सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ सण दिवाळीचा ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
दिवाळी हा सगळीकडे साजरा होणारा महत्त्वाचा सण. सणसमारंभ असतातच मुळी उत्साहवर्धक वातावरण निर्मितीसाठी. नुकतचं नवरात्र होऊन गेलेलं असतं त्यामुळे नवरात्रा पासूनच बाजारपेठा सजायला सुरवात झाली असते. खरचं हे सणसमारंभ असतातच मुळी आपल्यातील मरगळ झटकण्यासाठी. हे सणसमारंभच आपल्या संस्कृतीला घट्ट जखडून ठेवतात त्यामुळेच नात्यानात्यातील एकोपा वाढीस लागतो.
अर्थात पूर्वी आणि आता सण साजरे करण्याच्या पद्धतीत अमुलाग्र फरक पडलायं. पूर्वी एकतर संयुक्त मोठे कुटुंब, वेळेची भरपूर उपलब्धी,हौस आणि त्यामानाने महागाई चा भस्मासुर जरा कमी होता.
आताच्या दिवाळीत आणि आम्ही लहान असायच्या दिवाळीत बराच फरक पडलायं. काही गोष्टी ह्या कमावल्या आणि काही गोष्टी ह्या गमावल्यात. सगळ्यातं पहिली गोष्ट म्हणजे खूप प्रतीक्षेनंतर, थोड्याश्या हट्टानंतर मिळणाऱ्या छोट्याशा गोष्टी पूर्वी खूप मोठ्ठा आनंद देऊन जायच्या,तेच आता सहज साध्य झालेल्या मोठ्ठ्या खरेद्या पण अल्प आनंद देऊन जातात. पूर्वी घरगुती फराळ करायचे, तो फराळ बनवितांनाचे आईचे कष्ट, तिने घेतलेली अपार मेहनत आतून खूप जाणवून आणि समजावून जायची हेच आता रेडीमेड पदार्थ आणतांना ती कष्टांच्या भावनेची जाणीवच लुप्त झालीय. पण एक म्हणजे आताच्या सणांमध्ये सुबत्ता आलीय आणि पुर्वीच्या सणांना एक काटकसरीची झालर ही होतीच.
दिवाळीचा उत्साह हा महिलावर्ग आणि बच्चेकंपनी ह्यामध्ये काकणभरं जास्तच असतो जसं पक्वान्नामध्ये पदार्थांचा राजा म्हंटले की पुरणपोळीच,बाकी सगळे पक्वान्न ह्यानंतरच त्याप्रमाणे सणांचा राजा म्हंटले की दिवाळीच बाकी सगळे सणवार ह्याच्याखालीच. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे दिवाळी हा सण अगदी उत्साहवर्धक काळात येतो.नुकताच पावसाळा संपून आँक्टोबर हीट कमी होऊन हव्याहव्याशा वाटणा-या गुलाबी थंडीला नुकतीच सुरवात झालेली असते.ह्या दिवसात वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद मनमुराद घेऊ शकतो कारण हा काळ पचनास सर्वोत्तम काळ असतो.भारत हा कृषीप्रधान देश असल्याने ह्या दिवसात शेतकऱ्यांच्या हातात पहिले पीक येऊन जरा ब-यापैकी पैसा हातात खुळखुळतं असतो. ह्या दिवसात ह्यामुळे व्यापारातील मंदी कमी होऊन व्यापारउदीमासाठीसुद्धा हा काळ उत्साहवर्धक व तेजीचा ठरतो.
दिवाळीचं प्रमुख आकर्षण म्हणजे महिलांना खरेदी आणि धावती का होईना ह्या निमीत्त्याने माहेरी धावती का होईना टाकायला मिळणारी एक चक्कर हे असतं.आपल्या वाटेकडे आईबाबा अगदी डोळेलावून बसलेले असतात. आपण यायच्या वेळेस बरोबर बाबांचे व-ह्यांड्यात खुर्ची टाकून पेपर चाळतं बसणे म्हणजे नजर पेपरमध्ये पण कान मात्र आपल्या आगमनाची चाहूल घेणारे. आईची सारखी आतबाहेर चकरा करीत वाट बघणे सुरुच असते.खरचं हे अविस्मरणीय क्षणं टिपण्यासाठी आणि आठवणींच्या कुपीत कायमचे जपण्यासाठी तरी माहेरी जायला यनं ओढ हे घेतच.
बहिणीबहीणींनी कितीही ठरविले तरी एकमेकींकडे जाणं होतचं असं नाही. पण ह्या माहेरच्या दुव्याने आम्ही बहिणीपण मनमोकळ्या राहू शकतो.आम्ही भावंड एकत्र आलोत की गप्पा संपत नाही, हास्याचे फवारे थांबत नाही आणि जुन्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन देऊन मनं ही भरत नाही. त्यात आता भरीसभर आमची मुलं ही आमच्या टीम मध्ये सामील.हे प्रेमाचे एकत्रीकरण बघून आईबाबांच्या डोळ्यात जे समाधान दिसतं नं त्यापुढे सगळी सुखं फिकीच.
एक मजा वाटते एरवी आपल्याला कोणी लहानशी गोष्ट जरी देऊ केली तरी आपल्याला संकोचाच्या ओझ्याखाली दबायला होतं पण आईबाबांनी दिलेल्या मोठ्याही गोष्टीवर आपला हक्क आहे असा मोकळेपणा माहेरी वाटतो.आईबाबांनी खूप कष्ट करून, प्रसंगी स्वतःचे मन मारून जमविलेली पुंजी हे किती ह्या सणासुदीच्या निमीत्त्याने आपल्याला घसघशीत सहजतेने निर्मोहीपणे देऊन टाकतात हे फक्त आणि फक्त आईवडीलच करू शकतात.
.दिवाळी करून घरी परततांना एका बँगेच्या दोन तीन मोठ्या बँग्ज् झालेल्या असतातच.त्या बँग फक्त सामानानेच नव्हे तर आनंदाने आणि सुखाने सुद्धा गच्च भरलेल्या असतात. त्या सामानात आईच्या हातचा गरम मसाला, वर्षाचे साठवणूक करता येणारे पदार्थ हमखास असतातच ज्यापूढे जगाच्या बाजारात कितीही पैसे ओतून घेतलेल्या ह्या वस्तू आईच्या हातच्या मायेच्या उबेपुढे फिक्क्याच असतात.
अशा त-हेने दिवाळीहुन परततांना जी मायेची,प्रेमाची शिदोरी मिळते त्या आठवणींवर आपण उन्ह्याळ्यापर्यंत सहज मन.रमवितो.मग परत आहेच आमरसाला माहेरी चक्कर.
प्रत्येक श्वासागणिक मनात आठवण असणारे आईबाबा,जीव ओतून प्रेम करणारी बहीण आणि माहेरपणची ओढ टिकवून ठेवणारा भाऊ असल्याने मी खूप नशीबवान आणि श्रीमंत व्यक्ती असल्याचा माझाच मल साक्षात्कार होतो.
परतीची वेळ थोडी अवघड असते.परत तेच पेपर हातात धरून बसलेले बाबा न बोलता जणू नुसते नजरेनेच सांगतात लौकर परत या गं, आई फाटकापर्यंत येऊन परत परत स्वतःची काळजी घ्यायला बजावत असते.अशा वेळी गाण्याच्या ओळी आठवतात,
“मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?
काय पुण्य असतं की जे घरबसल्या मिळतं।”
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈