☆ विविधा ☆ सेल्फी ☆ श्री चंद्रकांत बर्वे ☆
बार्गेनिंग
आजकाल जिला शॉपिंगची आवड नाही अशी बाई लाखात एक असेल. मला काही लाख बायकांचा अनुभव नाही पण आपलं लिहायचं म्हणून लिहिलं. असो! हां तशी माझी बायको जरी लाखात एक असली तरी शॉपिंगची आवड नसलेली ‘ती’ नव्हे. हां तर आम्ही कुठेही म्हणजे बाहेरगावी, मॉलमध्ये किंवा परदेशी गेलो तर ती शॉपिंग हे करतेच करते. हरकत नाही, पण पुढे जे सुनावते ते साधारणपणे असं असतं. उदाहरणार्थ: ही पर्स बघितली? मी कौतुकाने बघतो. “किती रुपयाला घेतली असेन?” हा प्रश्न कठीण असतो कारण मला एक किमतीचा अंदाज सांगायचा असतो. मी सांगितलेला अंदाज जर जास्त असेल तर हरकत नाही पण मी जर कमी सांगितली तर “तुला यातलं काही कळत नाही” असं ऐकावं लागतं. मी अशा वेळी उत्तर न देता ती वस्तू जास्त वेळ न्याहाळत बसतो आणि चेहऱ्यावर आवडल्याचे भाव मात्र आणतोच आणतो. मग तीच सांगते फक्त आठशे रुपये. मला तो खर्च जरी जास्त वाटला तरी मी तो माझ्या बोलण्यातून कळू देत नाही. आता ८०० रु देऊन पर्स घेतली एवढ सांगितलं असतं तरी चाललं असतं, पण नाही. फक्त या शब्दावर जोर देऊन ती सांगते. ती पुढे असं सांगते कि तो दुकानदार आधी बाराशे रुपये सांगत होता वगैरे. त्या दुकानदाराच काय जातय, तो आपल्या मालाची किंमत ‘वाट्टेल ती सांगेल’ असा माझ्या मनात आलेला विचार मी मनातच ठेवतो. थोडक्यात म्हणजे “मी बार्गेन करून स्वस्तात मिळवली” असा तिचा दावा असतो आणि मग ती लगेच आता गेल्या महिन्यात हॉटेल वेस्टइन मध्ये आपण गेलो होतो तेव्हा अगदी अशी पर्स मी तिथे शोकेस मध्ये अडीच हजार रुपयांना पहिली होती अशी अतिरिक्त माहिती पुरवते. सरतेशेवटी निष्कर्ष म्हणजे ती बार्गेन करण्यात हुशार आहे आणि बार्गेन म्हटलं की मी एकदम माझ्या फ्लॅशबॅक मध्ये जातो.
वेल, १९७९ साली मी महिनाभर दिल्लीला आकाशवाणीच्या ट्रेनिंग साठी गेलो होतो. आम्हा महाराष्ट्रातील प्रोड्युसर मंडळींचा प्रसिद्ध न्यूज रीडर नंदकुमार कारखानीस दिल्लीतील फ्रेंड, फिलोसॉफर आणि गाईड असायचा. मी करोलबागेत राहत होतो तिथले अजमल खान रोडवरचे मार्केट प्रसिद्ध. तिथे वाट्टेल ते मिळतं आणि स्वस्त मिळतं म्हणे. हां पण बार्गेन करावे लागतं. नंदकुमारने मला स्पष्ट सल्ला दिला “तो रस्त्यावरचा फेरीवाला जी किंमत सांगेल त्याच्या अर्ध्या पेक्षा कमी किमतीला ती वस्तू घ्यायची, अर्ध्या किमतीला सुद्धा नाही”. मी त्याचा सल्ला लक्षात ठेवून दुसऱ्या दिवशी मार्केट पहात फिरत होतो. एके ठिकाणी काही टीशर्ट्स छान दिसले. मला आवडले. मी पाहू लागलो. तो फेरीवाला म्हणाला ६५ रु.चा आहे पण तुम्हाला म्हणून मी ६० रुपयात देतो. मला ती किंमत जरा जास्त वाटली. मी काहीच बोललो नाही. तो एकदम गाडी चौथ्या गिअर वरून एकदम दुसऱ्या गिअर मध्ये टाकावी अशा थाटात म्हणाला चला ५० रुपयात घेऊन टाका. मी म्हटलं छे छे फार जास्त किंमत सांगताय. त्यावर तो म्हणाला टीशर्ट निट बघा तर खरं. माझ्या हातात त्याने टीशर्ट कोंबला. टीशर्ट होता छान, पण मी न घेता निघण्याचा अभिनय करू लागलो. मग त्याने सरळ मला विचारले किती रुपयाला घेणार? त्याने बॉल माझ्या कोर्टात टाकला. मला गाडी पहिल्या गिअर मध्ये टाकणं आलं. मला नंद्कुमारचा सल्ला आठवला. “फेरीवाला जी किंमत सांगेल त्याच्या अर्ध्या पेक्षा कमी किमतीला ती वस्तू घ्यायची, अर्ध्या किमतीला सुद्धा नाही” मग मी मन घट्ट करून ६५ च्या निम्मे साडेबत्तीस हे लक्षात घेऊन सरळ ३० रुपये किंमत सांगितली. मग तो म्हणाला हे तुम्ही फारच कमी सांगताय, आम्हालासुद्धा या किंमतीत हे मिळत नाही वगैरे. मग मी ३५ रुपयाला तयार झालो. तोही उपकार केल्यासारखा तयार झाला. मी ते टीशर्ट्स पाहू लागलो, त्यातले दोन टीशर्टस मला आवडले. कुठला घेऊ या विचारात पडलो. तो दोन्ही घ्या म्हणाला पण ‘मला एकच हवाय’ असे म्हणून मी त्यातला एक घेतला. पैसे दिले. मी मनातून आपल्याला बार्गेनिंग येतं अस सर्टिफिकेट घेऊन निघालो. मग तो म्हणाला की हा दुसरा टीशर्ट देखील तुमच्या गोऱ्या रंगावर छान उठून दिसेल. मी त्याच्याकडून माल घेतल्याने त्याला माझा गोरा रंग दिसला बरका! (आणखी खरेदी केली असती तर माझे काळे केस, नंतर सरळ नाक देखील दिसले असते) मी देखील नुसते स्मित केलं आणि जाऊ लागलो तर तो म्हणाला हा दुसरा टीशर्ट मी तुम्हाला ३० रुपयाला देतो. माझा बार्गेनिंगचा आनंद जरा कमी झाला, पण मी नको म्हणून निघालो, त्याने मग मला ठीक है तो फिर मै आपके लिये २५ रुपयेमे देनेको तैयार हुं. माझा बार्गेनिंगचा आनंद पार मावळला. मग मात्र मी तडक काढता पाय घेतला पण जाताजाता मला त्याचा आवाज ऐकू आला “तो फिर आप कितनेमे लेना चाहते हो?” मनातल्या मनात स्वतःला दिलेल्या बार्गेनिंगचं सर्टिफिकेट मी टराटरा फाडून टाकलं.
© श्री चंद्रकांत बर्वे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈