सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ विविधा ☆ स्त्री: कालची आणि आजची ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
‘कशी आहे ती?’ नारीशक्ती वरील एक लेख सहज वाचनात आला! खरंच, कशी आहे स्त्री?
‘ स्त्री ही घराची शोभा, स्त्री ही संसाराचे एक चाक, कुटुंबाशी निगडीत असलेली व्यक्ती!’ काही कर्तृत्ववान स्त्रियांचा अपवाद वगळता बहुतेक सर्व स्त्रिया प्राचीन काळापासूनच या पुरुष प्रधान संस्कृती च्या वर्चस्वाखाली राहिल्या होत्या. नंतरच्या काळात ‘चूल आणि मूल’ याच चक्रात स्त्री अडकून पडली. स्त्री शिक्षणाचा अभाव होता.
कुटुंब सांभाळणारी, आल्यागेल्याचे सर्वात करणारी, वेळप्रसंगी एकहाती संसार सांभाळणारी गृहिणी हेच चित्र डोळ्यासमोर उभे केले गेले. संसार रूपी रथाची दोन चाके म्हणून स्त्री आणि पुरुष यांचा उल्लेख होत असला तरी काही वेळा स्त्री ही दोन्ही चाकांचा बोजा स्वत:वर पेलून संसाराचा गाडा ओढत असते. अशी ही गृहिणी, सहधर्मचारिणी असते.
पूर्वी स्त्रियाना शिक्षण कमी होते, पण व्यवहारज्ञान खूप असे. पैसा कमी होता पण असणार्या प्रत्येक गोष्टीचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल याकडे लक्ष असे. त्यामुळे काटकसरीने संसार करून तो यशस्वी करून दाखवत असे. ‘शामच्या आई’ मधील आई ही अशीच गरीबीत राहून स्वाभिमानाने संसार करणारी स्त्री होती! त्याकाळी विधवा स्त्रियांना शिक्षण नसेल तर मुलांची, कुटुंबाची जबाबदारी पेलताना खूपच कष्ट घ्यावे लागले अशी उदाहरणे आहेत. माझीच आजी एका मोठ्या, घरंदाज घरातील होती. पती निधनानंतर घर कसे चालवावे हा प्रश्न होता. शिक्षण नव्हते, पण व्यवहारी होती. हातात पैसा नव्हता, मुलांची शिक्षणे व्हायची होती.अशावेळी न डगमगता तिने स्वत:च्या कर्तुत्वाने संसार केला. स्व:यांचे घर होते,हा मोठा आधार होता.
तिने गरजेपुरत्या दोन खोल्या स्वत: कडे ठेवून बाकी सर्व खोल्या विद्यार्थ्यांना रेंटवर दिल्या. येणार्या भाड्यात घरखर्च भागवू शकली.रोजचे व्यवहार पार पडू लागले. मुलांच्या शिक्षणासाठी व इतर खर्चासाठी दागिने विकून पैसे उभे केले, पण नंतर तेवढेच नाही तर त्याहून अधिक सोने खरेदी केले.ती खूप करारी होती.
अशाप्रकारे स्वत:च्या कर्तुत्वाने संसार सांभाळणार्या १९ व्या शतकातील अनेक स्त्रियांच्या गोष्टी आपण ऐकल्या!
काळाच्या ओघात स्त्री शिक्षण वाढले.स्त्रीच्या कर्तुत्वाच्या कक्षा रुंदावल्या, स्त्री पुरुषाशी बरोबरी करता करता त्याच्यापुढे केव्हा निसटून गेली हे कळलेच नाही!
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे आहे! अवकाश क्षेत्र, संशोधन, संरक्षण या सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेत, उच्च पदस्थ आहेत तरीही संसार सांभाळणार्या आहेत. रोजच्या जीवनातही बरेचसे व्यवहार स्त्रिया सांभाळतात. पूर्वी मुलांवर असलेली माया, प्रेम स्त्रीच्या स्वयंपाकातील कुशलतेवर अधिक दिसून येत असे. मुलांना स्वत: चांगले चुंगले करून खाऊ घालणारी, प्रेमाने घास देणारी, कोंड्याचा मांडा करणारी स्त्री ही आदर्श होती.
नंतरच्या काळात नोकरी करून स्वत:ची ओढाताण करून मुलांसाठी सुटीच्या दिवशी नवीन पदार्थ खाऊ घालणारी स्त्री हळूहळू कालबाह्य झाली. कामावरून घरी येतानाच ऑर्डर करून आणलेला पिझ्झा, वडा पाव, दाबेली, केक यासारखे पदार्थ घरी येऊ लागले किंवा घरी स्वयंपाकाला बाई ठेवून ती गरज भागवू लागली! याचा अर्थ तिचे मुलांवरील, कुटुंबावरील प्रेम कमी झाले असे नाही, पण वेळेअभावी या तडजोडी तिला कराव्या लागल्या. ऑफिसकाम करून पुन्हा घरचे सर्व करणे ही तिच्या साठी तारेवरची कसरत होती!
जरा घरात काही सपोर्ट सिस्टीम होती तिथे थोडा फायदा मिळत होता. स्त्रीच्या कष्टाला शेवटी मर्यादा आहेतच ना!
आताची स्त्री समाजाभिमुख झाली. तिचे कार्यक्षेत्र बदलले. त्यानुरूप पोशाख बदलला. स्त्री सौंदर्याच्या कल्पना बदलल्या.
लांबसडक केसांची निगा राखण्यास वेळ मिळेना, त्यामुळे शॉर्टकट् शोधले गेले. आताच्या काळात खर्या दागिन्यांनी मढण्यापेक्षा आर्टिफिशियल, आकर्षक मॅचिंगचे दागिने बाजारात उपलब्ध झाले. खर्या दागिन्यांना चोरीचा धोकाही होताच! कामाला जाण्यायेण्यासाठी लागणारा वेळ, कामाच्या बदलत्या वेळा असे असेल तर नटून थटून जाणे आवडतही नाही आणि ते गैरसोयीचे ही वाटते! त्यामुळे गेल्या १५/२० वर्षात स्त्रीची एक वेगळीच प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहिली आहे. पारंपारीक गोष्टींचा काही प्रमाणात त्याग करावा लागला असला तरी स्त्रीची उत्सव प्रियता आणि नटण्याची हौस काही कमी झालेली नाही! ती स्वत:ला सजवून आकर्षक ठेवते. तिची जगण्याची उर्मी तिला प्रेरणा देते. आपण मुंबई च्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या स्त्रियांविषयी ऐकतोच की, त्या लोकलमध्ये च केळवणं, डोहाळजेवणं, वाढदिवस, सण-उत्सव साजरे करतात! स्त्री मुळातच प्रेमळ, उत्साही, संसाराची आवड असणारी असते. तिचे सारे जगणेच उत्सव असते. लहानपणी चूल बोळकी मांडून खेळणारी मुलगी आता कमी दिसत असली तरी तिला सर्वच क्षेत्रांची आवड आहे. ती आता पायपुसण्यासारखी नसून खरंच घराचा उत्कर्ष करणारी आहे याची जाणीव तिला आहे.
आताच्या छोट्या मुलींच्या खेळण्यात बदल झालाय, पूर्वी चूल, बंड, पिंप, पातेली हे खेळणारी मुलगी आता गॅस, मायक्रोवेव्ह, फ्रीज, यासारख्या वस्तू खेळते!
स्त्रीने शैक्षणिक, सामाजिक सर्वच क्षेत्रांत स्वत:चा ठसा उमटवला आहे. अजूनही खेड्यापाड्यातील स्त्रीला हे सर्वांत प्रथम पूर्णतः मिळालेले नाही, तरीही शिक्षणाची धडपड
आणि इतरही क्षेत्रात तिचा कार्यभाग वाढला आहे हे निश्चित! नजिकच्या काळात असे मांगल्य, उत्कर्ष स्त्रीच्या वाट्याला येणार हे नक्की च!
तिला समानतेच्या सर्व संधी उत्तरोत्तर मिळोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈