सौ. सुनिता गद्रे

☆ विविधा ☆ स्पॅनिश फ्लू-अ  फरगॉटन पेंडेमिक – भाग 2 ☆ सौ. सुनिता गद्रे☆ 

जागतिक महामारीच्या बाबतीत विचार केला तर योगायोग म्हणा किंवा आणखी काही, (हा संशोधनाचाच विषय आहे ).पण1720पासून दर शंभर वर्षांनी जागतिक महामारी उद्भवलेली आहे, असं चित्र दिसतं.

1720 साली पुरत्या जगभरात प्लेगची साथ पसरली होती. ती पण एका फ्रेंच व्यापारी जहाजावरून निघालीआणि नंतर पुरतं जग संक्रमित झालं.एक लाख लोक मृत्युमुखी पडले होते.-ही युरोपातील आकडेवारी आहे. इतर ठिकाणची आकडेवारी उपलब्ध नाही. तेव्हाची तिथली लोकसंख्या लक्षात घेता हा आकडा मोठाच आहे.

पुढे शंभर वर्षांनी 18 20 मध्ये कॉलरा पसरला. त्याची सुरवात कलकत्याजवळच्या एका शहरापासूनझाली.इतर देशांपेक्षाआशिया खंडाचा मोठा भाग,ईस्ट आफ्रिका त्यामुळे जास्त प्रभावित झाले. थायलंड इंडोनेशियामधे तर दीड लाख लोक या मुळे मृत्युमुखी पडले अशी नोंद आहे. बाकी ठिकाणची आकडेवारी उपलब्ध नाही.

पुढे शंभर वर्षांनी 1918 ते 1920 या कालखंडात इन्फ्लूएंजा हा आजार पसरला. जगाची एक तृतीयांश लोकसंख्या … त्यावेळी जगाची लोकसंख्या पन्नास करोड होती… आणि त्यातले पाच करोड लोक एन्फूएन्जामुळे मृत्युमुखी पडले .त्यात 20 ते 35 वर्षे वयाच्या तरुण आणि सशक्त लोकांचा समावेश जास्त  होता .

1914 ते 1918 या कालावधीत पहिले जागतिक युद्ध झाले होते. फ्रान्स जर्मनी बॉर्डरवर घनघोर युद्ध चालू होते. सैनिकांना डिफेन्स साठी खणलेल्या खंदकामधे पावसापाण्यात, थंडीवाऱ्यात, चिखलात महिनोंन महिने राहावे लागायचे. त्यांचं झोपणं उठणं, खाण पिणं, सर्व तेथेच चालायचं. ही स्थिती त्यांच्या आरोग्याला प्रतिकूल होती. त्यामुळे बरेच सैनिक निमोनियानं आजारी पडायचे. तिथेच एन्फ्लूएन्जाच्या एच वन एन वन या विषाणूचा जन्म झाला.हल्ली अधून मधून बर्ड फ्लूची साथ येत असते ते याचेच बदललेले रूप आहे .

सैनिक आजारी पडले की त्यांना घरी पाठवण्यात यायचं. ते आपल्याबरोबर हा आजार घेऊनच आपल्या गावात, घरात जात होते .त्यामुळे मिडल वेस्ट अमेरिका पुढे 1919 पर्यंत पुरत्या युरोपमध्ये हे संक्रमण पोहोचले… आणि नंतर पूर्ण जगभर.

1918मधे महायुद्ध संपल्यावर परत येणाऱ्या सैनिकांबरोबर प्रथम मुंबईत… आणि नंतर पुऱ्या भारतभर हे संक्रमण पोहोचले.

जे देश युद्धात सामील झाले होते त्यांच्या देशात सेन्सॉरशिप होती. भारतात सुद्धा….. त्यामुळे या बद्दलच्या बातम्या बाहेर येत नव्हत्या. इन्फ्लूएंजाला  स्पॅनिश फ्लू म्हणायचे कारण फारच विचित्र आहे. स्पेनने या युद्धात भाग घेतला नव्हता.तो एकदम न्यूट्रल देश होता.त्यामुळे इन्फ्लूएंजा बद्दलच्या जगभरातल्या  खऱ्या बातम्या स्पेनमधूनच बाहेर पडत होत्या. त्यामुळे ब्रिटन, अमेरिका सारख्या देशांनी त्याचं नामकरण स्पॅनिश फ्लू असं  करून टाकलं आणि स्वतःच्या देशातून त्याचं अंडर रिपोर्टिंग केलं .

जरी प्रथम विश्व युद्ध 1918  मध्ये संपुष्टात आलं तरी युद्धामुळे जिंकलेल्या आणि हरलेल्या सगळ्याच देशांची अर्थव्यवस्था कोलमडली होती.

प्रचंड मनुष्यहानी झाली होती.  स्पॅनिश फ्लूच्या उपचारासाठी जास्त बजेट पण बहुतांश देश काढून ठेवू शकत नव्हते. यामुळे दुर्लक्षित झालेल्या या स्पॅनिश फ्लूबद्दल जास्त रेकॉर्ड पण कुठल्याही देशाने ठेवलं नाही. त्यावर योग्य इलाज पण झाले नाहीत.त्यामुळे महायुद्धात चार करोड लोक मेले तर स्पेनिश फ्लूमुळे पाच करोड!

भारतात तर ब्रिटिश सरकारने या महामारी वर काही विशेष उपाययोजनाही केल्या नाहीत. इथं दीड ते दोन करोड लोक दगावले ही आकडेवारी तरी कशी पुढे आली .तर ब्रिटिश सरकारने 1901 पासून पुरत्या भारत देशात जनगणना करायला सुरुवात केली होती आणि   तेव्हापासून प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना करायची पद्धत आजतागायत चालू आहे. त्या वेळी 1911 सालच्या देशातील लोकसंख्येच्या आकड्यापेक्षा 1921 मधील लोकसंख्या दोन करोड ने कमी असल्याचे आढळून आले.त्या दहा वर्षाच्या कालखंडात लोकसंख्येत वाढ तर झालीच असेल आणि दुसरे म्हणजे कॉलरा, देवी, मलेरिया यासारख्या साथीत पण खूप लोक दगावले होते. बालमृत्यूचे ,बाळंतपणात मरणाऱ्या स्त्रियांचे प्रमाणही मोठे होते .त्यामुळे  लोकसंख्येत  घट पण झालीचअसेल.परंतू या गोष्टीचा विचार अजिबात न करता,स्पॅनिश फ्लूमुळे दोन करोड लोक मेले हे सरकार कडून जाहीर करण्यात आले. इतर देशातील आकडेवारी पण अंदाजपंचे देण्यात आली असावी.त्यामुळे हा पाच करोड चा आकडा पण खरा असण्याची शक्यता खूपच कमी आहे.

एकंदरीत त्या काळातले स्पॅनिश फ्लूबद्दलचे जास्त रेकॉर्ड उपलब्ध नसल्यामुळे आणि त्याचा त्यानंतर कोणी पाठपुरावा न केल्यामुळे जग त्या महामारीला विसरून गेले. त्यामुळे ‘फरगॉटन पेंडेमिक ‘  असा त्याचाउल्लेख होऊ लागला.

**   समाप्त **

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments