सौ राधिका भांडारकर

?  विविधा  ?

☆ सर्वपित्री अमावस्या… ऋतू बरवा ☆ सौ राधिका भांडारकर  ☆

आपले सर्व ऊत्सव हे ऋतु चक्रावर अवलंबून असतात.

तसेच आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. साधारणपणे भाद्रपद महिन्यांत शेतीची कामे संपलेली असतात. पीकं तयार होत असतात. गणेशोत्सव संपला की पितृपक्ष सुरु होतो. भाद्रपद, कृष्णपक्षातील पंधरवडा हा पितृपक्ष मानला जातो.

कृतज्ञता पक्ष असेही म्हणायला हरकत नाही.

पूर्वजांचे स्मरण, त्यांच्याविषयीची प्रेमभावना, आदर कृतज्ञता श्रद्धेने व्यक्त करण्यासाठी हा पंधरवडा.

ज्या तिथीला त्यांना देवाज्ञा झाली त्या तिथीस श्रद्धायुक्त मनाने सर्व कुटुंबीय श्रद्धांजली वाहतात.

पूर्वजांना पितर असे संबोधले जाते. त्या दिवशी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून, केळीच्या पानात वाढले जातात व ते पान कावळ्याला खाऊ घालतात. दूध वडे खीर पुरण हे पदार्थ मुख्यत्वे बनवले जातात.

अशी समजूत आहे की, या दिवसात पितर भूलोकी येतात.

ऊत्तर आकाशात देवांचा वास असतो तर दक्षिण आकाशात पितर वास करतात. सूर्य दक्षिणायनात जात असतो.या खगोलशास्त्रीय स्थित्यंतराला दिलेला हा धार्मिक आणि श्रद्घेचा  दृष्टीकोन. परंतु आपल्या पूर्वजांची आठवण ,आज त्यांच्यामुळे आपण जन्मलो, त्यांनी आपल्याला वाढवलं,शिक्षण संस्कार दिले. जगण्याची वाट दाखवली.. त्यांच्या ऋणाची जाणीव ठेवण्यासाठीच हा पितरोत्सव!!

शिवाय या निमीत्ताने पक्षी प्राणी गोरगरिबाच्या मुखी घास घातला जातो. कुणी पूर्वजांच्या नावे धर्मादाय संस्थांना दान देतात ..देणग्या देतात.. या रीतीमागे अतिशय चांगला हेतु आहे. मृतात्म्यांची शांती तृप्ती व्हावी ही भावना आहे. आणि त्यांचा आशिर्वाद सदैव असावा अशी भावना आहे.

आज अनेक वर्षे, पिढ्यानु पिढ्या परंपरेने हा पितृपक्ष मानला जातो. काळाप्रमाणे काही बदल होत असतात.

पण इतकंच वाटतं की पूर्वजांचं ऋण न फिटणारं आहे, पंधरा दिवसांचा हा पितृपक्ष. अत्यंत श्रद्धेने तो साजरा झाला. आज अमावस्या. शेवटचा दिवस. आजच्या या दिवसाला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. ज्यांना पूर्वजांची तिथी माहित नसते, किंवा वंशातल्या सर्व पूर्वजांना, इतकंच नव्हे तर ज्यांनीआपल्या आयुष्याला दिशा दिली, संस्कार केले, घडवले, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आजचा महत्वाचा दिवस !! मात्र एक सल मनात आहे.

आजच्या संवाद नाते संंबध हरवत चाललेल्या काळात जन्मदात्यांची अवहेलना त्यांच्या जीवंतपणी होऊ नये..

नाहीतर मरणानंतर केलेल्या अशा सोहळ्यांना काय अर्थ आहे……?

धन्यवाद!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments