☆ विविधा ☆ स्नायूबळ ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

खरं तर शरीरसौष्ठव आणि माझा कधीकाळी संबंध येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मुख्य कारण म्हणजे आळस! 🙂 सौष्ठव मिळवण्यासाठी जी काही मेहनत करावी लागली असती त्यास मी कधीच तत्वत: तयार झालो नसतो. दुसर्‍या कुठल्यातरी ठिकाणी आपण गाडीने जाऊन मौल्यवान वेळ घालवायचा, वजने उचलायची, घाम गाळायचा आणि वर त्यासाठी पैसेही मोजायचे!? कुणी सांगितलाय नसता उद्योग? त्यापेक्षा मी घरी व्यायाम करेन, बागेत खुरपणीचे काम करेन, शेतातही कुदळ-फावडे घेऊन कष्टायला जाईन, अगदीच लागले तर घरातही कष्टाची कामे करेन, केरवारा काढणे, भांडी घासणे, कपडे धुवेन, इस्त्री करेन इ.इ. म्हणजे असे नाना पर्याय माझ्यासमोर असतील, एवढेच मला म्हणायचे होते. 🙂 पण ह्याचा अर्थ मी व्यायामशाळेत आत्तापर्यंत कधीच गेलेलो नाही असा मात्र नव्हे. महाराष्ट्र मंडळाच्या व्यायामशाळेत कॉलेजला असताना जात असे. पण तेही कॉलेजच्या मैदानावर सकाळीसकाळी उठून NCC ला जाणे टाळता यावे ह्यासाठी. 🙂

शरीरसौष्ठव हा खेळ म्हणून असतो हे प्रेमचंद डोग्रा, अर्नॉल्ड श्वार्झेनेगर वगैरें बलिष्ठांचे फोटो आणि पेपरातील बातम्या पाहून माहीत होते. पण हा खेळला जातो कसा हे मला माहीत नव्हते. कुस्ती मध्ये कसे दुसर्‍याला पाडून, उरावर बसून चीतपट करायचे असते. वजन उचलण्याच्या स्पर्धेत प्रत्यक्ष वजन उचलावी लागतात. तसे शरीरसौष्ठव स्पर्धेत नक्की प्रावीण्य मिळवतात तरी कसे? स्पर्धा कशी होते? आणि स्पर्धकांना गुण कुठल्या निकषावर दिले जातात? असे एक ना अनेक प्रश्न मनात घोळत होते. ह्यातील काही उत्तरे मिळायची संधी परवा मात्र अगदी घरपोच मिळाली. निमित्त होते ते जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा ज्या १२ फ़ेब्रुवारीस लोकमान्यनगर जॉगिंग पार्कवर भरवण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे ’मिस्टर एशिया’ असलेला, महेंद्र चव्हाण! ह्या गुणी खेळाडूविषयी मी पुढे सांगेन. स्पर्धेचा मोठा जाहिरात फ़लक माझ्या घरासमोरील चौकातच लक्षवेधी ठिकाणी लावलेला असल्याने चुकवणे म्हटले तरी शक्य नव्हते. काहीही झाले तरी स्पर्धा बघायचीच, असे मनाशी ठरवून टाकले.

त्या दिवशी ऑफ़िसमधून निघून घरी पोहोचायला उशीर झाला आणि रात्रीचे ९:३० वाजले. तरी पण लॅपटॉपचे दप्तर घरी टाकून लगेच पार्क मध्ये पोहोचलो. मैदानातील सर्व खुर्च्या भरल्या होत्या. एक किंवा दोनच महिला उत्सुकतेपोटी म्हणून थांबल्या होत्या. सर्व तरणीबांड पोरे (माझ्यासारखी 🙂 ) गर्दी करून आली होती. टाळ्या आणि शिट्यांनी मैदान दणाणून उठले होते. मला कळेना की स्पर्धा चालू आहे का लावणी नृत्य का मिसेस पुणेची स्पर्धा? तसंही एका परीने ही पुरुषांची सौन्दर्यस्पर्धाच होती म्हणा.

८० किलो वजनगटाचे ५-६ स्पर्धक एका रांगेत येऊन उभे होते. परीक्षकाने पुकारा केला की सर्वजण ती पोज देत होते. अशा एकापाठोपाथ सहा पोजेस द्यायच्या असतात. सरते शेवटी एक मिनिटाची संगीत फेरी असते. ह्यामध्ये जोषपूर्ण संगीताच्या तालावर प्रत्येकाने आपापल्या लाडक्या पोजेस द्यायच्या, असे साधारण स्पर्धेचे स्वरूप होते. समोर जजेस बसले होते व गुण लिहीत होते. नुसते शरीर पिळदार असून उपयोग नसतो तर आत्मविश्वासाने स्नायूंचे दर्शन घडवणे ह्याला जास्त गुण मिळत होते. शिवाय तुमच्या चेहर्‍यावरील हावभाव सुध्दा महत्वाचे असतात. स्नायु उठावदार दिसावेत ह्यासाठी संपूर्ण अंगाला एक विशिष्ट प्रकारचे तेल चोपडण्यात येते. पुण्या आणि पुण्याच्या बाहेरील विविध व्यायामशाळेतून स्पर्धक आले होते. एक जण तर व्यवसायाने डॉक्टर होता!

स्पर्धेसाठी सर्व राजकीय पक्षांचे आजीमाजी नेतेही निमंत्रित होते.विविध वयोगटातील स्पर्धकांना करंडक, प्रशस्तीपत्रके, रोख बक्षीसे देण्यात आली.

स्पर्धेचे प्रमुख आकर्षण होता तो म्हणजे मिस्टर आशिया असलेला महेंद्र चव्हाण. मजबूत गर्दन, गोलाकार खांदे, बायसेप्स, ट्रायसेप्स, एखाद्या नारळाप्रमाणे फुगलेली दंडाची बेटकुळी, व्ही आकाराची भरदार छाती, सहा पॅक मोजून घ्यावेत असे पोटाचे स्नायू, लोखंडी मांडया, फुगीर पोटर्‍या, सह्याद्रीच्या डोंगररांगांप्रमाणे पसरलेले पाठीचे घट्ट स्नायू म्हणजे एखाद्या शिल्पकृतीप्रमाणे शरीरयष्टी कमावलेला हा योध्दा इतक्य़ा सहजपणे पोजेस देत होता की प्रेक्षक बेभानपणे टाळ्या वाजवून प्रोत्साहन देऊ लागले. शरीरावर इंचच काय एक सेंटिमीटरही दिसत नव्हता जो स्नायू आणि शिरांनी तटतटलेला नव्हता. बाहुबलीच नव्हे तर हा जिवंत ’स्नायुबली’च आमच्या डोळ्यांसमोर उभा होता. सगळ्यात शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि राज्याचे पालकमंत्री गिरीशभाऊ बापटांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला. भाषणात गिरीशभाऊंनी महेंद्र चव्हाणचे तोंडभरून कौतुक तर केलेच वर कौतुक म्हणून त्याला रोख पारितोषिकही जाहीर केले. त्याचबरोबर एक गोष्ट आवर्जून सांगितली ज्यामुळे सर्व उपस्थितांचे डोळे खाडकन उघडले. माझ्या दृष्टीने तर तो समारंभाचा सर्वात महत्वाचा भाग ठरला. “महेंद्रची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तो लहानपणी फुटपाथवर झोपत होता. वडापावची गाडी चालवत त्याने दिवस काढले आहेत. अशाही विपरीत परिस्थितीत त्याने व्यायाम आणि शरीरसौष्ठवाचा ध्यास सोडला नाही आणि आज तो ’झिरो’चा ’हिरो’ म्हणून तुमच्या समोर उभा आहे”, हे ऐकून सर्वांचे डोळे पाणावले.

महेंद्रनेही छोटे भाषण केले आणि सांगितले की “साहेब मला नेहमीच सपोर्ट करीत आले आहेत. त्यांनी सागितल्याप्रमाणे मी पर्वती पायथ्याशी असलेल्या जनता वसाहतीत वाढलो आणि मला त्यावेळेपासून ओळखणारे काही लोक आज प्रेक्षकांत बसलेले दिसत आहेत. आजही ते मला बघायला आलेले पाहून आनंद होत आहे.” त्याच्या ह्या विनम्र स्वभावावर सर्वांनी टाळ्यांचा जोरदार कडकडात केला. “मी आत्तापर्यंत २०३ स्पर्धा मारल्या आहेत. थंड देशात तुम्हाला आजारी पडण्याचा सर्वात जास्त धोका असतो, त्यामुळे खूप सावध रहावे लागते. ४० देशांचे स्पर्धक आलेले असतानाही मी सुवर्णपदक जिंकले आणि त्यावेळेस भारताचे राष्ट्रगीत ऐकताना मला माझे लहानपणापासून पाहिलेले स्वप्न साकार झाल्यासारखे वाटले.” असे ऐकल्यावर पुन्हा एकदा टाळ्यांचा जोरदार कडकडाट आणि “भारतमाता की जय!”, “जय भवानी, जय शिवाजी” चा जयघोष झाला.

“कमळ हे देखील शेवटी चिखलातच उगवते, हे खरे!” ह्या विचारातच जो तो आपापल्या घरी गेला.

 

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments