डाॅ.व्यंकटेश जंबगी
विविधा
☆ समर्थ रामदासांचे कार्य…. ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆
“समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे
जयाची लीला वर्णिति लोक तिन्ही
नुपेक्षी कदा रामदासाभिमानि”
समर्थांच्या कार्याची ओळख करून देण्यास पुरेसा आहे.वास्तविक “समर्थ”हे विशेषण रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामांना दिले आहे.परंतु स्वामींचे कार्य पाहून लोकांनीच त्यांना समर्थ ही उपाधि दिली.
शक्ती आणि भक्ती दोन्ही समर्थांच्या ठिकाणी होते. छत्रपति शिवाजी महाराज हे स्वामींचे समकालीन होते.त्या काळात रयतेवर,महिलांवर अन्याय होत होता.हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे राजे आणि स्वामी दोघांचे कार्य समकक्ष होते.दिशा समांतर होत्या.राजे युद्ध, स्वारी,तह, राजकारण यात व्यस्त असत,पण त्यांनी ठिकठिकाणी योद्धे सिद्ध केले होते.समर्थांनी श्रीरामावर श्रद्धा ठेवून युवकांना बलोपासना शिकविली.अनेक मारूती मंदिरांची स्थापना शक्तिची देवता म्हणून स्थापन केली.समर्थ अनेक पातळ्यांवर एकाच वेळी यशस्वी होत होते.त्यांनी महाराष्ट्रभर रामदासी सिद्ध केले होते. समर्थ निर्भय, निर्भीड,स्पष्ट होते.ब्रम्हांडापलिकडे रामकथा गेली पाहिजे असे ते म्हणत.. ते सांस्कृतिक अधिकारी होते.. लोकांच्या विचारांमध्ये परिवर्तन करण्याची त्यांची क्षमता होती… छत्रपती शिवाजी महाराज यांचेशी समर्थांची राजकारणाबरोबर तत्वज्ञानावरही होत असे.दोघांचे मार्ग वेगळे पण लक्ष्य एकच…..
हिंदवी स्वराज्य स्थापन करणे !
दोघांनी एकमेकांच्या क्षमतेची जाण होती…आदर होता… विश्वास होता…”.रामदास स्वामी नावाचा कोणी साधू महाराष्ट्रात आहे,त्यांचा दरारा राज्यात आहे”असे पोर्तुगीज लेखक कास्पोर्दि गार्डा याने लिहिले आहे.
“संत” या कक्षात समर्थ बसणारे नव्हते.संत म्हणजे सहिष्णु,नम्र, क्षमाशील, सोशिक…..पण समर्थ तसे नव्हते ते जिथे आवश्यक तिथे शांत,पण तेवढेच आक्रमक होते:-
“सुभटासि व्हावे सुभट
ठकासि व्हावे महाठक”
असे त्यांनी सांगितले. छत्रपति शिवाजी महाराजांच्या मध्ये आणि समर्थांमध्ये हे विलक्षण साम्य होते ईश्वरभक्तांनी उगीच मिळमिळीत राहू नये,नेटका प्रपंच करावा,संपन्न जीवन जगून ही भक्ती करता येते.असे त्यांचे मत होते.भक्तांनी लाचारी, गयावया का करावी ?, प्रतिकूल परिस्थितीत आत्मविश्वास कसा असावा? सज्जन भक्तांचे रक्षण आणि शत्रूंचा बीमोड त्यांनी करून दाखविला: –
“सामर्थ्य आहे चळवळीचे,
जो जो करील तयाचे
परंतु तेथे भगवंताचे
अधिष्ठान पाहिजे”
हा महान संदेश महाराष्ट्र संकटात असताना त्यांनी दिला.
समर्थांचा शिष्यगण आणि भक्तगण प्रचंड होता.मठ ऐश्वर्यवान होते..त्या ऐश्वर्याचा विनियोग त्यांनी स्वराज्यासाठी केला.ग्रीक तत्ववेत्ता प्लेटो म्हणतो,”समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे तत्वज्ञानी आणि राज्यकर्ता असा पूरक संयोग होता.
स्वामी एकांतप्रिय आणि अनेकांतप्रियही होते.म्हणून दासबोध, मनाचे श्लोक, करूणाष्टके हे लोकप्रिय झाले.शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती शंभूराजेंना
लिहीलेल्या पत्रात समर्थ प्रारंभी लिहितात :-
“शिवरायांचे आठवावे रूप
शिवरायांचा आठवावा प्रताप
शिवरायांचा आठवावा साक्षेप
भू मंडळी…”
अशा अनेक उपदेशाने छत्रपती संभाजी महाराज यांना समर्थांनी धीर तर दिलाच,पण कर्तव्याची जाणीव करून दिली.
यापेक्षा मोठे कार्य काय असेल ?
लिहीण्यासारखे अनंत आहे पण लेखनसीमेचा आदर करून इथेच थांबतो.
! !जय जय रघुवीर समर्थ!!
© डॉ. व्यंकटेश जंबगी
एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈