कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक
श्रीमती उज्ज्वला केळकर
विविधा
☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात – केशवसुतांनी एका कवितेत म्हंटले आहे, ‘तो माज गमले विभूती माझी स्फुरत पसरली विश्वामाजी’ शांताबाईंच्या भावा-भावना, चिंतन-शोधनही असंच सर्वव्यापी होतं. आता इथून पुढे…..)
‘हे सख्या निसर्गा!’
सहजता, पारदर्शकता, आत्मरतता या बरोबरच चित्रमयता हेही शांताबाईंच्या काव्याचं महत्वाचं वैशिष्ट्य. निसर्गाशी त्यांचं निकटचं नातं अनेक काव्यातून, गीतातून लक्षात येतं. निसर्गाच्या विविध विभ्रमांचं, रंगरूपाचं प्रत्यक्षदर्शी वर्णन त्यांनी आपल्या कवितांधून केलय. मात्र बालकवींप्रमाणे निव्वळ, निखळ निसर्ग वर्णन त्या करत नाहीत. त्यांच्या निसर्गवर्णनाला त्यांच्या भावनेचं अस्तर असतं. त्यांच्या निसर्गवर्णनात त्यांच्या प्रीतीचे, आसक्तीचे, विरह –वेदनेचे, भक्ती-विरक्तीचे, एकाकीपणाचे जरतारी रेशीम धागे विणलेले दिसतात. ‘मूक सांत्वन’ मध्ये त्या म्हणतात, ‘हे सख्या निसर्गा! कोण तुझ्यावाचून आमची अनामिक दु:खे घे जाणून’ काळ्या राती अवसेला भयभीत झाली असताना ‘पिंपळ’ तिला धीर देतो. निसर्गातील अनेक घटक त्या ‘पिंपाळा’सारखे शांताबाईंच्या कवितेत दृश्यमान होतात. ‘आला ग वसंत’ किंवा ‘ऋतु हिरवा…. ऋतु बरवा’ या गीतातील निसर्गाचे वर्णन किती सुखद आहे. ‘दरवळत डोलू लागतात’, या कवितेतील निसर्गवर्णन कसं प्रत्यक्षदर्शी आहे पहा,
‘माळरानावरून सरकत येणार्या ढगांच्या सावल्या
क्षितिजाआड फिकट गुलाबी संधीप्रकाश
गवतात मलूल उन्हाची संथ फिरणारी बोटे
ओल्या गार हवेत घननीळ भास-आभास’
आपले एकाकीपण त्यांनी, ‘मावळतीला’, ‘दु:खाचे हिमकण’ अशा किती तरी कवितातून सांगितलय. ‘लोट’मध्ये गवसलेलं श्रेय हरपल्याचं वर्णन, ‘क्षणभर मिटल्या मुठीत, फिरूनी उडून गेला रावा’ या शब्दातून अतिशय हृद्यपणे केले आहे.
‘प्रकाशतार्यांचे संदिग्ध संदर्भ’मध्ये त्या म्हणतात,
‘अशी मी सदाची, भरतीची परतीची
काही आभाळाची, बरीचशी धरतीची
सांजेचा घनदाट प्रत्यय असा’
निसर्ग शांताबाईंच्या भावस्थितीशी असा एकरूप होऊन येतो. त्यांना जीवनातील सौंदर्याची, आनंद मिळवण्याची असोशी आहे. वृत्ती भावुक, स्वप्नाळू आहे. पण स्वप्नसृष्टी आणि सत्यसृष्टी यात अंतर पडत जातं. मग मनावर औदासिन्याचं, नैराश्याचं सावट पसरतं. ‘दु:खाचे हिमकण’, ‘शेवट’, ‘रंग मातीचा आभाळाला’, ‘दिवस गतीने फिकाच पडतो’ आशा किती तरी कविता उदासीनतेची गडद छाया चित्रित करतात. याची परमावधी तमात, काळोखात होते. संध्याकाळ वेढीत जाणारा काळोख आणि या काळोखात अनुभवावं लागणारं एकटेपण, यांचे उल्लेख शांताबाईंच्या कवितेत जागोजागी येतात. ‘प्रदीर्घ’मध्ये त्या लिहितात, ‘घेरीत येतो काळा करडा संदिग्ध काळोख आणि गिळतो पायापुढला उजेड पसाभार’. ‘काळोख’ कवितेत त्या म्हणतात, तो सारे भेद, रंगरूपाचे वेगळेपण मिटवून टाकतो. तो आत्मलीन आणि आपले गाणे गाणारा असतो.
सूर्य, अरण्य, वाळवंट, आभाळ, पाणी, वारा, जमीन, पूर या प्रतिमा शांताबाईंच्या कवितांमधून पुन्हा पुन्हा येतात. त्यातून त्यांच्या मनाच्या आशा-निराशेचे हिंदोळे झुलू लागतात.
‘पाऊस कोसळत रहातो घोंघावत येतो पूर
वाजू लागतात अज्ञात घंटा आयुष्यापलीकडचे संदिग्ध सूर’
कोसणारा पाऊस आणि घोंघावत येणारा पूर याच्या पार्श्वभूमीवर अज्ञात घंटानाद कारूण्याची लय साकारतो. ‘हिरण्यगर्भ’सारखी कविता मात्र यापेक्षा वेगळे सूर आळवते. शिशाच्या पत्र्यासारखे काळे करडे आभाळ गच्च दाटून येत. आणि दिशा भस्म फसल्यासारख्या राखाडी होतात, पण त्यांना खात्री आहे,
‘या सार्यांपालीकडे खचितच असतील
झळाळती हिरण्यगर्भ उन्हे-
जी ढग फाडून येतील आवेगाने बाहेर
आणि अनावर बरसतील या माळावर, या झाडावर
कुणी सांगावे? कदाचित माझ्याहीवर’
‘ढळणार सूर्य कधीतरी ’
चिंतांनाशीलता हे शांताबाईंच्या काव्याचे आणखी एक वैशिष्ट्य. ‘नाती’ कवितेत त्या म्हणतात.
वाटते, तितके नसतो आपणही एकाकी निराधार
अर्थात तेवढ्याने काळोख उजळत नसला तरी’
‘कुठे तरी आपल्यासाठी कुणी तरी असते फुलत जळत’, ही जाणीव आत आत कुठे तरी आश्वस्त करते. जीवन पुढे सरकत रहाते. ‘कळते आता गेला क्षण नाही पुन्हा हाती गवसत’. असं किती आयुष्य सरलं. त्यातून हाती काय लागलं?
‘वर्षांचा ढीग इथे साठला किती? मातीतून त्या मलाच खणत राहिले’
‘ढळणार सूर्य कधीतरी’ याची त्यांना जाणीव आहे पण त्या सूर्यास रोखणार तरी कसे? ‘तम’ तेवढाच खरा, याची खात्री पटली आहे, तोपर्यंतचे जगणे कसे?
‘कैसे जीवन हे इथे जर आम्ही मृत्यूच श्वासितो.’
भूतकाळ सरत, मिटत चाललाय. अदृश्य भविष्याच्या दिशेने होणारी वाटचालही सरत आल्याचे ‘सूर’ इथे कातर, विषण्ण करून जातात. शांताबाईंचे चिंतन, त्यांचा आत्मशोध ‘जीवलगा’सारख्या गीतातून अति उत्कटतेने प्रगट झालाय.
क्रमश: ….
©️ श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈