कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक
श्रीमती उज्ज्वला केळकर
विविधा
☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात – त्यांच्या ‘ऋतु हिरवा ऋतु बारवा’ कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’, ‘सजणा का धरीला परदेश’, अशी किती तरी गीतं आपल्या कानात रुंजी घालू लागतात. आता इथून पुढे…..)
मेघदूत आणि त्रिवेणी
शांताबाईंच्या कवितांचा विचार त्यांच्या काव्यानुवादाच्या विचारांशीवाय अपुरा राहील. त्यांनी कालिदासाच्या ‘मेघदूता’चा आणि गुलजार यांच्या ‘त्रिवेणी’चा सुंदर अनुवाद केला आहे. अनुवाद करणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यातून काव्यानुवाद अधीकच दुरापस्त. केवळ आशयच नव्हे, भावाच्या सूक्ष्म छटा, त्याच्या रूपरंगपोतासहित दुसर्या भाषेत आणणं अवघड असतं. त्या भाषेच्या संस्कृतीशी ते समरसून जावं लागतं. शांताबाईंना हे छान जमून गेलय, याची प्रचीती मेघदूत आणि त्रिवेणी वाचताना येते.
मेघदूत
‘मेघदूत’ या खंडकाव्याची अनेकांप्रमाणे शांताबाईंना मोहिनी पडली. अनेकांनी ‘मेघदूता’चा मराठीत अनुवाद केलाय. अनेकांनी त्यावर गद्यातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या सार्याचं वाचन, आपण अनावर ओढीनं केलं असं शांताबाई सांगतात. तरीही ‘मेघदूता’चा अनुवाद त्यांना करून बघावासा वाटला. या अनुवाद पुस्तकाच्या प्रारंभी त्या म्हणतात, ‘अनुवाद करून बघणे, हा माझा आनंद व छंद आहे. अनुवाद करून बघणे, हा मूळ कलाकृतीचा अधीक उत्कटतेने रसास्वाद घेण्याचा एक सुंदर मार्ग आहे.’ अशी आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केलीय. वेगळं काही करायचं म्हणून नव्हे, कलाकृती अधिक समजून घेण्यासाठी त्यांनी हा अनुवाद केलाय. त्यांनी अपेक्षा केल्याप्रमाणे अतिशय ललित, मधुर असा हा अनुवाद, वाचकाच्या मनात मूळ संस्कृत काव्याचे वाचन करण्याची उत्सुकता निर्माण करणारा आहे. ही उत्सुकता निर्माण झाल्यावर, वाचकाला मूळ काव्यासाठी शोधाशोध करायला नको. अनुवादाच्या वर मूळ श्लोक दिलेलाच आहे.
त्रिवेणी
गुलजार हे हिंदीतील प्रतिभावंत लेखक, कवी. त्यांनी ‘त्रिवेणी’ हा कवितेचा एक नवीन रचनाबंध निर्माण केला. यात पहिल्या दोन पंक्तींचा गंगा-यमुनाप्रमाणे संगम होतो. आणि एक संपूर्ण कविता तयार होते पण या दोन प्रवाहाखालून आणखी एक नदी वाहते आहे. तिचे नाव सरस्वती. तिसर्या काव्यपंक्तीतून ही सरस्वती प्रगट होते. पहिल्या दोन काव्यपंक्तीतच ती कुठे तरी लपली आहे. अंतर्भूत आहे. शांताबाईंनी या ‘त्रिवेणी’चा अतिशय अर्थवाही, यथातथ्य भाव प्रगट करणारा नेमका अनुवाद केलाय. जीवनाचे, वास्तवाचे, यथार्थ दर्शन, चिंतन त्यातून प्रगट होते. त्यांची एक रचना जीवनावर कसे भाष्य करते पहा.
‘कसला विचित्र कपडा दिलाय मला शिवायला
एकीकडून खेचून घ्यावा, तर दुसरीकडून सुटून जातो
उसवण्या-शिवण्यातच सारं आयुष्य निघून गेले’
किंवा
‘चला ना बसू या गोंगाटातच, जिथे काही ऐकायला येत नाही
या शांततेत तर विचारही कानात सारखे आवाज करतात.
हे कंटाळवाणे पुरातन एकाकीपण सतत बडबडत असते.’
प्रियकर – प्रेयसीची नजारनजर त्यांचे एकटक बघणे आणि त्याच वेळी लोकं बघातील म्हणून तिला वाटणारा चोरटेपणा किती मनोज्ञपणे खाली व्यक्त झालाय.
‘डोळ्यांना सांग तुझ्या, इतक्या लोकात
मोठ्या आवाजात बोलू नका ना माझ्याशी
लोकांना माझे नाव ओळखू यायचे कदाचित’
अशीच आणखी एक कविता-
‘सांजेला जळणारी मेणबत्ती बघत होती वाट
अजून कसा कुणी पतंग आला नाही
असेल कुणी सवत माझी जवळच कुठे जळत’
या अशा कविता. त्यांच्यावर वेगळं भाष्य नकोच. वाचायच्या अन मनोमनी उमजून घ्यायच्या. जीवन-मृत्यूच्या संदर्भातले एक प्रगल्भ चिंतन पहा.
‘मोजून – मापून कालगणना होते वाळूच्या घड्याळात
एक बाजू रीती होते, तेव्हा घड्याळ पुन्हा उलटे करतात.
हे आयुष्य संपेल तेव्हा तो नाही असाच मला उलटे करणार?’
खरोखर शांताबाईंचा अनुवाद हा केवळ अनुवाद नसतोच. अनुसृजन असते ते!
गुलजारांनी ‘त्रिवेणी’ शांताबाईंना समर्पित करताना लिहिलय –
‘आप सरस्वती की तरह ही मिली
और सरस्वती की तरह गुम हो गई
ये ‘त्रिवेणी’
आप ही को अर्पित कर रहा हूँ।’
एका विख्यात, प्रतिभावंत कवीने शांताबाईंना ‘सरस्वती’ची उपमा दिली, ती काही केवळ सरिता- काव्यसरिता या मर्यादित अर्थाने नव्हे! नाहीच! सरस्वती विद्या कला यांची अधिष्ठात्री देवता. या सरस्वतीने आपला अंश शांताबाईंच्या जाणिवेत परावर्तित केलाय, असं वाटावं, इतकी प्रसन्न, प्रतिभासंपन्न कविता शांताबाईंची आहे. रसिक वाचकाला तिचा लळा लागतो. स्निग्ध जिव्हाळा जाणवतो.
समाप्त
©️ श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
खुप सुंदर
खुप सुंदर आस्वादन