श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ ‘स्वयंपाकघर…बदलती रुपे’ – भाग 1 ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘स्वयंपाकघर’ या शब्दाला लगडलेल्या असंख्य आठवणी मनात आहेत. माझ्याच नजरेसमोर या प्रदीर्घ काळात माझ्या अंगवळणी पडत, हळूहळू प्रत्येक गोष्टच तिचं मूळ रुप अनोळखी वाटावं इतकी बदलत गेलेली आहे. त्याला स्वयंपाकघर तरी अपवाद कसं असणार..?स्वयंपाकघराच्या स्वरुपाच्या जुन्या रुपाची आठवण आज आवर्जून आठवताना मात्र कल्हई केलेल्या भांड्यासारखी लखलखीत रुपात नजरेसमोर येतेय.लिहिण्याच्या ओघात सहज आलेला ‘कल्हई’ हा शब्द पूर्वीच्या स्वयंपाकघरासाठी आजच्या भाषेत सांगायचं तर Must च होता.

माझ्या दृष्टीने माझ्या बालपणापासूनच्या आठवणीतलं स्वयंपाकघर म्हणजे कालचं नव्हे.परवाचं.माझ्या संसारातलं स्वयंपाकघर कालचं.पण आधी थोडं परवाच्या स्वयंपाकघरा बद्दल. ते आजच्या ‘किचन’ पेक्षा तर खूपच वेगळं होतं.तेव्हा त्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या , एखादा अपवाद वगळता , जवळजवळ सर्वच वस्तू आज कालबाह्य झालेल्या आहेत.वस्तूच नव्हे तर तिथल्या कामाच्या पद्धतीही..!

आम्ही मुलं साखरझोपेत असतानाच बागेतल्या पक्षांच्या किलबिलाटाआधीच, लवकर उठून स्वयंपाकघरात कामाला लागलेल्या माझ्या आईच्या हातातल्या बांगड्यांची किणकिण सुरु होत असे.तो मंजूळ आवाज इतक्या सवयीचा होऊन गेलेला होता की आजही इतक्या वर्षांनंतर या जुन्या आठवणी नजरेसमोरुन सरकत असताना ती किणकिण एखाद्या पार्श्वसंगीतासारखी मला ऐकू येत असल्याचा भास होतोय. पहाटेच नव्हे तर दिवसभराच्याच आईच्या स्वैपाकघरातल्या वावराची ती किणकिण ही एक हवीहवीशी वाटणारी खूण आहे माझ्या आठवणीतली.

‘चूल’ हा तेव्हाच्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भागच.घरी कर्त्याबाईची पारोशी..म्हणजे आंघोळी आधीची.. कामं सुरु व्हायची ती चुलीपासूनच.घरातली इतर सगळी उठण्यापूर्वीच आधी स्वयंपाकघरातला केर काढून चूल सारवून घेतली जायची.हे सारवण नित्याचेच खास काम.पूर्वी सगळीच घरं मातीची असायची. बांधकामात सर्रास वापरली जाणारी पांढरी मातीच चुलीच्या सारवणासाठी वापरली जायची. एखाद्या निरुपयोगी जुन्या भांड्यात  कालवलेल्या तशा पांढऱ्या पातळसर मातीत जुन्या कापडाचा बोळा बुडवून आई संपूर्ण चूल आतून बाहेरुन सारवून घ्यायची.चूल आणि चूलीमागचा भिंतीचा अर्धा भागही. एरवी चुलीत जळणाऱ्या लाकडांच्या धगीने न् धुराने चूल आणि मागच्या भिंतीचा थोडा भागही काजळून जायचा.ते सगळं टाळण्यासाठी म्हणून हे सारवणं आवश्यक असायचं.दिवसभरातल्या चुलीतल्या उष्णतेने टवके उडालेलं ते सारवण दुसऱ्या दिवशी पहाटे आधी साफ करुन केर काढला की चूल पेटवण्यापूर्वी  पुन्हा नवीन सारवण.आम्हा मुलांना सकाळी जाग आल्यानंतर दृष्टीस पडायची ती ही अशी सारवून त्यावर गोपद्मं न् ‘श्री अन्नपूर्णा प्रसन्न’ या रांगोळीलेखल्या रुपाने सजलेली साजरी चूलच.

आजही ती चूल तिचं आस्तित्त्व विरलं असलं तरी  ‘चूल आणि मूल’, ‘ घरोघरी मातीच्या चुली ‘ ‘चुलीतली लाकडं चुलीतच जळायची’अशा कितीतरी म्हणींच्या रुपात अजरामर झालेली आहे.

चहाचं आधण, चहा टाकणं,स्वयंपाकपाणी,पारोशी कामं,सोदणं (हात पुसायला आणि गरम भांडी चुलीवरुन उतरवायला आईच्या कमरेला सतत खोचलेलं असणारं स्वच्छ फडकं)पाटपाणी,पानं घेणे, जेवणखाण, जेवायला वाढणे,पंक्तीत हवो नको  पहाणे…या सारखे रोजच्या वापरातले स्वयंपाक, स्वयंपाकघर,आणि जेवण यांच्याशी निगडित अनेक रुढ बोलीभाषेतले शब्द हल्ली क्वचितच कधी ऐकायला मिळतात.

पूर्वी पितळेची भांडी, पातेली,ताटंवाट्या,तांबे,हे स्वयंपाकघराचं ऐश्वर्य असायचं.स्वयंपाक पितळेच्या भांड्यापातेलीतच शिजायचा आणि पितळेच्या ताटंवाट्यातच वाढला जायचा.आमटी करताना वापरायला चिंचेचा कोळ काढून घेऊन राहिलेली चिंच ही सगळी ताब्यापितळेची भांडी घासून लखलखीत करायला आई आठवणीने बाजूला  ठेवायची.धुणीभांडी बहुतेक घरांमधे मुली हाताशी येईपर्यंत आईच करायची.जळकी भांडी घासताना हात भरुन यायचे म्हणून भांडी,पातेली,तवा चुलीवर चढवण्यापूर्वी त्यांच्या बाहेरच्या भागाला आई आधी माती कालवून लावायची न् मग चुलीवर चढवायची.पितळेची ही सगळीच भांडी, ताटं-वाट्या यांना अन्न कळकू नये म्हणून कल्हई लावून घेतली जायची.कल्हईवाला  ठराविक काळाने हाकारे देत रस्त्यावरुन फिरायचाच.ते कल्हई लावण्याचं ‘ प्रोसेस ‘ अगदी त्याचे दर ठरवतानाच्या घासाघिशीसकट पहाणं हा आमचा आनंद असायचा.घासाघीस खूप वेळ चालली तरी व्यवहार कधीच मोडायचा नाही. कारण कल्हई वाल्याच्या घरची चूल पेटणं ही त्याचीही गरज असायचीच.गरज दोन्ही बाजूना असल्यामुळेच ‘गरजवंताला अक्कल नसते’ ही म्हण या व्यवहारापुरती तरी नेहमीच खोटी ठरायची.कारण इथे दोन्ही गरजवंताना व्यवहार न मोडण्याची अक्कल असायचीच.

पाटा-वरवंटा, खलबत्ता, सूप,जातं, जाळीच्या दाराचं दूध ठेवायचं छोटंसं कडिकोयंड्याचं कपाट,फडताळं,शिफ्तर,शिंकाळं, ताटाळं, कपबशांचा भिंतीला टांगायचा स्टॅंड अशा आणि इतरही अनेक तेव्हाच्या स्वयंपाकघरातल्या अत्यावश्यक वस्तू आज कालबाह्य झाल्या असल्या तरी माझ्यासाठी मात्र त्यांच्या आठवणी आजही मोलाच्या आहेत…..

क्रमशः…..

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments