सौ ज्योती विलास जोशी
☆ विविधा ☆ स्वप्नातलं सत्य…. ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆
आजवर मला कधीच एखादं अद्भुत, चमत्कारिक, उत्कंठावर्धक, अगदी आठवणीत राहावं असं, दुसऱ्याचं मनोरंजन होईल असं किंवा ज्या स्वप्नापासून काही बोध घेता येईल असं स्वप्न पडलं नाही.
माणसाचा स्थायीभाव असलेले हे स्वप्न मला सहसा पडतच नाही. वर्गात मैत्रिणी जेव्हा रंगवून त्यांना पडलेली स्वप्न सांगत आणि त्यात रंगून जात, तेेंव्हा माझ्या चेहऱ्याचा रंग फिका पडे. किती बेमालूम थापा मारतात या? मलाही थापा मारायचा मोह होई.
मी आईला नेहमी विचारी, “आई मला स्वप्न का पडत नाहीत ?” “उत्तर नसलेले प्रश्न विचारायची भारी वाईट सवय आहे या मुलीला, जा.. दिवास्वप्न तरी बघ!” आईचं उत्तर असायचं. पुन्हा माझा नवीन प्रश्न तयार ‘दिवास्वप्न?.’.. ते काय असतं? ते तरी कधीच पाहिलं नाही.
देवा शप्पथ खरं सांगते खोटं सांगणार नाही. कधी नव्हे ते काल मला खरंच स्वप्न पडलं आणि ते सांगावसं वाटलं…….
त्याचं काय झालं…….
अंधार भुडुक झाला होता. डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नव्हतं. प्रकाशाचा एक कवडसा नव्हे एक बिंदू ही शोधून सापडंत नव्हता. क्षणभर आपण दृष्टिहीन झालो आहोत का? अशी शंका यावी इतका काळोख…. अंगावर शहारा आला. भीतीने गाळण उडाली होती.
मला दरदरून घाम फुटला, तो दार ठोठावण्याच्या आवाजानं…. खरंच कोणी ठोठावत होतं का दार? की भास होता नुसता? बसल्या जागेवरून उठून दार उघडण्याची हिम्मत माझ्यात नव्हती. म्हणून तिथूनच “कोण आहे रे तिकडं?” असं मी विचारलं. अर्थात अपेक्षित उत्तर आलंच नाही.
बऱ्याच वेळा माझं मन मला योग्य ते सल्ले देतं कारण त्याच्याशिवाय मला आहेच तरी कोण म्हणा?….
“अजिबात दार उघडू नकोस. बाहेर करोना उभा आहे.” ते म्हणालं. दरदरून घाम आलेलं माझं शरीर गारठलं.” कोण आहे म्हणून काय विचारतेस? ‘गो करोना’ ‘गो करोना’ असं म्हण…. माझ्या तोंडातून शब्द फुटेनात……
मला आठवले ते फक्त आठवले. रामदास रचित ‘भीमरूपी महारुद्रा’ ‘मारुतीराया बलभीमा’ सगळं सगळं म्हणून झालं पण मारुतीरायाला काही सवड झाली नाही यायला. एव्हाना दार खिळंखिळं झालं होतं. क्षणार्धात ते उघडलं…..
समोर एक प्रसन्न मुद्रेची, सालंकृत, लक्ष्मीस्वरूप दुर्गावतारातील नारी वाघावर स्वार होऊन माझ्यासमोर उभी ठाकली. ‘देवी पावली’ असं म्हणून मी नतमस्तक झाले.
“अगं, माझ्या काय नमस्कार करतेस तू? मी तर ‘करोना मर्दिनी” करोना शब्दानं माझी गाळण उडाली. नाकाभोवती चादर घट्ट गुंडाळून मी मुटकुळं करून खाली मटकन् बसले. वाघ माझ्याकडं डोळे विस्फारून बघत होता. वाघ पार्किंग लाॅट मध्ये उभा असल्यागत उभा होता.
‘करोना मर्दिनी’ या नावातच संहार जाणवला मला. मन म्हणालं, “अगं हिच्यामुळेच सौख्य शांती निर्माण होणार आहे. चटकन नमस्कार कर” मनावर विश्वास ठेवून मी सकारात्मक पवित्रा घेतला आणि पुनःश्च नमन केलं.
ती हसली. “अगं मी तुझी सेविका!” असं म्हणून तिनं आपल्या दहा हातातल्या दहा गोष्टी खाली ठेवल्या. कोणता जादूचा दिवा मी घासला आणि ही देवी अवतरली? असा मी विचार करत होते.
“लसेंद्र बाहुबली, या इकडे.” तिच्या सांगण्यावरून वाघानं रुबाबात पावलं उचलली. त्याचं नावही त्याला साजेसं रुबाबदार असंच होतं. तो तिच्यापाशी आला. तिच्या इशारा शिवाय तो काहीच करत नव्हता याची मला आता मनोमन खात्री पटली पण शेवटी वाघ म्हणा की वाघोबा…. भीती तर वाटतेच ना हो?
मला भेदरलेलं पाहून ती म्हणाली, “अगं तो काही करत नाही.आपलाच आहे तो..” या तिच्या वाक्यानं मला तमाम कुत्र्यांच्या मालकांची आठवण झाली.
“तुझ्या सुरक्षेसाठी ही भारतीय बनावटीची लस घेऊन आले आहे. ती घेण्याचा पहिला मान तुला मिळतोय.” ती म्हणाली. मी रडवेल्या चेहऱ्याने हसले. वाघ ही स्मितहास्य करत होता असे जाणवले मला…
करोनाशी दोन हात करायची ताकद असलेली ही सिरम इन्स्टिट्यूट ची ही लस! याशिवाय आपल्या देशाची लोकसंख्या जास्त असल्यानं मी इतर देशांतून आयात केलेल्या सर्व लशी सोबत आणल्या आहेत, जेणेकरून तुटवडा होऊ नये.” असे म्हणून तिने आयुधांकडं बोट दाखवलं.
ज्या गोष्टीसाठी गेले वर्षभर मी उतावळी होते ती गोष्ट माझ्यासमोर होती. तीही वाघावर बसून आली होती. नशिबवानच म्हणायची मी!
करोना मर्दिनी म्हणाली, “वाघावर बैस म्हणजे मला लस टोचायला सोयीचे जाईल. माझ्या काळजात धसस् झालं. करोना पेक्षाही वाघावर बसून लस घेणे हे भीतीदायक होतं.
श्रीकृष्णानं देखील संभ्रमावस्थेत असलेल्या अर्जुनाला दुर्गा स्तोत्र म्हणायला लावलं होतं. मीही तेच म्हटलं. क्षणभर इतकं मोठं आसन आपल्याला कोणीतरी देऊ करतय याचा आनंदही झाला. माझ्यासमोर लसेंद्र चक्क झुकला… मी त्याच्यावर आसनस्थ झाले.
दुर्गा झाल्याची चमक माझ्या डोळ्यात होती पण भीतीने माझं सर्वांग थरथरत होतं. दातावर दात कडकडा वाजत होते. घशाला कोरड पडली होती. तशातही मी करोना मर्दिनीला विनंती केली,” ताई लस टोचत असतानाचा माझा एक फोटो घ्याल प्लीज?”
“हो! हो! आम्ही तो घेतोच कारण सगळ्यांची तशी मागणी आहे. त्यातून तुझा चेहरा अगदी ‘लसोजेनिक’ आहे. आमच्या लसेंद्र बाहुबलीला आम्ही सेल्फी घेण्यात ट्रेन केलेलं आहे. दे तुझा मोबाईल त्याच्या पंजात”
रेडी ????चीज….. क्लिक!!!
वाघानं डरकाळी फोडली. लसीकरणाची नुसतीच पोझिशन घेऊन वाघानं सेल्फी काढला.
पुढच्याच क्षणी इन्जेक्शन टोचलं जाणार होतं…….
“अजिबात घाबरू नकोस. लस घेतल्यावर तुझा चेहरा ‘लसलशीत’ होईल. शिवाय लस घेतल्याचं धाडस केल्याबद्दल तुला मी ‘लसवंती जोशी’ या नावानं सर्टिफिकेट हि देईन….” मी तिच्या ‘लसकोषा’ वर फिदा झाले होते.
सर्टिफिकेट मिळणार या आनंदात मी माझ्या दंडावर शड्डू ठोकला आणि सामोरी गेले……
“आई गंऽऽ” अशी किंकाळी मारत मी उठले तर, दंडाचा चावा एका मुंगीनं घेतला होता……
स्वप्न लगेचच सत्यात उतरलं….
‘लसेंद्र बाहुबली’ वर आरुढ झालेली करोना मर्दिनी ‘लस मोहीम’ फत्ते करण्यात ‘लशस्वी’ झाली हे सुज्ञास सांगणे न लगे!!!
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
मो 9822553857
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈