सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ संत  वेणास्वामी – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:

“सूर्याच्या लेकी” हे नावच मुळी इतके समर्पक आहे की, सूर्याच्या तेजा प्रमाणे समाजात स्वत:च्या तेजाचा, ज्ञानाचा ,प्रकाश पसरविला आणि तोही अनंत हाल-अपेष्टा सहन करून! इतकेच नाही तर त्या तेजाचा समाजाला उपयोग करून दिला. भारतात अशा अनेक शूरवीर कर्तबगार आणि संत स्त्रिया होऊन गेल्या.

अशा अनेक स्त्रियांपैकी मला मनोमन भावल्या त्या समर्थ रामदास यांच्या शिष्या ‘संत वेणाबाई ‘त्याच ‘संत वेणास्वामी’. दक्षिणकाशी समजल्या जाणाऱ्या, कोल्हापुरात गोपजी देशपांडे गोसावी राहात होते. पुराणग्रंथ, तत्वज्ञान आणि ज्योतिषाचे ते ज्ञाते होते. श्री जगदंबा महालक्ष्मीच्या कृपेने त्यांना एक कन्यारत्न झाले.(इ. स.१६२८) . तिचे नामकरण झाले ‘वेणा.’ वेणा दिसायला सुंदर तर होतीच, पण खेळात खूप रममाण होणारी होती. कोड कौतुक खूप होत होते. कुतुहल म्हणून यांनी कन्येची पत्रिका पाहिली. तिच्या पत्रिकेत वैधव्य असा योग होता. आणि त्याचबरोबर अध्यात्मिक पातळीवर उच्च स्थान प्राप्तीचा योग होता. ही गोष्ट त्यांनी घरी सांगितली नाही. ती जात्याच हुशार होती. त्यामुळे वडिलांनी तिला लिहायला वाचायला शिकविले .एकनाथांचे “भावार्थरामायण” “भागवत” ग्रंथ ही वाचायला लागली. घराण्यात राम भक्तीचा पूर होता. लहान असतानाच वेणा ‘अध्यात्मरामायण’ तोंडपाठ म्हणू लागली .राम भक्ती ही वेणाच्या रक्तात होती. आई बरोबर भजन, कीर्तन ऐकायला जात असे. या काळात समर्थ रामदासांचा संप्रदाय महाराष्ट्रात नुकताच उदयाला आला होता. तत्कालिन प्रथेप्रमाणे आठव्या वर्षी मिरज येथील चंदुरकर देशपांडे यांच्या एकुलत्या एक मुलाशी तिचे लग्न झाले. घर संपन्न होते.  ती माहेरी गेली.  आणि एके दिवशी सर्वजण जेवायला बसले होते ,आणि वेणाला  , मिरजेला बोलावल्याचा सांगावा आला. तिचे पती स्वर्गवासी झाल्याची बातमी आली. हसण्या खेळण्याच्या वयात बाराव्या वर्षी वैधव्य आले. तत्कालीन सामाजिक पद्धतीनुसार केशवपन झाले. आणि ती अळवण (लाल लुगडे) नेसायला लागली. कोवळ्या वयातील अशा रूपातील वेणाचे चित्र डोळ्यासमोर आले की आपल्यालाही बेचैन होते.

तिने स्वतःला सावरले. धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्यात मन गुंतवू लागली .आपल्या सासरी ती राहात असे. सासरच्यांनीही तिला शिक्षणात मागे पडू दिले नाही. एकदा रामदासस्वामी भिक्षेसाठी दारात आले,” जय जय रघुवीर समर्थ”, तुंबा भर दूध मिळेल का? सासूबाईंनी आतूनच सांगितले. दूध आहे , पण ते मारुतीच्या अभिषेकासाठी ठेवले आहे. ठीक. म्हणून समर्थ निघून गेले. पण ही गोष्ट वेणाच्या मनाला लागून राहिली. एकदा ती घरातील कामे आटोपून, तुलसी वृंदावना  जवळ ‘एकनाथी भागवत, वाचत बसली असताना ,समर्थ रामदास भिक्षेसाठी दारात आले. वेणा वाचत बसलेली पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी तिला विचारले “मुली हे तुला समजते का “वेणाने उत्तर दिले,” समजत नाही ,समजून घेण्याचा प्रयत्न करते .मनात प्रश्न येतात. पण सांगणार कोण?” वेणाची तत्व जिज्ञासा पाहून समर्थांनी तिच्या शंका विचारल्या. 25 प्रश्न तिने विचारले. जीव आणि शिवा चे लक्षण ,आत्मा परमात्मा, मायेचे स्वरूप ,त्यावर सत्ता कोणाची, चैतन्य काय आहे? आद्याचे स्वरूप काय आहे? शून्य शून्य पण चैतन्य, जन्म मृत्यू आणि बद्धमुक्त कोण आहे? सगुण निर्गुण, ब्रह्म मार्ग कोण सांगेल? असे पंचवीस प्रश्न तिने विचारले. त्यानंतर समर्थांनी तिच्या प्रश्नांना उत्तरे दिली .आणि वेणाला सांगितले की ,रोज हे वाचत रहा. तुला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. समर्थ स्वामी निघाले. त्यांना पहात राहिली. तिला सद्गुरु मिळाला.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments