सौ ज्योती विलास जोशी
विविधा
☆ सावली.. ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆
लहान माझी बाहुली मोठी तिची सावली.या बालगीतानं लहानपणीच नकळत माझ्या बाल मनावर गारुड केलं होतं.बाहुली ही माझी प्रिय सखी! तिची सावली जणू मलाच छाया देणारी!आज मला जेव्हा हे बालगीत आठवते तेव्हा कवीचा हा केवळ यमक जुळवण्याचा प्रयत्न नसून बाहुलीची सावली कवीनं प्रतीकात्मक म्हणून वापरली असेल. असा विचार माझ्या मनात आला.माझ्या छोट्याशा निरागस मनविश्वात बाहुली आणि तिची सावली दोघी माझ्या सोबत होत्या.आईची सावली म्हणजेच मायेची सावली बाळासाठी!…..तसेच त्या बाहुलीची मोठी सावली म्हणजे प्रेमाची सावली माझ्यासाठी!….. मला लहानपणापासूनच सावल्यांचा अप्रूप होतं .आई बाबा भिंतीवर सावल्यांचे पक्षी,हरीण, ससा, उंट करून दाखवायचे आणि मला रिझवायचे. दुपारच्या वेळेला अंगणात आपल्याच सावली पासून लांब पळायचं… असा खेळ खेळण्यात ही मी रमून जायची.रात्रीच्या वेळी भिंतीवर चिऊ-काऊ, हम्मा, भू भू असे अनेक जण भेटायला यायचे.’ हा खेळ सावल्यांचा’ हे गूढ समजण्याचं ते वयच नव्हतं! मोठी झाले तशी सावली मोठी होत गेली. ती आपलीच सावली आहे हे ओळखता येऊ लागलं.कधी ठेंगणीठुसकी, कधी लांबलचक, कधी अस्ताव्यस्त पसरलेली, काळीसावळी अशी ही सावली!एक गुण असेल तर शप्पथ! पण तरीही ती माझीच प्रिय सखी. ती सतत माझ्याबरोबरच का असते?याचे उत्तर तिनच मला एकदा दिलं. “अगं तुझ्या सोबत दुसरं कोणी नसतं ना म्हणून मी असते.”
प्रतिबिंब पेक्षाही आभासी असणाऱ्या या सावल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पहिल्या की वेगवेगळी नावे धारण करतात.आपल्याला साथ सोबत करणारी अगदी आपलीच असणार्या आईला मायेची सावली म्हणतात. छोटा गंधर्व तर देवालाच ‘तू माझी माऊली तू माझी सावली’ असं म्हणून स्वतःला देवाजवळ नेतात. भयाची सावली,पाठीराख्यांची सावली, झाडाची सावली अशा अनेक सावल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून निर्माण झाल्या आहेत.
खरं म्हणजे सावली हे प्रकाशाचं अस्तित्व आहे. मग ते नैसर्गिक असो वा कृत्रिम! प्रकाश नसताना सावली दिसत नाही. सावलीही सत्य गोष्ट असूनही आभास वाटते. पण सावली या संकल्पनेला एक शास्त्रशुद्ध आधार आहे. सूर्यग्रहण चंद्रग्रहण तिच्यामुळेच होतात. आपण रोज रात्री पृथ्वीच्या सावलीत झोपतो.चंद्र झाकतो तेव्हा या महाकाय सावलीचे अस्तित्व जाणवते. पृथ्वीच्या सावलीतून चंद्र जातो तेव्हा चंद्रग्रहण होते.चंद्र स्वयंभू नाही त्याला सूर्याचं तेज आहे. त्यामुळेच सावल्यांचे खेळ चालतात.
या काळ्यासावळ्या सावली वर कवींनी किती सुंदर गाणी रचली आहेत.’हा खेळ सावल्यांचा’ या गाण्यातील ‘हसतात सावलीला हा दोष आंधळ्याचा’ ही ओळ सावली बद्दल बरंच काही सांगून जाते.’वेळ झाली भर माध्यान्ह या गाण्यात, ‘माझी छाया माझ्याखाली तुजसाठी आसावली कशी करू तुज सावली’ हे एका श्रमिक कामगार स्त्रीने आपल्या तान्हुल्या साठी आपली दुपारची ठेंगणी ठुसकी सावली अपुरी आहे या अर्थाने म्हटले आहे ‘मेरा साया साथ होगा’ म्हणत सावलीचे गुढ रहस्य प्रेक्षकांना चित्रपट भर खिळवून ठेवते ते निराळेच.
सत्य असूनही आभासी वाटणारी ही सावली माझी म्हणावी अशी!
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
मो 9822553857
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈