श्रीमती उज्ज्वला केळकर

? विविधा ?

☆ समाज प्रबोधनाचे सरदार: गं .बा. सरदार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

गंगाधर बाळकृष्ण सरदार

 (२ ऑक्टोबर १९०८-१ डिसेंबर १९८८)

गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचं सारं लेखन समाज प्रबोधन आणि समाज परिवर्तन या गोष्टी केंद्रस्थानी ठेवून केलेले आहे. समाजाचे निकोप परिवर्तन व्हायचे असेल, तर सांस्कृतीक विषमता आणि आर्थिक दु:स्थिती नाहीशी व्हायला हवी, अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या सामाजिक चिंतनाचा प्रभाव स्वाभाविकपणे त्यांच्या साहित्यिक दृष्टीकोणावर पडला आहे. सामाजिक दायित्व ते मानतात, त्यामुळेच साहित्याची निखळ कलावादी भूमिका त्यांना मान्य नाही.

गं .बा. सरदार यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील जव्हार गावी झाला. त्यांचे शिक्षण जव्हार, पुणे, मुंबई इथे झाले. त्यानंतर नाथाबाई दामोदर ठाकरसी या महिला विद्यालयात मराठीचे व्याख्याते म्हणून त्यांची निवड झाली. ६८ला ते मराठीचे प्रपाठक  म्हणून निवृत्त झाले.

जव्हार मध्ये आदिवासी बहुसंख्येने आहेत. त्यामुळे त्यांचे जीवन, त्यांची दु:खे, समस्या इ.शी त्यांची जवळून ओळख झाली. घरातील वातावरणही समतावादी होतं.त्यामुळे सामाजिक भेदाभेदापलीकडे जाऊन माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी त्यांना लाभली.

शालेय जीवनात स्वामी रामतीर्थ, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. सावरकरांच्या विचारांनेही त्यांना काही काळ मोहित केलं होतं. नंतर ते गांधीवादाकडे वळले होते. मिठाच्या सत्याग्रहात ते सामील झाले होते आणि त्यासाठी त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता. पण पुढे बदलत्या काळात, त्यांना गांधीवादाचे अपूरेपण जाणवू लागले. मग ते साम्यवादी विचारधारेकडे ओढले गेले. सक्रीय राजकरणाकडे न वळता, ते लेखन-भाषण याद्वारे समाज प्रबोधन करू लागले. त्यांची ग्रंथसंपदा पहिली तरी त्यांचे समाज प्रबोधनाशी असलेले अतूट नाते लक्षात येईल.

अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका हा त्यांचा पहिला ग्रंथ १९३७ साली प्रसिद्ध झाला.  १८८५ ते १९२० या कालखंडात मराठी गद्याचा विकास झाला, त्याची पार्श्वभूमी अव्वल इंग्रजी काळातील मराठी गद्यलेखकांनी कशी तयार करून ठेवली, याचे विवेचन त्यांनी यात केले आहे. त्यासाठी त्यांनी १८०० ते १८७४ या काळातील विविध ग्रंथांचा परामर्श घेतला आहे.

सरदारांची आणि ग्रंथसंपदा सांगायची तर १.महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी -१९४१ , २.न्या. रानडेप्रणीत, सामाजिक सुधारणेची तत्वमीमांसा, ३.आगरकरांचे सामाजिक तत्वविचार , ४. म. फुले विचार आणि कार्य , ५ .प्रबोधानातील पाउलखुणा – १९७८       ६. नव्या युगाची स्पंदने –  १९८४, ७. नव्या ऊर्मी नवी क्षितिजे – १९८७ , ८. परंपरा आणि परिवर्तन- १९८८. पुस्तकांची ही नावे वाचली तरी  प्रबोधनाकडे त्यांचा असलेला कल स्पष्ट होतो.

रानडे, चिपळूणकर, यांच्या पूर्वी महाराष्ट्रात चेतनादायी ठरेल असे काम ज्यांनी केले पण ज्यांची उपेक्षा झाली, त्या अव्वल इंग्रजी काळातल्या, भाऊ महाजनी, लोकहितवादी, विष्णुबुवा ब्रम्हचारी म. ज्योतिबा फुले ह्यांच्या कार्याचे विवेचन त्यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या कार्यामागे न्या. रानडे यांचे तात्विक अधिष्ठान काय होते, प्रबोधनाच्या इतिहासात त्यांचे स्थान काय होते, याचे विवेचन त्यांनी केले आहे. आगरकरांच्या सामाजिक चिंतनाचा परामर्श घेऊन धर्म , सामाजिक परिवर्तन, आणि आर्थिक प्रश्न हयासंबंधी आगरकरांच्या विचारांचे विवेचन केले आहे. म. फुले यांच्या जीवांनीष्ठेचा शोध घेऊन त्यांच्या विचारांचा सामाजिक आशय त्यांनी विषद केला आहे.

त्यांच्या स्फुट लेखातून भारतीय राष्ट्रवाद, आणि ऐहिक निष्ठा, नव्या महाराष्ट्राचे भवितव्य, संस्कृती संवर्धन आणि ज्ञानोपासणा ह्यातील अनुबंध, समाज प्रबोधन आणि धर्मजीवन, व्यक्ति आणि सामाजिक संस्था यातील अनुबंध संकुचित विचारांमुळे प्रबोधनाला पडणार्‍या मर्यादा अशा अनेक विषयांचे  विवेचन त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे , म. ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू छत्रपती, म.गांधी, कर्मवीर भाऊराव  पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, या थोर सुधारकांच्या कार्याचा परिचय करून दिला आहे.

त्यांच्या काही लेखातून दलित साहित्याचे समालोचन आर्थिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही आघाड्यांवर घेतले आहे. जनमानसात नवीन जाणीवा रुजवणार्‍या दलित साहित्यिकांचा विद्रोह सरदारांना स्वागतार्ह वाटतो. भविष्य काळात खर्‍या अर्थाने भारतीय समाज एकात्म बनला, तर दलित वाङमायाच्या स्वतंत्र अस्तत्वाचे प्रयोजन रहाणार नाही, असे त्यांना वाटते, पण तोपर्यंत त्या साहित्याचे वेगळे दालन आणि व्यासपीठ आवश्यक आहे, असं त्यांना वाटतं.  समाजाचे निकोप परिवर्तन व्हायचे असेल, तर सांस्कृतिक विषमता आणि आर्थिक दु:स्थिती नाहीशी व्हायला हवी, अशी त्यांची धारणा होती.

’संतवाङमायाची सामाजिक फलश्रुती’  या त्यांच्या गाजलेल्या ग्रंथात, त्यांनी संतांच्या कामगिरीचा परामर्श घेतला आहे.  संतांनी मराठीसंस्कृतिक विकासात काय योगदान दिले, याचा विचार सामाजिक दृष्टीकोन ठेवून केला आहे. संतांच्या विचारामुळे सामाजिक प्रगतीत अडसर निर्माण झाला, हे काही अभ्यासकाचे मत त्यांना मान्य नाही. ‘ज्ञानेश्वरांची  जीवननिष्ठा या १९७१ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात त्यांनी ज्ञानेश्वरांचे तत्वज्ञान आणि कार्य याच विवेचन केले आहे. याचप्रमाणे ‘तुकाराम दर्शन -६८, रामदास दर्शन – १९७२, एकनाथ दर्शन- ७८ हे ग्रंथ संपादले आहेत.

गं. बा. सरदारांच्या संपादित ग्रंथात महाराष्ट्र जीवन : परंपरा , प्रगती आणि समस्या ( २ खंड – १९६० ) आणि संक्रमण काळाचे आव्हान ( १९६६) हे २ ग्रंथ विशेष उल्लेखनीय ठरले आहेत. अनेक अभ्यासक, आणि विचारवंत यांनी लिहिलेले लेख यात समाविष्ट केलेले आहेत.

आयुष्यात त्यांनी विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन लेखन केले. त्यांना अनेक सन्माननीय पदे मिळाली. १९७८ साली मुंबई येथे झालेल्या दलित साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते, तर १९८० साली बार्शी येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नाशिक आणि जळगाव येथे भरलेल्या अन्याय निर्मूलन परिषदेचे ते अध्यक्ष होते. मनोर ( त. पालघर) जंगल बचाव आदिवासी परिषद भरली होती. या परिषदेचेही ते अध्यक्ष होते.

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि इतिहास संशोधक मंडळ इ. विविध संस्थांमध्ये त्यांनी काम केले. त्यांचे पुणे येथे १ डिसेंबर १९८८ रोजी निधन झाले.त्यानंतर हेमंत इनामदार यांनी  त्यांच्यावरचा  गं. बा. सरदार: व्यक्ती आणि कार्य हा ग्रंथ १९९८ मध्ये लिहून प्रसिद्ध केला.

साभार  – इंटरनेट

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments