डॉ मेधा फणसळकर
☆ विविधा ☆ सावळी….सावळी ☆ डॉ मेधा फणसळकर ☆
परवाच सुधीर मोघे यांचे ‘गाणारी वाट’ हे पुस्तक वाचनात आले. त्यांच्या चित्रपट- मालिका लेखनातील गीतांचा प्रवास यामध्ये आहे. त्यातील एका गाण्याचा प्रवास वाचताना मी पुन्हा नकळत त्या गाण्यात गुंतून गेले-“सांज ये गोकुळी सावळी सावळी….” !
वास्तविक हे गाणे श्रीधर फडक्यांनी आपल्या एका कार्यक्रमासाठी सुधीर मोघ्यांकडून लिहून घेतले. बाकी बरीचशी गाणी गदिमा नी सुधीर फडक्यांसाठी लिहिली होती, पण ती स्वरबद्ध झाली नव्हती. ती चालीत बांधून त्याचा एक कार्यक्रम श्रीधरजीनी तयार केला होता. त्यातील एक गाणे प्रभातीचे रंग दाखवणारे होये. त्याच्या जोडीला म्हणून हे एक गाणे शामरंगावर तयार झाले. संगीत श्रीधर फडके आणि गायिका आशा भोसले! या त्रयींनी एक अजरामर कलाकृती निर्माण केली.
नंतर अनेक वर्षांनी हे गाणे ‘वजीर ‘ या चित्रपटात घेतले व अश्विनी भावे या गुणी अभिनेत्रीवर चित्रित झाले. चित्रपटाच्या सुरुवातीलाच हे गाणे येते. पुढच्या संकटाची कसलीच चाहूल नसलेली ही युवती या शामरंगात आकंठ बुडालेली दिसते.
सूर्य अस्ताला टेकला आहे आणि अंधार दाटून आला आहे. कवीने अशी कल्पना केली आहे की ही गोकुळातील संध्याकाळ आहे. त्यामुळे त्या सावळ्या कान्ह्याच्या रंगासारखीच ती सावळी आहे, जणू काही त्याचीच सावली वाटावी. दिवसभर रानात चरत असणाऱ्या गाई आता घरच्या आणि वासराच्या ओढीने खुराने धूळ उडवत अंधाऱ्या होत चाललेल्या वाटेवरुन धावत आहेत. त्यांच्याबरोबर पाखरांचे थवे सुद्धा घरट्यात परतत आहेत. आणि त्याचवेळी दूरवर कोण्या एका देवळात सांजवात लावून घंटानाद होत आहे. दूरवर दिसणारी पर्वतरांग सूर्याचा अस्त होताना काळ्या रंगात बुडून जाते आहे. जणू काही या सर्व संध्येला दृष्ट लागू नये म्हणून निसर्गाने रेखलेली ही काजळाची दाट रेघ आहे.
पुढे कवी या सावळ्या- शामवर्णाच्या रंगात इतका बुडून गेला आहे की त्याला डोहातले चांदणे पण सावळेच दिसू लागते, कारण आजूबाजूला त्या नटखट सावळ्याची चाहूल आहे.
पुढच्या ओळी म्हणजे कवीच्या प्रतिभेचा आणि त्या कवितेतील संकल्पनेचा चरम बिंदू आहे असे मला वाटते-
“माऊली सांज अंधार पान्हा”- ही सावळी संध्याकाळ म्हणजे एक माता आहे आणि ती अंधार पान्हवते आहे. त्यामुळे त्या कृष्णवर्णाने हे संपूर्ण विश्वच व्यापून राहिले आहे, जणू काही ते त्या सावळ्या कान्ह्याचे दुसरे रुपच आहे.
असा तो कान्हा वाऱ्याच्या मदतीने अलवार बासरी वाजवत आसमंतात स्वरांची बरसात करत आहे. त्यामुळे जणू काही आम्हा रसिकांच्या समोर स्वररुपी अमृताच्या ओंजळी रित्या होत आहेत.
या गाण्याची आणखी एक गंमत अशी आहे की “पर्वतांची दिसे दूर रांग” हे कडवे यात रेकॉर्डिंगच्या वेळी जोडले गेले.त्यापूर्वी फक्त दोनच कडवी गायली जायची. पण नंतर घातलेले मधले कडवे त्या ठिकाणी इतके चपखल बसले आहे की ते जोडीव काम आहे हे कधी लक्षातसुद्धा येत नाही. हेच ते प्रतिभावंत कवीचे कवित्व असे म्हणावे लागेल. म्हणूनच अवघ्या दहा ते बारा ओळीत ‘सुधीर मोघे’ यांनी एखाद्या कुशल चित्रकाराने आपल्या कुंचल्याने संध्याकाळ कागदावर साकारावी तशी आपल्या शब्दरूपी कुंचल्याच्या अदाकारीतून काळ्या रंगांच्या विविध छटातून ही गोकुळात उतरणारी सावळी संध्याकाळ साकारली आहे. आमच्या मनावर त्या दृश्याचे स्थिरचित्र त्यांनी लीलया साकारले आहे. कविता म्हणून ही रचना जशी अप्रतिम आहे तसेच त्या शब्दांना श्रीधर फडके यांनी दिलेली सूरांची संजीवनी त्यातील कृष्णवर्ण अधिक गहिरा करते. आशा भोसले यांचा अद्वितीय असा स्वर या गाण्याला एक वेगळीच उंची प्राप्त करुन देतो. म्हणूनच या संपूर्ण अविष्कारात सांजावलेले आपल्यासारख्या रसिकांचे मन पुन्हा पुन्हा त्या शामरंगी सावळ्या रंगात रंगून जाते.
© डॉ. मेधा फणसळकर
मो 9423019961
≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈