सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
☆ विविधा ☆ सामाजिक समरसता ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
माझ्या आयुष्यात मला समाजाशी समरस होण्याची एक उत्तम संधी प्राप्त झाली. ती म्हणजे आमचं पूर्वी होत ते टेलिफोन बूथ.
आमच्या आजूबाजूला सगळे दवाखाने असल्याने आमचे बूथ चांगले चालले होते
पहाटे तीन वाजता कॉल बेल वाजली. नाईलाजाने बूथ उघडले. जखड आजोबा, ननगे फोन माडूवदिदे असं म्हणून नंबरचा त्याच्यासारखाच चुरगळलेला कागद दिलान. डोळ्याच्या कडा पाणावलेल्या आणि नंतर वहायला लागल्या. त्यांचा नातू समोरच्या हॉस्पिटल मध्ये सिरीयस होता. पिकलं पान हिरव्या पानाला आधार देत होत. दुसरे दिवशी काय झालं कोण जाणे. आजोबा परत आला नाही.
सकाळी दप्तरांचे ओझ वागवत जाणारी मुलं, बूथच्या केबिन मध्ये उभा राहून गप्पात मशगुल होणारी लैला मजनु पाहिली की आपलं शालेय आणि कॉलेज जीवन आठवल्या वाचून रहायचं नाही. जनावरांच्या दवाखान्यातून कुत्र्याला बरोबर घेऊन येणारा तगडा पैलवान फोन करताना कुत्रा वाचणार नाही म्हणून रडायला लागला की मी श्वान प्रेमी यांची चौकशी केल्यावाचून रहायची नाही. त्यांच्या दुःखाशी समरस व्हायची. कधीकधी वयस्क जोडप येऊन डब्बा, पथ्य-पाणी याविषयी घरी फोन करायचे. घरात होणारी कुचंबणा मला सांगायचे आणि रात्री मुलगा सून येऊन हे म्हातारे कसे हेकेखोर आहेत तेही सांगायचे. कधी एखादा पेशंट डिस्चार्ज मिळाल्याचे आनंदाने सांगायचा आणि त्याला दिलाचा आकडा सांगताना अडखळायला व्हायचं. कोणी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचं. तर कुणी एखादा मृत्यू झाल्याचे दुःख सांगायचं. कुणीतरी समोर दवाखान्यात बाळंत होऊन मुलगा झाल्याचा आनंद सांगायचे. कधीकधी पाऊस खूप असला की दोन दोन दिवस कोकणातल्या खेडेगावात फोन न लागल्याने निराश होऊन परत जायचे. कुणी डॉक्टरांच्या विषयी तक्रार तर कुणी कौतुक करायचे.
बूथ बंद करून वर आल्यानंतर पुन्हा बेल वाजली की परत उघडायचा कंटाळा यायचा. पण त्यांच्या अडचणी पाहून कपाळावरची आठी जाऊन ओठ आडवे फाकवत हसावे लागायचे.
येथे येणारे बरेचसे कानडी असल्यामुळे मला कानडी भाषा यायला लागली. दैनंदिन जीवनातली अनेक कोडी उलगडायला लागली. या बूथ मुळे दोन हृदयांच्या भावनांच्या संक्रमणाला मी साक्षी रहात गेले. दोन व्यक्तींना मनाने जोडून आणण्याचे माध्यम झाले.
बूथ मधे येणाऱ्या प्रत्येकाचे प्रयोजन वेगवेगळे. वेगवेगळ्या भावभावनांचे फिकट गडद, आकर्षक अशा रंगांचे मिश्रण मी रोज बूथमधे बसून पहात होते. एका पांढऱ्या रंगातील सात रंग असले तरी डोळ्याला पांढरा रंगच दिसतो. त्या पांढऱ्या तल्या मिश्रणालाच मी समजून घेत गेले. आणि खरी तेव्हाच समरसतेची जाणीव प्रत्ययाला आली. न विसरण्यासारखी.
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली
फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈