच्या पातळीपर्यंत, झिरपत जाऊन तिथे कायमचे मुरलेले राहण्याची आत्यंतिक आणि कालातीत गरज आहे असे मला निःसंशयपणे म्हणावेसे वाटते.
पण मग मनात बहुसंख्येने येणारे नकारात्मक विचार, सकारात्मक कसे होऊ शकतील, हा प्रश्नही तितक्याच स्वाभाविकपणे पडणारा आहे. त्यासाठीच इथे आणखी काही सांगावेसे वाटते आहे. आपण कसा विचार करतो, यावर आपले संपूर्ण आयुष्य कसे असेल हे अवलंबून आहे, ही गोष्ट सर्वप्रथम, प्राधान्याने समजून घ्यायला हवी, आणि मान्य करायला हवी. हेही मान्य करायला हवे की नकारात्मक विचारांच्या सतत सांनिध्यात राहिले तर आपोआपच उदास पणा, भय, दुःख, या भावनांना खत पाणी मिळत राहते आणि नकळतच नैराश्याच्या वाटेवर पावले पडायला लागतात. खरे तर स्वतः कडे, स्वतःच्या विचार प्रक्रियेकडे त्रयस्थपणे आणि सजगपणे पाहिले तर ही गोष्ट सहजपणे लक्षात येण्यासारखी आहे. पण सामान्यतः तसे पाहिले जात नाही, कारण ‘ माझे काही चुकते आहे ‘ हेच मुळात मान्य न करण्याचा मानवी स्वभाव असतो. पण एक अधिक एक म्हणजे दोनच, हे जसे आपण निःशंकपणे आणि सहजपणे मान्य करतो, अगदी तसेच हेही मान्य करायचे की सकारात्मक विचार आपली शक्ती, आपला आत्मविश्वास आणि आपले मनोबल निःसंशय वाढवतात. आणि मग स्वतःच्याच मनाशी जणू युद्ध करून, नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचारांना देता येऊ शकते. आणि केवळ आपला दृष्टिकोन बदलून हे युद्ध जिंकता येते. याचे एक सर्वश्रुत उदाहरण आहे ते शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांचे. विजेच्या दिव्याचा शोध लावण्यासाठी अथक प्रयोग करत असताना हजाराव्या प्रयोगात त्यांना यश मिळाले. आधीच्या फसलेल्या ९९९ प्रयत्नांबद्दल ते म्हणायचे की ‘ ते प्रयोग फसले असे मी मानतच नाही. उलट, कोणत्या कोणत्या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही हे मी ९९९ वेळा सिद्ध करून दाखविले आहे‘. .. याला म्हणतात सकारात्मक दृष्टिकोन. या बाबतीत पाण्याने अर्ध्या भरलेल्या ग्लासचे जे उदाहरण दिले जाते, ते तर समजायला आणि पचनी पडायला अगदीच सोप्पे आहे. ग्लास पाण्याने अर्धा का होईना पण भरलेला आहे यात समाधान मानायचे की अर्धा रिकामा आहे याचे दुःख करत हताश निराश व्हायचे हे ठरविणे खरे तर कुणासाठीही अजिबातच अवघड नाही. पण त्यासाठी क्षणभर विचार मात्र करावा लागतो. आणि असा विचार करण्याची मनाला सवयच लावून घेण्याचा निश्चय एकदा का मनापासून केला की मग सगळ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात. मन आपोआप प्रसन्न रहाते, मनाची आणि शरीराची ही ऊर्जा वाढते, कामाचा उत्साह आणि गतीही वाढते. आणि अर्थातच आत्मविश्वास ही वाढतो.
एखादी वाईट घटना घडली, तर त्याहीपेक्षा वाईट काहीतरी घडू शकले असते, पण तसे घडलेले नाही, यात समाधान मानता आले तर घडलेली वाईट घटना सुसह्य वाटू लागते, आणि हा फक्त सकारात्मक विचारसरणीचा परिणाम असतो. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हटले जाते, आणि दृष्टिकोन सकारात्मक असेल तर ते सिद्धही करता येते याची अनेक उदाहरणे डोळसपणे पाहिले तर आपल्याच अवती भोवती दिसतात.
म्हणूनच जगातल्या प्रत्येक माणसाने अन्न वस्त्र निवारा याप्रमाणेच ही आणखी एक गोष्टही अत्यंत मूलभत गरजेची मानली पाहिजे की, अनिर्बंध नकारात्मक विचार आणि त्यामुळे निर्माण होणारा नकारात्मक दृष्टिकोन यांना, अत्यंत जागरूकपणे आणि निश्चयपूर्वक स्वतःच्या मनात अजिबातच थारा द्यायचा नाही. स्वतःचे विचार आणि दृष्टिकोन ही सतत सकारात्मकच राहील याची जाणीवपूर्वक दक्षता घ्यायची. मग नक्कीच लक्षात येईल की सकारात्मक विचार ही , कितीही जोराने उफाळून आल्यावरही शेवटी वास्तवाच्या किनाऱ्यावर फुटून, क्षणात विखरून जाणारी विचारांची लाट नसतेच. तर ती असते एक अभेद्य तटबंदी ……. सतत प्रचंड उसळणाऱ्या, भयभीत करणाऱ्या, केव्हाही अक्राळ विक्राळ रूप धारण करून मनाला अक्षरशः हतबल करून टाकणाऱ्या सगळ्याच लहान मोठ्या नकारात्मक विचारांच्या क्रूर लाटांना, आपल्या पायाशी स्वतःचे अस्तित्वच विसरून पराभव पत्करायला भाग पाडणारी, निग्रहपूर्वक मनाला घातलेली अभेद्य तटबंदी.
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
पत्ता : ४, श्रीयश सोसायटी, ५७१/५७२, केंजळे नगर, पुणे ४११०३७.
मोबाईल: ९८२२८४६७६२.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈