विविधा
संत सेना महाराज पुण्यतिथी – संत सेना महाराज प्रा. विजय जंगम
महाराष्ट्रातील थोर संत परंपरेत संत सेना महाराजांचं नाव आदराने घेतले जाते. कारण, अंधार युगात ज्या ज्या संतांनी जातीभेदाच्या, वर्ण व्यवस्थेच्या , लिंगभेदाच्या विरूद्ध उद्बोधन करून आधुनिक महाराष्ट्र घडविण्याचं काम केलं , त्यांच्या मध्ये संत सेना महाराजांचा वाटाही मोठा आहे.त्या काळी , संतांनी आपल्या व्यापक विचारांनी भरकटलेल्या समाजाला स्वतः दीपस्तंभ होऊन भक्ती मार्गातून मानव मुक्तीचा मार्ग दाखविला आणि, समाजात समते बरोबरच समानताही निर्माण करण्याचं फार मोठं काम संतांनी महाराष्ट्रात केलं.
मध्य प्रदेशातील रेवा संस्थान. त्याला रेवा खंड म्हणत असत. त्या खंडातील बांधवगड येथे देवीदास आणि प्रेम कुंवर बाई यांचे पोटी , विक्रम संवत १३५७ , इ.स.१३०१ , वैशाख वद्य द्वादशी ,वार रविवार रोजी संत सेनांजीचा जन्म झाला.जन्मत: च बाळ खूपच तेजस्वी. म्हणून त्याचे नाव सेना किंवा सैन असे ठेवले.सैन म्हणजे तेज: पुंज , प्रकाशमान . सेनाजी म्हणजे भीष्माचार्यांचा अवतार असे समजले जाते. कारण, भावी काळात परोपकारी, वचन निष्ठ , प्रतिज्ञा बध्द आणि पराक्रमी असेच त्यांचे जीवन चरित्र दिसून येते.
देवीदास आणि प्रेम कुंवर बाई हे दोघेही धार्मिक आणि साधू संतांची सेवा करणारे एक आदर्श जोडपे होते.त्यामुळे ,सेनाजी्वर बालपणापासूनच चांगले संस्कार झाले.त्यांना साधू संतांचा संग लाभला. त्यांच्या बुद्धीची चमक, त्यांचा चांगुलपणा , धर्म ज्ञान आणि सेवा तत्परता तेव्हा पासूनच दिसू लागली.
त्याकाळी बांधवगड येथे वाघेला वंशाचा रामसिंह राजा राज्य करीत होता.त्याचे दरबारी देवीदास हे सन्मानीय न्हावी होते.देवीदास आणि सेना या दोघांचेही रामानंद हे गुरू होते. ते पुरोगामी विचारांचे असल्याने , सेनाजी पुरोगामी विचारांचेच घडले. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्रातील निवृत्ती, ज्ञानदेव, स़ोपान आणि मुक्ताबाई यांचे वडील विठ्ठलपंत हे देवीदासचे गुरू बंधू.त्यानी सेनाजींना महाराष्ट्रात जायची आज्ञा केली.
देवीदासच्या पश्चात राजदरबारातील सेवा सेनाजी कडे आली , मात्र ते त्यात रमले नाहीत.त्याना विठ्ठलाचा साक्षात्कार झाला आणि ते पंढरपुरात दाखल झाले. तेथे संत नामदेव, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा या संतांचा सहवास लाभला.विठ्ठलाच्या दर्शनाने ते भारावून गेले.ज्ञानदेवादी चारी भावंडांनी समाधी घेतल्याने त्यांचा विरस झाला.ते आळंदीला गेले.तेथे अनेक अभंग रचना केल्या. ज्ञानदेवांच्या चरणी त्या वाहिल्या.
सेना महाराजाना हिंदी, मराठी, पंजाबी , राजस्थानी भाषा येत होत्या. त्यांचे भाषेवर प्रभुत्व होते.गळा गोड होता. त्यांनी व्यसनाधीनता , बदफैली यावर रचना केल्या. ” गांजा भांग अफू घेऊ नका सूरा / “त्याच प्रमाणे आपल्या जातीचाही त्यांनी उल्लेख केला आहे.” न्हावीयाचे वंशी / जन्म दिला ऋषीकशी / ”
नामदेवांच्या समाधी नंतर सेनाजी उत्तर भारताकडे गेले. तेथून बांधव गड . तेथे सर्वांना आशीर्वाद देऊन ते आपल्या जन्म ठिकाणी समाधिस्थ झाले. महाराष्ट्रा बाहेरचे सेना महाराष्ट्रात आपला ठसा उमटवून अजरामर झाले.
© प्रा. विजय जंगम
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈