कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात – शांताबाईंचे चिंतन, त्यांचा आत्मशोध ‘जीवलगा’सारख्या गीतातून कसा उत्कटतेने प्रगट झालाय……  आता इथून पुढे …..)

परतुनि या हो माझ्या जिवा

शांताबाईंची गीते ही त्यांच्याच कवितांचे लोभसवाणे रूप आहे. शब्दातून प्रकट होणार्‍या अनुभूतीला इथे सुरांची साथ मिळते. अनेकदा आधी तयार केलेल्या सुरावटीवर त्यांनी शब्द बांधले आहेत. पण तालासुराच्या चौकटीत त्यांनी शब्द कोंबले आहेत, ते फरफटले आहेत, विकृत झाले आहेत, असं कुठेच झालं नाही. स्वर आणि शब्द तिथे एकरूप होऊन येतात. स्वरनिरपेक्ष ती रचना जरी वाचली, तरी चांगली कविता वाचल्याचा आनंद ती देते. ‘तोच चंद्रमा’ नभात या गीतात, ‘त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा

वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा’ यातून व्यक्त झालेले वास्तव… नित्याचे झाले की ती उत्कटता लोपते, हा नेहमीचा अनुभव किती उंचीवर नेलाय कवयित्रीने. ‘हे श्यामसुंदर’ मध्ये राजासा, मनमोहना, करत त्याची केलेली विनवणी, पावरीचा सूर ऐकताच स्वत:चे हरवलेपण.. खरं तर ते आतून हवेच आहे, पण

‘पानजाळी सळसळे का? भिवविती रे लाख शंका थरथरे बावरे मन, संगती सखी नच कुणी‘

यातून व्यक्त झालेले भय… ही द्विधावस्था या गीतात कशी नेमकेपणाने प्रकट झालीय.

‘गहन जाहल्या सांजसावल्या पाऊस ओली हवा माझ्यासांगे सौधावरती एकच जळतो दिवा. आज अचानक आठवणींचा दाटून आला थवा परतुनि या हो माझ्या जिवा’ या हळुवार लोभासतेने शांताबाईंच्या लावण्या लावण्यामयी झाल्या आहेत.

उत्कृष्ट लावण्प्रमाणेच शांताबाईंनी वेधक द्वंद्वगीते आणि अनुपम भावगीतेही लिहिली आहेत. आपल्याला आवडलेल्या हिंदी, गुजराती, बंगाली गीतांच्या चालीवर आराठीत गीतरचना करण्याचे प्रयोगही त्यांनी केले आहेत. वृत्तबद्ध आणि छंदोबद्धकाव्याचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासून झालेले आहेत. त्यातूनच त्यांची गीतरचना सहज आणि सफाईदार झाली आहे.  ‘कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’ या आपल्या गीतसंकलनाच्या प्रस्तावनेत त्या म्हणतात, ‘कविता आणि गीत‘ या दोहोंमागच्या प्रेरणा भिन्न असतात. तशीच त्यांची कलात्मक मागणीही भिन्न प्रकारची असते. गूढता, सूचकता, अल्पाक्षरत्व आणि संपूर्ण व्यक्तिगत अनुभवामुळे येणारी पृथगात्मता हे कवितेसाठी आवश्यक असते. उलट, सोपेपणा, सहजता, नाट्यमयता, चित्रदर्शित्व, ऐकताक्षणी मनात उलगडत जाईल अशी शब्दकळा ही गीताची गरज असते.’ शांताबाई यशस्वी गीतकार आहेतच, पण त्यापुढे जाऊन, त्यांनी आपल्या गीतांना स्वत:चे असे खास परिमाण दिले आहे. त्या म्हणतात, ‘चांगले गीत ही चांगली कविताही असते.’ शांताबाईंच्या गीतांबद्दल हे खात्रीपूर्वक म्हणता येईल. त्यांच्या मते गीत हे कवितेप्रमाणे स्वतंत्र आणि आपले अंगभूत चैतन्य घेऊन प्रगटते. त्यांच्या ‘ऋतु हिरवा ऋतु बारवा’ कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’, ‘सजणा का धरीला परदेश’, अशी किते तरी गीतं आपल्या कानात रुंजी घालू लागतात.

क्रमश: ….

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments