सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ संत  वेणास्वामी – भाग -4 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:

 त्या काळात मिरजेच्या किल्ल्यावर आदिलशहाचा किल्लेदार दलीलखान काम पहात होता. तो अहंकारी होता. समर्थांनी त्याला रामाची अनुभूती देऊन, अहंकार उतरवला. तो समर्थांचा भक्त झाला. समर्थांना “तुम्हाला काय हवे ते देतो, पण इथेच राहा” म्हणून आग्रह करू लागला .पण समर्थांनी त्याला सांगितले की, या आमच्या शिष्या वेणास्वामी मिरजेच्या आहेत. तेव्हा त्या राहतात, ती जागा मठ म्हणून करा. दलील खानने समर्थांना आश्वासन दिले की ,”वेणा स्वामींना काहीही त्रास होणार नाही,” पुढे समर्थांनी वेणाबाईंना विधिवत मठपती म्हणून स्थानापन्न केले. (शालिवाहन शके १५७७ , इ.स. १६५५, श्रावण अष्टमी) आणि क्रांतिकारी पाऊल टाकले .आता समर्थ जायला निघाले. वेणास्वामींना वाईट वाटले. समर्थांनी राम-लक्ष्मण-सीता मारुती यांच्या मूर्ती आणि स्वतःच्या चरणपादुका ,त्यांच्या स्वाधीन केल्या. दलिलखान हनुमानाचा आणि  वेणास्वामींचा भक्त झाला .तो नित्य दर्शनासाठी येताना, फळे-फुले, मिठाया घेऊन यायचा. कधी वेणास्वामींशी धर्म आणि तत्त्वज्ञान यांच्या विषयावर सल्ला घ्यायचा. मठाधिपती झाल्यानंतर  वेणास्वामीनी आपल्या मठास सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र म्हणून विकसित केले. तरुणांमध्ये भक्ती बरोबर शक्ती हवी, म्हणून कीर्तन, प्रवचन, दासबोध पारायण, त्याचबरोबर आखाडा ही बनविला गेला. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, म्हणून रामरक्षा, मनाचे श्लोक शिकवू लागल्या. लवकरच मिरजेचा रामदासी मठ विख्यात केंद्र बनला. वेणास्वामी राम जन्मोत्सवासाठी महिनाभर चाफळला जात असत. कीर्तनाद्वारे जागृती करत असत. अनेक ठिकाणी त्यांचे शिष्य होते. तेथे आखाडे स्थापित झाले. वेणास्वामीनी उत्तर भारताची यात्राही केली होती. त्यांनी कबीर, मीराबाई यांच्या पदांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांनी काही हिंदुस्थानी भाषेतील पदेही रचली आहेत. उत्तर भारतात त्यांचे अनेक शिष्य आणि आखाडेही होते.

एकदा समर्थ मिरजेच्या मठात आले असताना, काशीराज या विद्यार्थ्याने सोवळ्यातील पाणी पाय धुवायला आणून दिले.  तेव्हा वेणा बाईंनी सांगितले की, दासबोधातील शिकवण– देव तसा  गुरु. आपण देवरूप आहात म्हणून त्यांनी सोहळ्यातील पाणी आणून दिले. वेणास्वामी कडक शिस्तीच्या होत्या. त्यांना चाफळला असताना एक महंत पालथा पडून दासबोध वाचत असल्याचे दिसले. त्यांनी त्याच्यासमोर खाली वाकून नमस्कार केला.  त्याला चूक समजली. आणि तो खजिल झाला.

इ.स.१६७८मधे वेणा स्वामींना समर्थांनी निरोप पाठवला की यावेळी आक्का स्वामी तेथे नसल्याने, व मीही ऐनवेळी येणार असल्याने ,सर्व व्यवस्था तुम्हाला एकटीलाच पहावी लागणार आहे. प्रथम त्या गोंधळून गेल्या. चाफळ मठाची सर्व व्यवस्था आक्का स्वामींच्या विचाराने चालत असायची. पण यावेळी त्या रामदासींच्या बरोबर भिक्षेसाठी कराड, कोल्हापूरच्या भागात जाणार होत्या. नेहमी आक्कास्वामी आणि मदतीला वेणास्वामी अशा मिळून, रामनवमीच्या उत्सवाची तयारी करीत असत.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments