सौ. दीपा नारायण पुजारी
विविधा
☆ स्वातंत्र्य संग्रामात भारतीय स्त्रियांचे योगदान – भाग दुसरा ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
आपण प्रत्यक्ष लढाईत, सशस्त्र चळवळीत महिलांनी घेतलेला सहभाग बघितला. अहिंसक चळवळीतही हजारो स्त्रियांचा सक्रिय सहभाग होता. सशस्त्र क्रांतिकारक गटामध्ये प्रचारपत्रके वाटणे, भूमिगतांना खाणे पुरवणे अशी कामे त्या करीत. यात बंगाली मुलींच्या साहसकथा रोमाहर्षक आहेत.
‘शांती घोष ‘ आणि ‘सुनीती चौधरी ‘ या दोन तरुण मुलींनी टीपर जिल्हा मॅजिस्ट्रेट स्टिफन्स याची गोळ्या झाडून हत्या केली. हा बंगाली मुलींवर अत्याचार करत होता..
६ फेब्रुवारी १९३२ . . कलकत्ता विद्यापीठात दिक्षान्त समारंभात भाषण करणाऱ्या सर स्टॅनली जॅक्सन यांच्यावर ‘बीना दास’ हिने गोळी झाडली. हे पिस्तुल ‘कल्पना दास’ हिने अन्य मुलींच्या कडून पैसे गोळा करून खरेदी केलं होतं.
‘कल्पना दास ‘आणि ‘प्रीतीलता वाडेदार’ बालपणीच्या मैत्रिणी. ‘ ईश्वर आणि राष्ट्र’ यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचं व्रत त्यांनी घेतलं होतं. २४ सप्टेंबर १९३२ ‘प्रीतीने’ पहाडताली क्लबवर हल्ला केला.इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून सायनाईड प्राशन केले. प्रीतीलता गेली, परंतु स्रियांची ताकद लोकांना समजली.स्री बदलत गेली. स्वतः तून बाहेर पडली. प्रगतीच्या पथावर पुढे जात राहिली.
महाराष्ट्र ही मागे नव्हता.नरगुंद नावाच्या एका छोट्या संस्थानातील राण्यांनीही ब्रिटिशांच्या विरोधात शस्त्र उचलले व त्या शहीद झाल्या.इ. स. १८८५ मध्ये कॉंग्रेस ची स्थापना झाली. त्यानंतर काही वर्षांनी महिला कॉंग्रेसच्या अधिवेशनाला जाऊ लागल्या. ‘श्रीमती कादंबिनी गांगुली’ हिने प्रथम व्यासपीठावर जाऊन बोलण्याचे धाडस केले. ” महिला म्हणजे कचकड्याच्या बाहुल्या नाहीत. आम्ही पुतळे बनून राहणार नाही” या बोलामुळे स्रियांची अबोल भावना बोलकी झाली. हळूहळू त्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात आपले विचार मांडू लागल्या.
महाराष्ट्रातील नाशिक शहरात स्वदेशीची शिकवण देणारी एक महिला सभा होती. स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या वहिनी ‘येसूवहिनी’ सभेच्या संस्थापिका होत्या. सावरकर बंधू अंदमानच्या काळकोठडीत शिक्षा भोगत होते. अभिनव भारत या संघटनेतील बहुतेक कार्यकर्ते तुरुंगात होते. त्यांच्या बायकांना बंडखोरांच्या बायका म्हणून पोलिस त्रास देत. सासरची व माहेरची माणसं ही त्यांना सरकारी भयामुळं जवळ करीत नव्हती. ‘येसू वहिनींनी’ ‘आत्मनिष्ठ युवती संघ’ नावाची संघटना स्थापन केली. या स्रियांनी स्वदेशी चे व्रत घेतले आणि त्याचा प्रसार केला. त्याच काळात
काळाच्याही पुढे जाऊन त्यांनी हातात काचेच्या बांगड्या घालण्याचे सोडले! साखर परदेशी म्हणून ती ही सोडली. ‘कवी विनायक’ यांच्या देशभक्तीपर कवितांवर सरकारने बंदी घातली होती. त्यांचा तोंडी प्रसार केला. ‘यमुनाबाई सावरकर’ ऊर्फ ‘माई सावरकर,’ वि. दा. सावरकर यांच्या पत्नी, या देखील आपल्या घरातील वातावरणाला
साजेशा काम करीत होत्या. त्या रत्नागिरी येथे सावरकरांच्या समाज सुधारक कार्यक्रमात सहभागी होत. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हळदीकुंकू सारखे कार्यक्रम आयोजित करत. स्पृश्य अस्पृश्य भेद मानीत नसत.
विसाव्या शतकात पहिली जगप्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक ‘भिकाईजी रुस्तुम कामा.’ मादाम कामांनी झोपडपट्टी पासून समाजसेवेला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी घर सोडले. फ्रान्स मध्ये राहून भारतीय क्रांतिकारकांना मदत करण्याचे काम त्यांनी केले.
‘कुमारी बलियाम्माने’ दक्षिण आफ्रिकेतील गांधीजींनी सुरू केलेल्या सत्याग्रहात भाग घेण्यासाठी स्त्रियांचे पथक तयार केले.लाहोरच्या ‘राणी झुत्शीने’ दारुच्या दुकानांवर निदर्शने केली. परदेशी कपड्यांच्या होळ्या पेटवल्या.
म. गांधींनी भारतीय महिलांना तिच्या शक्तीची जाणीव करून दिली. गांधीजींच्या विचारांनी भारुन ‘अवन्तिकाबाई गोखले’ यांनी चंपारण्यात सत्याग्रह केला. हिंद महिला समाजाची स्थापना करुन महिलांना कॉंग्रेसच्या विधायक कामासाठी संघटित केले. एक जानेवारी एकोणीसशे नऊ रोजी ‘सरलादेवी चौधरी’ यांनी ‘वंदेमातरम’ ची घोषणा करुन नववर्ष साजरे केले. ‘हंसा मेहता’ यांनी सायमन कमिशनला विरोध केला. ‘Poet Nightingale of India’, म्हणजेच ‘सरोजिनी नायडू’ दांडीयात्रेत सहभागी झाल्या. त्या पहिल्या महिला राज्यपाल होत.
सविनय कायदेभंग चळवळीत सहभागी अमलप्रभा दास, कमला नेहरू, विजयाताई पंडीत, सत्यभामाबाई, कुवळेकर, कनकलता
बारुआ, अरुणा असावी, उषा मेहता, पद्मजा नायडू, अशी अगणित नावं!! भारतीय इतिहासाच्या आभाळातील या स्वयंप्रकाशीत तारका आहेत. आजही त्या आदर्श ठरतात.
या सर्व हसत हसत आत्मसमर्पण करणाऱ्या माऊलींनी एक तेजस्वी पथ आपल्या साठी तयार केला. कवी कुसुमाग्रजांच्या कवितेतील या ओळींनी या तेजस्विनींना आदरांजली द्यावीशी वाटते.
“युगायुगांची प्रकाशगंगा उदे तुझ्या पाऊली
उदे तुझ्या पाऊली. . . . “
समाप्त
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
9665669148
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈