श्री गौतम रामराव कांबळे
परिचय
शिक्षण: एम्.ए.(इतिहास), एम्.ए.(समाजशास्त्र), एम् एड्.;बी.जे.,डी.एस.एम्.
साहित्यिक वाटचाल:
- कोकण मराठी साहित्य संमेलन,चिपळूण,नवोदित कविसंमेलन,वसई;अ.भा.मराठी साहित्य संमेलन,यवतमाळ यात सहभाग.
- आकाशवाणी रत्नागिरीवरून स्वरचित लोकगीतांचे सादरीकरण
- दूरदर्शन सह्याद्री वाहिनीसाठी कार्यक्रम निर्मिती सहकार्य आणि भारत निर्माण माहितीपटात भूमिका.
- विविध दैनिके,साप्ताहिके,दिवाळी अंक यातून सातत्याने लेखन.
पुरस्कार:
- काव्यशिल्प पुरस्कार,जनसेवा ग्रंथालय,रत्नागिरी.
- राज्यस्तरीय विशेष सन्मान,फ्रेंड सर्कल,पुणे
- मिरज तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, 2000 व 2002साठी.
- जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार.म.रा.मा. शिक्षक संघटना.
- नेशन बिल्डर ॲवाॅर्ड,इंनरव्हिल क्लब ऑफ सांगली, 2017.
- जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक,रोटरी क्लब,सांगली 2018.
- कवीभूषण पुरस्कार,नांदेड.
- ‘गंध सोनचाफी’ कवितासंग्रह प्रकाशित. तीन पुरस्कार प्राप्त.
विविधा
☆ संस्काराचा दीपस्तंभ… साने गुरुजी ☆ श्री गौतम रामराव कांबळे ☆
साने गुरुजी हे नाव जरी उच्चारलं तरी आठवते ती आईची ममता. गाईचं वात्सल्य. आपल्या साध्या सोप्या ओघवत्या वाणीतून संस्काराचा झरा आजही साने गुरुजींच्या साहित्यातून अलगद झुळझुळत राहिला आहे.
ज्याने ज्याने साने गुरुजींचे साहित्य वाचले आणि तो हळवा झाला नाही असा माणूस शोधून सापडणार नाही.
खरा धर्म असतो तरी काय? हे साने गुरुजी आपल्या गीतात सांगतात, ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ धर्माच्या नावाखाली चाललेल्या ओंगळपणाला किती सुंदर उत्तर दिलंय गुरुजीनी! जे रंजले गांजलेले, दीन दुबळे आहेत अशांना मदतीचा हात द्यावा. हे गांधीवादी तत्त्वज्ञान गुरुजी अलगदपणे सांगतात.
शिक्षक म्हणून काम करताना केवळ विद्यार्थीच नाही तर समाजशिक्षण देण्याचं कार्य साने गुरुजीनी केलं आहे.
‘शामची आई’ हे गुरुजींचं पुस्तक तर संस्काराचा अनमोल ठेवा आहे.
केवळ उक्ती करून बसायचे नाही. तर ते कृतीतही आणावे लागते. याचे उदाहरण म्हणजे गुरुजींचा पंढरपूरच्या विठ्ठल मंदीर प्रवेशाचा सत्याग्रह. सर्व परमेश्वराचीच लेकरे असतील तर त्या परमेश्वराचं मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला अस्पृश्यतेच्या नावाखाली का नकार असावा? हा प्रश्न त्या सत्याग्रहात होता. अतिशय शांतपणे, अहिंसक मार्गाने गुरुजीनी हा लढा दिला होता. मेणाहून मऊ हृदय असणारी माणसं सत्यासाठी वज्राहून कठीण होऊ शकतात. व तेही समाजास्वास्थ्य बिघडू न देता. हे गुरुजीनी दाखवून दिले.
गुरुजीनी माणसावर प्रेम तर केलंच; पण झाडे, वेली, निसर्ग, पशु पक्षी यांच्या मनाचा ठाव घेताना त्यांच्याही मातेचं स्थान त्यांनी प्राप्त केलं.
साने गुरुजींची शिकवण प्रत्येक ठिकाणी उपयुक्त ठरते.
मुलांच्या बाबतीत साने गुरुजी खूप हळवे होते. ‘मुलं ही देवाघरची फुलं’ आहेत. असं त्यांचं मत होत होतं. ती फुलं सतत हसती खेळती, टवटवीत असावीत यासाठी ते धडपडत. त्यासाठी त्यांच्याकरिता गाणी गोष्टी ते लिहायचे. आनंदाबरोबरच त्यांच्यावर संस्कार व्हावेत हाही हेतू असायचा.
या निमित्ताने मला एक प्रसंग आठवतो.
आपली शाळा सुंदर असावी. झाडा फुलांनी बहरलेली असावी. त्या झाडांवर पाखरांचा किलबिलाट असावा. असं वाटायचं.
योगायोगाने शाळेत झाडा फुलांवर अतिशय प्रेम करणाऱ्या एक बाई, विजयादेवी पाटील बदलीने आल्या. त्या मलाच पहिलीला शिकवायला होत्या. आम्ही खूप वेगवेगळ्या फूलझाडे लावली. सुंदर फुले डोलू लागली. नंतर त्या गावातील लोक बाईना फुलांची आई म्हणू लागले. पण, शाळेला कसलेच कुंपण नव्हते. लहान मुलांना तर फुलांचे आकर्षण असते. फुले तोडल्याने ती झाडे निस्तेज वाटायची.
त्या वेळी सानेगुरुजींच्या एका संस्कार कथेनं आधार दिला.
पाठ्यपुस्तकातच ती कथा होती. शामची आई या संग्रहातली.
त्याचा सारांश होता, शाम एकदा फुलझाडावरच्या कळ्या तोडून आणतो. त्यावेळी आई त्याला सांगते, ‘बाळ, कळ्या म्हणजे वेलीची बाळे असतात. आणि ती बाळे आईच्या मांडीवरच सुरक्षीत असतात. त्या बाळाला आईच्या मांडीवरुन तोडून दूर नेले तर ती रडतील. कोमेजतील.’
याचा संदर्भ घेऊन आपल्या बाबतीत असे घडले तर चालेल का? असे वारंवार विचारून मुलांच्यात बदल घडवला. आजही त्या शाळेतील मुलेच काय, पालकही फुलांना हात लावत नाहीत. ही जादू आहे साने गुरुजींच्या संस्काराची.
साने गुरुजींचे विचार, संस्कार माणसाला मानवतेकडे नेण्यासाठी एखाद्या दीप स्तंभासारखे चीरकाल मार्गदर्शन करत राहणार आहेत.
© श्री गौतम रामराव कांबळे
शामरावनगर,सांगली.
9421222834
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈