विविधा
☆ सेल्फी फोटो… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆
तीसेक वर्षांपूर्वी नुकतेच मोबाईल फोन आले होते. पण आजच्या सारखे ज्याच्या त्याच्या हातात, खिशात मोबाईल नव्हते. ती काही लोकांचीच मक्तेदारी होती. इतरांना तो परवडायचाही नाही. मग त्यावर फोटो काढण्याची सोय झाली. निरनिराळ्या अॅप्स मधून, फीचर्समधून खूप झटपट सुधारणा झाल्या. आणि नंतर सेल्फीचा जमाना आला. पंधरा वर्षांपूर्वी पासून सेल्फी काढणे हे प्रेस्टिजचे लक्षण मानले जाऊ लागले. नंतरच्या काळात तर सेल्फींचा सुळसुळाट झाला.
विज्ञान तंत्रज्ञानांची प्रगती मानवाला सुखकारक ठरली. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून इतर कुठल्याही ठिकाणी संपर्क करणे सोपे झाले. तसेच फोटो पाठवणेही सोपे झाले. परदेशात असलेल्या जिवलगांचा दिनक्रमही त्यातून समजणे, प्रत्यक्ष पाहणे ही नित्याची गोष्ट झाली. याचे मुख्य कारण म्हणजे सेल्फी हेच होय.
सेल्फी स्टिक जवळ बाळगणे हेही कित्येकांना आवश्यक वाटू लागले. सहलीच्या वेळी आपल्याला हव्या त्या कोनातून फोटो सहज काढता येऊ लागले. एवढ्या सगळ्या तंत्रज्ञान प्रगतीमध्ये ज्याने सेल्फीचा शोध लावला , त्याला खरोखरच सलाम ! बऱ्याच अंशी माणसाला त्याचा फायदाच जास्त होऊ लागला आहे. मलाही होतो. मी माझ्या परदेशात राहणाऱ्या मुलांना इतर कुटुंबीयांना सेल्फी द्वारा भेटू शकत नसले तरी भेटीचा आनंद आम्ही नक्कीच घेऊ शकतो.
पण जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो तेव्हा मात्र हे सेल्फी प्रकरण प्रसंगी जिवावर बेतू शकते. विशेषतः खोल पाण्यात, समुद्रात, धबधब्याखाली किंवा उंच डोंगरांवर, कठडे नसलेल्या गच्चीवर सेल्फी काढताना आजूबाजूचे भान बाळगणे अपरिहार्य असते. तसे ते न बाळगले तर सेल्फीच्या अट्टाहासाने अनेक लोक अपघातात बळी पडतात . पाण्यात बुडून, दगडावर आपटून, उंच कड्यावरून पाय घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यात तरूण मुले मुली ही जीव गमावून बसले आहेत.
जेव्हा प्रगती होते तेव्हा माणूस अशा दुर्घटनांची कधीच अपेक्षा करीत नसतो.किंबहुना विचारही करीत नसतो. पण आपल्याच क्षणैक सुखाच्या आभासी धुंदीत आपला मौल्यवान जीव गमावण्याची वेळ कुणावर येऊ नये. आपले आनंदाचे क्षण आपण आता क्षणोक्षणी सेल्फी घेऊन कायमचे स्मरणात ठेवू शकतो. फुरसतीच्या वेळी त्या क्षणांच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद घेऊ शकतो. त्यातही ते सेल्फी इतरांना पाठवले तर त्यांना आनंद होऊन आपला आनंदही द्विगुणित होतो. त्यावर खूप लाईक्स, स्माईली, थंब्ज 👍 आले की आपला इगो सुखावतो 😀.
यामुळे आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की कॅमेरा घेऊनच फोटो काढणे, ते फोटो स्टुडिओ हे सगळं या सेल्फीमुळे कालबाह्य झाले आहे. फोटोग्राफर लोकांची गरज यामुळे संपली आहे. त्यांना वेगळे व्यवसाय मिळाले असतील. पण आता नव्या युगात कुणीही फोटो, सेल्फी सहज क्लिक करू शकतो.
सेल्फी घेणे, इतरांना पाठवणे, पुन: पुन्हा पाहून आनंद लुटणे, कायम स्मरणात ठेवणे यात काहीच गैर नाही. ही जगरहाटी झाली आहे. मीही काढते सेल्फी . सर्वांना पाठवते. पण खबरदारी घेऊनच!! ज्यांना पाठवायचा सेल्फी ,त्यांनाही त्यातून आनंदच मिळावा. त्याला आपला सेल्फी पहायचा नसेल तर ते लक्षात आले की नका पाठवू!
काही ठिकाणी जेव्हा अजिबात खबरदारी घेतली जात नाही तेव्हा कधी कधी तिथल्या निसर्गाचे, पर्यावरणाचेही नुकसान होते निसर्ग चुरगळला जातो याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. तरूण वर्गामध्ये सेल्फी अधिक लोकप्रिय आहे. असू दे! पण त्याचवेळी इतर कर्तव्ये, जबाबदारी, खबरदारी विसरू नये. एकदा तर सेल्फीच्या नादात जलाशयात एक बोट बुडाली. त्यात बुडून मृत्युमुखी पडलेले लोक डॉक्टर होते. अशी एक बातमी होती. समाजातील या महत्त्वाच्या घटक असलेल्या सुशिक्षितांनी तरी यांचे भान ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी सेल्फीचा आनंद जरूर घ्यावा ,पण जबाबदारी आणि खबरदारी पाळावी हेच खरे !!!!
© सुश्री प्रज्ञा मिरासदार
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈